Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
भा भा ध्वनी करणा-या उज्वल व लखलखीत रंगाच्या पशुपक्ष्यांवरून प्रकाशाला भा हा शब्द मनुष्य लावू लागला. चोचीने, सोंडेने, पायाने किंवा दातांनी पदार्थ करकरा फाडण्याच्या किंवा खाण्याच्या ध्वनीवरून कर हा शब्द सोंडेला किंवा चोचीला किंवा स्वतःच्या हाताला लावण्याची बुद्धी मनुष्याला झाली व कृ करणे व कृ विदारणे हे दोन धातू निर्माण झाले. एणेप्रमाणे गुणांचे शब्दांनी प्रदर्शन करण्याची युक्ती सापडल्यापासून मनुष्याने शब्दांची केवळ टांकसाळ मांडिली.
द्रव्य, कर्म व गुण ह्यांचे दर्शक शेकडो शब्द मनुष्यापाशी साठले. तेव्हा त्यातील जाती ओळखण्याचा म्हणजेच व्यक्ती ओळखण्याचा आणीक एक शोध त्याला लागला. हिरवा, पांढरा, तांबडा, काळा इत्यादी अनेक वर्ण पाहून त्या सर्वांना सामान्य असा रंग हा शब्द त्याने मुकरर केला. रंज् हा मूळ लालभडक रंगाचा द्योतक शब्द होता. त्या शब्दाला सामान्यार्थक बनवून रंग हे जातिनाम मनुष्याने उत्पन्न केले, आणि अशी अनेक जातिनामे तयार केली. नंतर महत्कालान्तराने शास्त्रीय ज्ञानाचा अहंकार झाल्यावर जाती अगोदर की व्यक्ती अगोदर हा वाद तो घालू लागला जातिकल्पना मनुष्याच्या डोक्यात स्वयंभू आहे आणि भूतभविष्य-वर्तमान सर्व व्यक्तींना व्यापून जाती असते, असा निरर्गल सिद्धान्तही तो ठोकून देऊ लागला. वस्तुतः जातिनामे भाषेच्या व बोलण्याच्या सोईंकरता केवळ सांकेतिक आहेत व त्या नामांनी दर्शविलेला अर्थ मूर्त नसून केवळ मानसिक असतो हे त्याच्या लक्ष्यात परवा परवापर्यंत येईना. जातीचा मानसिक अर्थहि जसजशी माहिती वाढत जाते तसतसा बदलत जातो व कधी कधी अजिबात नष्ट होतो; सबब जातिकल्पना स्वयंभू, स्थिर व व्यक्तिप्राक् नाही, हेही तो ध्यानी धरीना. हा जाति-व्यक्तिवादाचा घोटाळा पुढला आहे; परंतु त्याचा उगम प्राथमिक मनुष्यसमाजात लाखो वर्षांपूर्वीच झालेला असल्यामुळे प्रस्तुत स्थली उल्लेख्य झाला. पुढे जरी असा हा घोटाळा जातिनामांनी केला, तत्रापि भाषेच्या व विचाराच्या प्रगतीला जातिनामे जशी सध्या तशीच किंवा त्याहूनहि जास्त पुरातनकाली उपकारक झाली. त्या पुरातनकाली मराठी भाषेची पूर्वज जी वैदिक भाषा तिची पंचवीस-तिसावी पूर्वज जी प्राथमिक अप्रत्यय भाषा ती निव्वळ सुट्या ध्वनींची होती.