Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
७४. पाणिनी शकपूर्व १००० च्या सुमारास होऊन गेला आणि कात्यायन त्याच्यानंतर सुमारे सहाशे वर्षांनी व पतंजली आठशे वर्षांनी होऊन गेले. शकपूर्व १००० पासून शकपूर्व २०० पर्यंतच्या आठशे वर्षांत ब्राह्मणक्षत्रियवैश्य क्षुद्र यांच्या सामाजिक स्थितीत जे ठळकठळक फेरफार होऊन गेले व ज्यांच्यामुळे धर्मशील ब्राह्मण सर्व क्षुद्र, सर्व स्त्रिया, सर्व असूयक आणि काही क्षत्रिय व काही वैश्य यांना तिरस्काराने वागवू लागले, त्या फेरफारांचे वर्णन मुख्यत: स्मृतिग्रंथांच्या व इतिहासाच्या आधाराने करितो. पैकी, प्रथम असूयकांना वाटेस लावू. लोकायतिक, बौद्ध, जैन इत्यादी सनातनधर्मद्वेष्ट्यांचा उदय पाणिनी व कात्यायन ह्यांच्या कालांच्या दरम्यान झाला व त्या उदयाची परमसीमा पतंजलीच्या काली झाली. पाणिनीकाली बौद्ध, जैन वगैरे पाखंडी लोक मुळी अस्तित्वातच नसल्यामुळे, त्यांच्या प्रत्यभिवादनासंबंधाने अष्टाध्यायीत बिलकूल उल्लेख नसावा हे साहजिक आहे. कात्यायनकाली व पतंजलीकाली बौद्ध, जैन वगैरे असूयक म्हणजे सनातनधर्मद्वेष्ट्या लोकांचा समाजात पराकाष्ठेचा सुळसुळाट झाला, अर्थात धर्मशील ब्राह्मण त्यांना प्रत्यभिवादन करीत नसत व त्यांच्या अभिवादनाला विशेष किंमत देत नसत. बौद्ध व जैन हे ब्राह्मणांचे गुरुत्व मानीत नसत व ब्राह्मण त्यांना आपल्या शिष्यवर्गात गणीत नसल्यामुळे, त्यांना प्रत्यभिवादन करण्यास शिष्टाचाराने बांधले गेले नसत. पाणिनीकाली सर्व चातुर्वर्णिक समाज ब्राह्मणांचा अनुयायी होता. पतंजलीकाली समाजातील बराच मोठा भाग चातुर्वर्ण्य सोडून बुद्ध व जिनयांचा अनुयायी बनला होता. असूयकांशी दूरीभाव ब्राह्मणांनी काय कारणांनी धरिला त्याची हकिकत ही अशी अगदी स्पष्ट व उत्तान आहे.