Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
अज्ञातोद्भव शबल साधने केवळ भ्रांतिकृत असतात; परंतु ती भ्रांतिकृत असतात असे मनुष्य समजत मात्र नाही. वास्तव साधनांच्या व कलांच्या इतकीच किंवा त्याहूनही जास्त खरी ती आहेत असा मनुष्याचा समज असतो. गूढ आवाज वगैरे मूळ पाया. त्यावर ती कोठून आली एतद्विषयी तर्क. माहीत असणा-या कोणत्याही पदार्थापासून आला नाही त्या अर्थी व कोण्यातरी प्राण्यापासून आला पाहिजे या अर्थी, उपमानप्रमाणाने प्राथमिक मनुष्याने असे ठरविले की कोण्यातरी अदृश्य प्राण्याचा हा आवाज असावा. आवाज झाडावरून, रानातून, सरोवरावरून, मेघांतून, आकाशातून वगैरे जिकडून येईल तिकडे तो अदृश्य प्राणी रहात असावा. असे नाना तर्क करून मनुष्याने भुते, यक्ष, देव, दानव, अप्सरा, गंधर्व, वेताळ, पिशाच इत्यादी गूढ प्राणी प्रथम निर्माण केले; नंतर त्यांच्या रहाण्याच्या जागा, स्थले, प्रदेश व लोक निर्माण केले, आणि शेवटी त्यांची त्यांच्या गुणानुरूप उपमानप्रमाणाने रूपे निर्माण केली. इतकेच करून मनुष्य थांबला नाही, तर हे अदृश्य प्राणी रागावले म्हणजे पूजा, प्रार्थना, नैवेद्य व बळीं देऊन त्यांची मर्जी संपादण्याचे मार्ग त्याने ठरविले, ह्या मार्गानाच देवधर्म म्हणतात. सुष्ट देव, दुष्ट देव, खाष्ट देव, वरिष्ठ देव, कनिष्ठ देव, प्रेष्ठ देव, श्रेष्ठ देव आणि एकमेव एक देव असे नाना प्रकारचे देव व देवदूत व भुते व सैताने व या सर्वांच्या स्त्रिया व पोरे असे एक नवीन जगच्या जग मनुष्याने निर्माण केले आणि ते जग खरे व मेल्यावर त्या ख-या जगात आपण अक्षय्य रहाण्याला जाणार, इतकेच नव्हे तर आपले हे दोन दिवसांचे साधे जग खोटे आणि खोटे नसले तर क्षणिक इत्यादी तर्कपरंपरा बांधीत बांधीत तो त्या ख-या परलोकावर बेसुमार आसक्त झाला. इतका आसक्त की, रोजची व्यवहारातली जी कर्मे, आयुर्धे, उपकरणी, चित्रे, मूर्ती, इमारती, थडगी, लग्ने, जातकरणे, पताका, ध्वज, संस्कार इत्यादी सर्वांवर त्या ख-या जगातील वस्तूंचा त्याने छाप मारला. त्या ख-या जगाची व तेथील देवादानवांची चित्रे, स्तोत्रे, वेद, बायबले, कुराणे, त्रिपीटके, काव्ये, नाटके, तांडवे देखील मनुष्याने केली. असा मोठा गोंधळ मनुष्याने माजवून ठेविला. खरेच खरे होते त्याला त्याने खोटे ठरविले आणि निव्वळ काल्पनिक जे होते त्याला खरे ठरविले. मनुष्याने ही जी कल्पनासृष्टी बनविली तिचे उत्कट ऐतिहासिक रूप पहावयाचे असल्यास उत्तम मार्ग म्हटला म्हणजे कोणत्याही लोकांच्या देवळाकडे चला. म्हणजे मनुष्याच्या भ्रांत साधनांचा केवळ ऐतिहासिक संग्रह एका ठिकाणी केलेला तुम्हाला आयताच आढळेल. शहरातले अलीकडील शेदीडशे वर्षांतील देऊळ घेऊ नका.