Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

अट्णाराचा मुलगा पर, उशिजाचा मुलगा कक्षीवान्, श्रयसाचा मुलगा वीतिहव्य व पुरुकुत्साचा मुलगा त्रसदस्यु यांनी पुत्रसंततीच्या इच्छेने पंचहविर्युक्त चयन केले, त्यामुळे त्या प्रत्येकाला एकेक हजार पुत्र मिळाले, सबब पंचहविर्युक्त चयन जो कोणी करील त्यालाही तीच प्राप्ती होईल.

यज्ञभूमीवर पंचहविर्युक्त चयन करून पर, कक्षीवान् वीतिहव्य व त्रसदस्यु या चौघांना हजार हजार पुत्र कसे मिळाले ? पंचहवि दिल्याबरोबर आकाशातून एकदम एक हजार पोरे पडली की भूमीतून वर आली ? खरा प्रकार असा असे. शत्रूशी लढण्याला व स्वारी शिकारीची कामे करण्याला प्रजापती म्हणून जे यूथपती असत त्यांना तरुण जवानांची पराकाष्ठेची जरूर भासे. यज्ञ करून म्हणजे शेजारच्या जवानांची जमात करून व त्यांचा स्वयूथातील स्त्रियांशी समागम करून देऊन, करवेल तितकी जास्त प्रजा यूथातील स्त्रियांच्या ठायी हे प्रजापती उत्पन्न करून घेत, त्या प्रजेचे संगोपन करीत व आपले मनुष्यबळ वाढवीत. शत्रूंना जिंकून व दास करून मायेची प्रजा वाढावी तितकी वाढत नसे. सबब यज्ञ म्हणजे जमात करून पोरे उत्पन्न करण्याची प्रजापतींची ही पद्धत असे. प्रजापतिर्यज्ञं असृजत, प्रजापतिः प्रजाः असृजत इत्यादी जी वाक्ये तैत्तिरीयसंहितेत येतात त्यांचा अर्थ एवढाच आहे की धुमीभोवती जमात जमवून प्रजापती प्रजा उत्पन्न करून आपले मनुष्यबळ वाढवीत. धुमीभोवती प्रजोत्पादनादिक्रियार्थ एके ठिकाणी जमणे असा यज्ञ या शब्दाचा मूळ अर्थ रानटी ऋषिपूर्वजांच्या भाषेत होता. तोच यज्ञ हा पूर्वपरंपरागत वडिलार्जित शब्द रानटी ऋषिपूर्वजांचे सुधारलेले वेदकालीन वंशज अग्नीत हवी देऊन इष्टकामना सिद्ध्यर्थ देवांना आराधिणे या अर्थाने योजीत. अग्नी व यज्ञ या दोन वस्तूंचा असा हा इतिहास आहे. यज् न् ते जमून प्रजोत्पादन करतात, असा यज्ञ या शब्दाचा जसा मूळार्थ आहे, तसाच यजुस् या शब्दाचाही आहे. यज् या जोड धातूपुढे उस् अथवा उर् हे सर्वनाम येऊन यज् उर् असे रानटी ऋषिपूर्वजांच्या भाषेत वाक्य असे त्या वाक्यापासून यजुर् यजुस् हा शब्द निघाला आहे. न् (अन् , न्त) हे जसे प्रथम पुरुषाच्या अनेकवचनाचे सर्वनाम आहे, तसेच ते च उर् किंवा उस् हे ही प्रथम पुरुषानेकवचनार्थक सर्वनाम आहे. यजुस् म्हणजे ते यजतात. यज्ञ व यजुस् ही वाक्ये मुळातच अनेकवचनी असल्यामुळे अनेक लोकांनी जमून अग्निद्वारा ईश्वरोपासना करणे असा त्यांचा अर्थ आहे. इष्टि हा शब्द इज् (यज्) + ति असा मुळात वाक्यात्मक होता. इज् + ति म्हणजे तो अग्नीजवळ जाऊन प्रजोत्पादन करतो, असा एकवचनार्थक प्रयोग मुळात होता. इज़ + ति या वाक्यापासून ज् चा ष् होऊन इष्टि हा वैदिक शब्द जन्मास आलेला आहे. तात्पर्य यज्ञ यजुष् , इष्टि या तिन्ही शब्दांचा मूलसंबंध आगटीभोवतालील प्रजोत्पादनकर्माशी होता. सबब विवाहादी प्रजोत्पादनसंबंधक विधानात अग्नीची समक्षता वैदिक ऋषींना परंपरागत म्हणजे पूज्य म्हणून अत्यावश्यक वाटे.