Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

हा प्रश्न सुटावयाचा म्हणजे त्या त्या प्राण्याचे मूळ वसतिस्थान किंवा जन्मस्थान कोणते त्याचा निश्चय झाला पाहिजे. समजा की हिमालयोत्तरप्रदेशात कावळा नाही व हिमालयदक्षिणप्रदेशात आहे. तसेच अशीही कल्पना करा की वैदिक भाषा बोलणारे ऋषींचे मूळस्थान हिमालयोत्तर मेरूपर्वतावर होते; तर काक हा शब्द हिमालयाच्या दक्षिणेस उतरल्यावर वैदिक ऋषींच्या भाषेत आला असे अनुमान सहजच निघते. हा काक शब्द ऋषींच्या पूर्वीच्या रानटी जातीत निर्माण झालेला ऋषींनी उचलला असेल व तो बराच जुना ठरेल. जुना म्हणजे एक लाख किंवा पाच लाख वर्षांचाही जुना ठरेल. भुस्तरशास्त्राप्रमाणे मनुष्य ह्या पृथ्वीवर वावरत असलेल्याला लाखो वर्षे लोटून गेली आहेत. ह्या लाखो वर्षांत त्याची प्रगती अत्यंत मंदगतीने होत असलेली अनुमानास येते. भाषणादि मुखविक्षेप तो आज लाखो वर्षांपासून करीत आला आहे व विशिष्ट ध्वन्यादी आघातांवरून वस्तूंना नामे देण्याचा शोध त्याला लाखो वर्षांच्या पूर्वीच लागलेला आहे. नवेनवे प्राणिशब्द कानावर पडताच भाषेत नवी प्राणिनामे वेळोवेळी तो बनवीत आल्याचे भाषेतिहासावरून व व्युत्पत्तीवरून दृष्टोत्पत्तीस येते. तात्पर्य, प्राणिशब्दजन्य प्राणिनामे अत्यंत जुनी. संस्कृत किंवा वैदिक भाषेतील अत्यंत जुनी असे म्हणण्याचा आशय नाही, तर मानववंशातील कोणत्या तरी त्या किंवा शेजारच्या शाखेतील माणसाच्या भाषेतील अत्यंत जुनी. वैदिक ऋषींना काक शब्द हिमालयदक्षिणप्रदेशात आल्यावर माहीत झाला असेल; परंतु ऋषींच्या पूर्वीचे जे रानटी लोक ह्या देशात होते त्यांच्या भाषेत तो रूढ व जुना होता.