Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

विकार-विचार प्रदर्शनाच्या साधनांची उत्क्रांती

१. सहज विक्षेप अभिप्रायसूचक

मनात संकल्पविकल्प येतात. त्यांचे प्रदर्शन मनुष्यादी प्राणी अनेक त-हांनी करतात. मुख, दंत, जिव्हा, नासिका, कर्ण, नेत्र, हस्त, पाद व इतर अंगे यांच्या विक्षेपांनी संकल्पविकल्प दाखविता येतात किंवा दिसले जातात. ह्या साधनाला विक्षेपसाधन म्हणतात. हे साधन सर्वांत साधे. ह्या विक्षेपसाधनाला जल, वायू, अग्नी, आकाश वगैरेंचे साह्य लागत नाही. मुखाने वेडावणे, दात काढणे, स्मित करणे, जिभल्या दाखवणे, मिशीवर हात फिरविणे, केस पिंजारणे, माथा तुकविणे, भुवया चढविणे, कपाळाला आठ्या घालणे, कान टवकारणे, गाल फुगवणे, नाक चढवणे किंवा फेंदारणे, डोळे मिचकावणे, फाडणे, लाल करणे, हातवारे करणे, आंगठा दाखविणे, बोटे मोडणे, मूठ दाखवणे, हात चोळणे, लाथ मारणे, वाकुल्या दाखविणे, शेपूट हलवणे, खुराने जमीन उकरणे, पंख फडफडविणे, फणा हपटणे, सोंड फिरविणे, लंगडशाई करणे, नाचणे, उडणे, बागडणे, धावणे, उताणे पडणे, कुशीवर पडून मेल्याचे सोंग घेणे, लोळणे, नमणे, नमस्कार करणे वगैरे संकल्पविकल्प दाखविण्याचे शेकडो प्रकार साध्या विक्षेपांत पडतात. बोलणे, सूर काढणे, हंसणे, हुंगणे, खाजवणे, टाळी वाजविणे, खाक वाजविणे, चुटक्या वाजविणे, शीळ घालणे, फू करणे, थुंकणे, खेकसणे, आरडणे बोंबलणे, शंख करणे, खिदळणे, गुरगुरणे, केंकाटणे, कोंकणे, भोंकणे, आरवणे, चिव' चिवणे, किचकिचणे, दात खाणे, जीभ टाळूवर हापटणे, सुस्कारणे, कोल्हेकुई करणे, हंबरणे, टिवटिवणे, मचमचणे, ललकारणे, गुणगुणणे, तणतणणे, फणफणणे, कटकटणे, हळहळणे, तळतळणे, थैमान करणे, चुंबन करणे, चाटणे, आलिंगणे, कुरवाळणे, चिमटे काढणे, गुद्दे मारणे, रट्टे देणे, लाथाडणे, ढकलणे वगैरे शेकडो प्रकारात स्वेतर व्यक्ती, पृथ्वी, जल, वायू, आकाश वगैरे बाह्य पदार्थांचे साह्य घेऊन संकल्प-विकल्प दाखविले जातात.