Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
वरील निषेधांत स्वतःच्या मालकीच्या स्त्रीशी ती अनुपयुक्त योनी असता दुस-यांच्या मालकीच्या स्त्रीशी व स्वत:च्या किंवा दुस-याच्या कोणाच्याही मालकीची नाही अशा कोणत्याही स्त्रीशी अग्निचयनानंतर समागम करू नये, असे सांगितले आहे. म्हणजे हा निषेध प्रस्थापित होण्याच्या पूर्वी अग्नी सिद्ध केला असताही स्वस्त्रीशी किंवा दुस-याच्या स्त्रीशी किंवा कोणत्याही स्त्रीशी समागम केला असता चाले, असा गर्भितार्थ निघतो. हा निषेध प्रस्थापित होण्याच्या पूर्वी चाल अशी असे की, अग्निकुंडाजवळ प्रजापती स्वस्त्रियांशी समागम करत, किंवा कोणाच्याच मालकीच्या नाहीत अशा दासस्थितीतील दासीशी समागम करीत. एके काली अशी स्थिती होती. पुढे नीतिमत्ता वाढून, स्वपरभाव वृद्धिंगत होऊन काही सज्जनांना असे वाटू लागले की, पवित्र म्हणून मानिलेल्या अग्निकुंडावर स्वस्त्रीशी किंवा दुस-याच्या स्त्रीशी समागम करणे नीतिमत्तेचे नव्हे. तेव्हा काही लोकांनी आपल्या अग्निचयनप्रक्रियेत स्त्रीसमागम निषिद्ध मानला, परंतु हा निषेध समाजातील सर्वच व्यक्तींना पसंत पडला असे नाही. काही लोकांचे असे म्हणणे पडले की, अग्निकुंडावर उबा-याच्या जागी येऊन व स्त्रीसमागम करून आपली प्रजावृद्धी होत्ये व मनुष्यबळ वाढते, तेव्हा अग्निकुंडावर स्त्रीगमन करणे आपल्या समाजाच्या मनुष्यबळाला उपकारक आहे, सबब वरील निषेध अनुपकारक अतएव अमान्य समजावा. येणेप्रमाणे समाजात दोन पक्ष झाले, (१) अगमनपक्ष व (२) गमनपक्ष. गमन-पक्षाची विचारसरणी येणेप्रमाणे होती :-
अथो खलु आहुः अप्रजस्यं तद्
यन्नोपेयादिति, तस्मादुपेयाद्रेतसः
अस्कंदाय (५ कांड, ६ प्रपाठक, ८ अनुवाक) आता यावर असे म्हणतात की, समागम केला नाही तर प्रजा खुंटेल, म्हणून रेत वाया जाऊ देऊ नये याकरिता उपगमन करावे.
येणेप्रमाणे गमन पक्षाचे म्हणणे पडले की, अग्निचयन केल्यावरही स्वस्त्रीशी, दुस-याच्य स्त्रीशी किंवा वाटेल तिशी गमन करण्यास हरकत नाही. या विधिनिषेधरूप मंत्रांचे प्रकृत विषयाला उपयोगी असे तात्पर्य एवढेच घ्यावयाचे आहे की, रानटी ऋषिपूर्वज आगटीच्या उबा-यात प्रजोत्पादन करीत असत.