Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

९. रानटी ऋषिपूर्वज आगटीच्या भोवतील जमातीच्या जागी केवळ प्रजोत्पादन कर्म करूनच स्वस्थ बसत नसत. तेथे ते मादक सोमरस पीत, गाणी गात व नाचत बागडत. रानटी ऋषिपूर्वजांच्या गाण्यापासून पुढे त्रिष्टुभू, अनुष्टुभू, गायत्री इत्यादी छंद निघाले व सामगायन म्हणून ज्याला पुढे संज्ञा मिळाली ते गान उत्पन्न झाले. रानटी नाचण्यापासून पुढे नृत्यकला उद्भवली, आणि रानटी पूर्वजांच्या चालीरीतीची जी नक्कल वैदिक काली साक्षेपाने होऊ लागली त्या नकलेपासून नाटक किंवा नाट्यकला म्हणून जिला पुढे प्रौढ नामाभिमान मिळाले ते जन्मास आले. अश्वमेध यज्ञातील घोड्यापुढील राजस्त्रियांचा विलाप अथवा विलास आणि त्या विलासातील स्त्रीपुरुषांची संभाषणे, हे एक छोटेसे बीभत्सरसात्मक नाटकच आहे. अश्वमेधाची समाप्ती करताना आरतीची जेव्हा वेळ येते, तेव्हा ऋत्विज ऋचा म्हणतात, स्त्रिया गाणी गातात व दासी नृत्य करतात. डोक्यावर मद्याच्या घागरी घेऊन पायानी ताल धरीत धरीत इदं मधु (हें मद्य) हे शब्द गात गात आठ दासी यज्ञभूमीवर येतात, तेव्हा यजमनाला आपण मोठे पुण्यवंत व भाग्यशाली आहोत अशी कृतकृत्यता वाटली म्हणून तैत्तिरीय संहितेत लिहिलेले आढळते (कांड ७, प्रपाठक ५, अनुवादक ११, शेवट).