Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
३. अध्वनिपदार्थवाचक व जातिवाचक नामे
अनुकरणात्मक ध्वनींच्या द्वारा आपले मनोगत दुस-यांना कळविण्याचा किंवा आपले भूत मनोगत वर्तमानकाली स्वतःचे स्वतःला प्रत्यक्ष करण्याचा हा शोध मनुष्यमात्राच्या प्रगतीच्या इतिहासात मोठा क्रांतिकारक झाला. ज्या समाजात हा शोध अद्याप झाला नव्हता त्या समाजावर हरएक प्रकारे वर्चस्व मिळाले. टेलिग्राफने मनोगत कळविता येणा-या सध्याच्या पाश्चात्त्यांना तदनभिज्ञ हिंदू, निग्रो, चिनी इत्यादी पौरस्त्यांवर जे वर्चस्व मिळालेले आपण पहातो त्याच अपूर्व मासल्याचे वर्चस्व अनुकरणात्मक ध्वनीच्या भाषेचा शोध लावणा-या समाजांना मिळाले. परंतु कोणत्याही शोधाप्रमाणे हा शोध अपुरा भासू लागला. ध्वनी ज्यापासून ऐकू येईल त्या पदार्थांचे व क्रियांचे नामकरण करता आले हा काही थोडाथोडका लाभ झाला असे नव्हे. परंतु ध्वनी ज्यांना नाही असे पदार्थ व वस्तू असंख्य राहिल्या. ह्या असंख्य अध्वनी वस्तूंचे व क्रियांचे प्रदर्शन येथपर्यंत हावभावाने होत असे. कावळा मांस खातो, हा आशय कळविण्याला अनुकरणार्थ काक हा शब्द उच्चारावा, अध्वनी जे मांस त्याचा तुकडा दाखवावा, खाण्याची क्रिया बक्, भक्, भक्ष या अनुकरणात्मक ध्वनीने ऐकवावी व वर्तमानकालाचा बोध हात किंवा बोट खाली करून दर्शवावी, इतका खटाटोप करावा लागे. ध्वनी व हावभाव यांचे मिश्रण करून मनोगत कळविण्याची ही त-हा शेकडो वर्षे चालली. ह्या मिश्र त-हेत कान, तोंड, डोळे व हात अशा चार साधनांचा उपयोग करावा लागे. ही त-हा उजेडात बरीच कामास पडे. परंतु अंधारात ही फारच लुली व तोकडी भासे. ज्यांना ध्वनी नाही त्या पदार्थाचे व क्रियाचे प्रदर्शन ध्वनीने कसे करावयाचे ऊर्फ त्यांना नांवे कशी द्यावयाची ही अडचण विचारप्रदर्शनाच्या प्रगतीत अत्यंत संकटाची होती व ती काढून टाकण्याला मनुष्याला फार कालावधी लागला असावा. कालांतराने कोण्या कल्पकाला अध्वनी पदार्थांना व क्रियांना सध्वनी पदार्थांच्या व क्रियांच्या आधाराने नांवे देण्याची युक्ती सुचली. दाह किंवा उकाडा झाला असता मराठीत हुषू हुषू असा उद्गार आपण काढतो. वैदिक लोकांचे पूर्वज उष् उष् असा दाहदर्शक उद्गार काढीत. हाच दाहार्थक उद्गार पाणिनीने आपल्या धातुपाठात 'उष् दाहे' म्हणून दिला आहे. ह्या दाहार्थक उष् उद्गारावरून जळजळींत वाळूमधून उन्हाच्या तडाक्यात मनुष्याला वाहून नेणा-या प्राण्याला उष्ट्र म्हणून शब्द निर्माण झाला. उषू म्हणजे दाह, त्यातून तारून नेणारा तो उष्ट्र. दाह करणा-या वनस्पतिरहित ओसाड जागेला उषर व दाहाचा प्रतिकार करणा-या डोक्यावरील आच्छादनाला उष्णीष नांव पडले. त्या प्राण्याच्या अवाजावरून उष्ट्र हे नाव पडलेले नाही. सबब असा तर्क करता येतो की आर्यांच्या अत्यंत प्राथमिक मूलस्थानात उष्ट्र प्राणी नव्हता. ह्या उद्गारावरून प्रभातवाचक उषा, संध्यारागवाचक उषस व ऊनवाचक उष्ण हे तीन अध्वनी शब्द अस्तित्वांत आले. उषा, उषस् , उष्ण इत्यादी शब्दांत जे प्रत्यय संस्कृतभाषा बोलणारे लावीत ते प्रत्यय संस्कृतभाषा बोलणा-यांचे हजारो वर्षांपलीकडील पूर्वज लावीत नव्हते. प्रत्ययाऐवजी ते प्रत्ययार्थक सबंध शब्दच योजीत.