Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
अभिनयातील हातवारे व नृत्यातील औद्धत्य हे नाटकाचे बहिःस्वरूप; व हातवा-यांनी दर्शविलेले विकारविचार आणि औद्धत्यातिशायनाने दर्शविलेले नवरस हे त्याचे अंतःस्वरूप. भांडे हे स्थापत्याचे बहिःस्वरूप; आणि नवरसांचा मूर्त उठाव हे अंतःस्वरूप. ह्या चार मिश्र कलांची अत्यंत शुद्ध रूपे म्हटली म्हणजे ही. इतर नाना कलांचे मिश्रण होऊन ह्या मूळच्या शुद्ध मिश्र कला अनेकधा मिश्र झालेल्या प्रायः पहाण्यात येतात. उदाहरणार्थ नाटक. ह्यात गद्य, पद्य, काव्य, वाद्य, चित्र, मूर्ती इत्यादि अनेक मिश्रणे झालेली आहेत. दुसरे उदाहरण स्थापत्याचे. स्वतः फक्त एकट्या भांड्याच्या मूर्तीने नवरसांचे प्रदर्शन करणे हे स्थापत्याचे मूळ कार्य. त्यात भिंतीवरील चित्रे, नक्षी, अक्षरे, अर्धमूर्ती, पूर्णमूर्ती, लेप, रांगोळ्या इत्यादींचे मिश्रण झालेले प्रायः आढळते. असो. या बाराहि कलांत मनुष्याच्या कर्तृत्वाचे प्राधान्य विशेष असते. वाद्यादी ज्या चार विचारविकार प्रदर्शनाच्या कला राहिल्या त्यात मनुष्याधीन साधनापेक्षा बाह्य वस्तूंचे साधनाधिक्य जास्त सापडते. बाब स्पष्ट आहे, सबब ह्या वीस साधनासंबंधी प्रपंच एथेच थांबवून, मनुष्यनिर्मित दुस-या एका विचित्र साधनाचे वर्णन करतो. हे साधन पूर्ण विकारमय आहे, आणि विकारमय असून आश्चर्य की अत्यन्त गूढ विचार प्रदर्शित करण्याचा हे खटाटोप करते. इतर कलांच्याप्रमाणे ह्याही कलांचा पाया तोच आहे, म्हणजे ध्वनी, रेखन, हावभाव व घनाकृतीच आहे. फक्त पायाच्या उगमात तेवढा भेद. गानादि कलांत पायाचा उगम ज्ञात असतो, वर्णयिष्यमाण कलात नसतो. आकाशवाणी, अरण्यरुदन, पिशाचगायन, स्मशानकोलाहल वगैरे ध्वनी कित्येक मनुष्यांना कधीकधी ऐकू येतात. ते कोठून व कसे येतात ते कळत नाही. त्याने मनुष्य गांगरतो, दचकतो, हैराण होतो व कधीकधी आजारीहि पडतो. ह्या ध्वनीची बाधा दैवी समजून त्यांचा प्रतिरोध करण्याकरिता मनुष्य श्रुतध्वनीच्या सदृश किंवा विदृश ध्वनी तोडगे म्हणून निर्माण करतो. -हां -हीं -हूं, क्रां क्रीं क्रू, फट्, वषट् , स्वाहा वगैरे असले असंख्यात ध्वनी तोंडावाटे काढून व इतर सार्थ किंवा अनर्थ संस्कृत, प्राकृत व धेडगुजरी शब्द किंवा शब्दमाला गुणगुणून मांत्रिक दैवी ध्वनीची बाधा पिटाळून लावतात.