Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

हा दुसरा प्रकार मिश्र आहे. हे दोन्ही प्रकार सर्वस्वी सहज म्हणजे जन्मसिद्ध असून मनुष्यातल्याप्रमाणेच पशुपक्ष्यादींत दृष्टीस पडतात. हे कोणी कोणाला शिकवावे लागत नाहीत; कारण प्राण्यांच्या त्या त्या अवयवांचे हे धर्मच आहेत. प्राणित्वाची घटनाच अशी आहे की आंतर किंवा बाह्य कारणांचा आघात झाला असता प्रत्याघात ह्या प्रकारांचे रूप घेऊन अवश्यमेव प्रगट होतो. उपरिनिर्दिष्ट सर्वच विक्षेप सर्वच प्राण्यांत प्रादुर्भूत होतात असे नाही. आनंदाने किंवा कृतज्ञतेने किंवा समाधानाने लांगूलविक्षेप कुत्र्यांत उत्कटत्वाने दृश्यमान होतो. लांगूलाभावास्तव मनुष्यात हा विक्षेप संभाव्यच नाही. हसणे मनुष्यास शक्य आहे; पण कान टवकारणे प्रायः नाही. प्रायः म्हणण्याचे कारण असे की कानाच्या शिरा हलविण्याचे सामर्थ्य क्वचित् मनुष्यांत आढळून आल्याचे ग्रंथांतरी लिहिलेले आठवते. सांगण्याचा मुद्दा एवढाच की वर नमूद केलेले विक्षेप प्राणिमात्रांत सहज ऊर्फ जन्मसिद्ध असतात. कृत्रिम ऊर्फ यत्नसिद्ध नसतात.