Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
अप्रत्ययान्त केवळ शुद्ध शब्दजन्य जी प्राणिनामे ती अत्यंत प्राथमिक धरण्याचे कारण असे आहे की शब्दज्ञान हे, स्पर्शज्ञान वगळले असता, सर्व ज्ञानांत अत्यंत प्राथमिक असते व ते कर्णेंद्रियावरती आघात भानगडीवाचून करते. एका आकाशतत्त्वाचे तेवढे साहाय्य ह्या ज्ञानाला पुरे होते. रंगावरून, गतीवरून किंवा क्रौर्यादि गुणांवरून जी ज्ञाने होतात त्यांना पृथ्वी, तेज, वायू इत्यादी अनेक मिश्र उपाधींचे साहाय्य लागते. स्वल्पश्रमाने बहुत लाभ करून घेण्याचा प्राणिमात्राचा स्वभाव पहाता, शब्दजन्य प्राणिनामे सहज सुचणारी अतएव सर्वोत पुरातन समजणे न्याय्य होते. रात्र असो, दिवस असो, प्राणी दिसो वा न दिसो, शब्दावरून त्याचे अस्तित्व मनुष्याला प्रतीत होते. अस्तित्व प्रतीत झाल्यावर, तो शब्द करणा-या प्राण्याची ओळख इतर मनुष्यांना पटविण्याकरिता किंवा तो प्राणी अंतर्धान पावला असता त्याच्या संबंधाने इतरांशी बोलताना, कर, कुर, इन् इत्यादी प्रत्यय न लावता (कारण, प्रत्यय त्याकाली अस्तित्वातच आलेले नसतात.) त्या प्राण्याच्या शब्दाचे होईल तितके हुबेहुब अनुकरण करून त्या प्राण्याची आठवण इतरांना करून देण्याची खटपट मनुष्य करतो. येथे केवळ गुणाने गुणीचा निर्देश करण्याचा शोध मनुष्याला सहजगत्या होतो. गुण आणि गुणी ह्यांच्यामधील भेद ह्या काली त्याला होत नाही. शब्दांवरून प्राण्यांना ज्याप्रमाणे तो नामे देतो त्याचप्रमाणे तो रहातो त्या टापूतील एकोनएक ध्वनि ज्या सजीव पदार्थापासून साक्षात् निघतात किंवा निघाले अशी त्याची समजूत होते त्या ध्वनीवरून नदी, धबधबा, झाड, मेघ इत्यादी सजीव पदार्थांना तो नामे देतो. ह्या त-हेने पदार्थदर्शक शेकडो ध्वनींचा साठा मनुष्याजवळ साचतो. मनुष्याचा हाच पहिला शब्दकोश होय. ह्या सजीव पदार्थदर्शक ध्वनींबरोबरच धडपडणे, घोरणे, हुंगणे, फरफटणे, कुरकुरणे, थापणे, थापटणे इत्यादि क्रियाचेही ध्वनी तो ओळखू व नामाथू लागतो व त्या क्रियांचे नामकरण त्या ध्वनीनी करतो. विशिष्ट ध्वनींनी विशिष्ट पदार्थ व क्रिया यांचे विशिष्ट निर्देशन व प्रत्यभिज्ञान करूंन देण्याचे सामर्थ्य ज्या काली त्याला येते त्या काली भाषा म्हणून जिला म्हणतात तिची दोन मुख्य अंगे-नाम व क्रिया ह्यांचे दर्शक ध्वनी- यांचा अपूर्व शोध त्याला लागतो. येथेच परिपूर्ण भाषा निर्माण झाली. भाषा म्हणजे दुसरे तिसरे काही नाही. मुखातून निघू शकणा-या शब्दांनी क्रियांचे व पदार्थाचे आविष्करण करण्याची कला. ध्वनी काढण्याला तोंड व ते ऐकण्याला कान ह्या दोन इंद्रियांची साधने या कलेला बस्स होतात आणि दोन्ही साधने बहुतेक प्रत्येक मनुष्यापाशी असतात.