Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
ह्या वीस रस्त्यांनी मनुष्य विचार व विकार प्रगट करीत असतो. पैकी १ ध्वनि, ६ रेखन, ११ हावभाव व १६ घनाकृती, आणि २ भाषा, ७ अक्षर, १२ अभिनय व १७ भांडी या आठ मूळ व्यावहारिक साध्या साधनांच्या कार्यासंबंधाने मागे उल्लेख केला आहे. प्रकृत लेखात भांडे या शब्दाचा अर्थ विचारविकारप्रदर्शनार्थ किंवा व्यवहारोपयोगार्थ बनविलेली प्रतिमा, मूर्ती, घर, छप्पर, हौद इत्यादि कोणतीहि घन आकृती असा समजावयाचा आहे. अतिरेक होऊन विकार व विचार मनात मावतनासे झाले, द्रवून उतू जाऊ लागले व साध्या साधनांच्या द्वारा प्रदर्शित करता येतनासे झाले म्हणजे अतिशायनाच्या ज्या ३ गान, ८ चित्रण, १३ नृत्य व १८ मूर्तीकरण ह्या कला, त्यांचा आश्रय मनुष्य करतो. मनाचे द्रवून जे उतू जाणे त्यालाच रस म्हणतात. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, रौद्र, भयानक, बीभत्स व शांत ह्या नऊ त-हांनी द्रवून मन उतू जाते व ह्या नवाही उतांचे प्रदर्शन गान, चित्रण, नृत्य व मूर्तीकरण या चार अतिशायनांनी मनुष्य साधतो. शब्द व भाषा यांचा व गानाचा काहीएक संबंध नाही. गान हजारो शब्दांनी बोलत नाही, फक्त सप्त स्वरांनी नवरस बोलते. चित्रण अक्षरांनी म्हणजे बावन मातृकांनी अर्थ दाखवीत नाही. फक्त पाच रंगांच्या न्यूनाधिक्याने नवरसांचे आविष्करण करते. नृत्य म्हणजे साधे अभिनय नव्हत, अंगांच्या उद्भत हावभावांनी नवरसांचे प्रकटीकरण म्हणजे नृत्य अथवा खरे म्हटले म्हणजे तांडव; आणि मूर्तीकरण म्हणजे केवळ भांडी घडणे नव्हे, तर घनाकृतीच्या उठावांनी नवरसांचे प्रदर्शन करणे. अतिशायनाच्या ह्या गानादी चार कला, साध्या व्यवहाराच्या भाषादी चार कला, व मूळ ध्वन्यादी चार साधने, मिळून विचारविकारप्रदर्शनाच्या बारा साधनांची कार्ये केवळ इयत्तेच्या चढ उताराने बनलेली आहेत. आता तक्त्यात काव्यादी जी चार साधने मांडली आहेत ती साधेपणा व अतिशायन यांच्या मिश्रणाने अंतर्बाह्य बनलेली आढळतात. गानाचा ठेका व भाषेचे शब्द मिळून काव्याचे गद्यपद्य बहिःस्वरूप बनते; व शब्दांचा अर्थ आणि अतिशायनोद्भूत नवरस मिळून काव्याचे अंतःस्वरूप घडते. अक्षरे व चित्रे यांचा मिलाफ म्हणजे चित्रमय ग्रंथांचे बहिःस्वरूप व अर्थ आणि वस्तूंचे साक्षाद्दर्शन हे त्यांचे अंतःस्वरूप.