Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

आस्तेआस्ते प्रत्ययार्थक सबंध शब्दांचे संक्षेप होता होता साक्षात् प्रत्यय निर्माण झाले. परंतु सप्रत्यय भाषेचा काल फार अलीकडील आहे. सध्या ज्या हजारो, किंबहुना लाखो वर्षांपलीकडील भाषेसंबंधी बोलणे चालले आहे तो काल अप्रत्यय भाषेचा होता. प्राणी व वस्तू यांच्या ध्वनीच्या अनुकरणात्मक शब्दांनी बनलेल्या त्या लाखो वर्षांपूर्वील प्राथमिक अप्रत्यय भाषेचा वैदिक किंवा संस्कृत भाषा कदाचित् पंचवीस-तिसावा अपभ्रंश असण्याचा यद्यपि पूर्ण संभव आहे, तत्रापि त्या ध्वन्यनुकारक अप्रत्यय प्राथमिक भाषेचा मागमूस अद्यापही संस्कृत भाषेत बराच राहिलेला आहे. हा मागमूस पाणिनीने दाखवून दिलेला आहे. धन्य आहे ह्याच्या पृथक्करण शैलीची की बहुतेक सर्व संस्कृत शब्दांची धातुबीजे प्रत्ययोपसर्गांची टरफले सोलून काढून त्याने धुतल्या तांदुळाप्रमाणे मोकळी करून ठेविली आहेत. पाणिनीय धातुकोशातील धातू व इतर धातू यांची परीक्षा करता आम्हास असे आढळून आले आहे की सुमारे सातशे धातू ध्वन्यनुकरणोत्पन्न आहेत. कित्येक एकध्वन्यात्मक आहेत व कित्येक अनेक ध्वनींच्या संयोगापासून झालेले आहेत. याशिवाय बोलण्याच्या भाषेत चिमचिम, गपगप, फसफस, धपधप इत्यादि ध्वन्यनुकारक धातु पाणिनीने व कोशकारांनी जे दिलेले नाहीत, परंतु संस्कृत ग्रंथांतून वारंवार जे भेटतात व जे केवळ बोलण्यात होते असे मराठीतील त्यांच्या अपभ्रंशावरून अनुमानता येते ते हजारो निराळेच. तात्पर्य, लाखो वर्षांपूर्वील आर्यपूर्वज प्राथमिक मनुष्याला किंवा मनुष्यसमाजाला हजारो ध्वन्यनुकारक शब्दांची भाषा अवगत होती आणि अशी स्थिती असणे काही विचित्र नाही. मुळीं बोलणे म्हणजे विकार, विचार, वस्तू व क्रिया ह्यांचे प्रदर्शन मुखातील ध्वनींनी करणे. जो जो म्हणून काही अनुभव आला त्याचे प्रदर्शन मुखध्वनीने करण्याच्या या कलेचे सारसर्वस्व म्हणजे सर्व ब्रह्मांड ध्वनिरूप करून दाखवावयाचे. कोणत्या प्राथमिक समाजाने ब्रह्मांडाचा कितवा भाग कोणत्या त-हेने ध्वनिमय केला असेल हे त्या त्या समाजाच्या बहिःसृष्ट्यनुभवावर व प्रतिभेवर अवलंबून राहणार हे उघड आहे. सध्या आपल्या भोवतील प्राण्यांचे व पदार्थांचे जे आवाज आपण ऐकतो त्याहून भिन्न असे आवाज लाखो वर्षांपूर्वील प्राथमिक मनुष्यसमाजाने ऐकिले असतील हे सांगावयास नको. तत्कालीन दोन सोंडाचे हत्ती किंवा पन्नास हात लांबीच्या सुसरी कोणता ध्वनी करीत असतील अगर तत्कालीन नद्या, झाडे कोणता आवाज करीत असतील त्याची सध्या आपणास कल्पनाही नाही.