Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य स्त्रीपुरुषांच्या नावातील अंत्य स्वर जे अ, इ, ए, जे प्रत्याभिवादक गुरू आ, ई, आ३इ असे प्लुत उच्चारीत. परंतु, क्षुद्र स्त्रीपुरुषांच्या नावातील अंत्य अ किंवा ए प्लुत न उच्चारता फक्त एकेरी तुटका उच्चारीत. इथे प्रश्न असा येतो की, त्रैवर्णिकांच्या नावाचा उच्चार प्लुत का आणि क्षुद्रांच्या नावाचा उच्चार प्लुत का नाही? या प्रश्नाला उत्तर असे आहे की, गुरूला त्रैवर्णिकासंबंधाने जो आपलेपणा व जी माया वाटे तो आपलेपणा व ती माया क्षुद्रासंबंधाने पाणिनीकाली वाटत नसे. सध्या आपणही असेच करतो. माया दाखवावयाची असली म्हणजे विशेष नामांचा अंत्य स्वर प्लुत उच्चारतो व माया न दाखविता तुटकपणा दाखवावयाचा असला म्हणजे विशेषनामांचा अंत्य स्वर तुटक व आखुडता उच्चारतो. रामाआआ! ये हो! हे प्लुत उच्चार करण्यात व राम्या! निघ जा! हे आखुडते उच्चार करून, आपण काय दर्शवितो. प्लुत उच्चार करून आपला पुत्र जो राम तद्विषयक आपलेपणा आपण दाखवितो आणि आखुडता उच्चार करून घरचा गडी जो राम्या तद्विषयक अनादर व हुकमत दाखवितो. तोच प्रकार पाणिनीकालीही विद्यमान होता. त्रैवर्णिक आपले आहेत, सबब त्यांना आदर दाखवीत; क्षुद्र आपले नव्हेत, हुकमी आहेत असे वाटे, सबब त्यांचा अनादर होई. अशी स्थिती पाणिनीकाली होती. आता पाणिनीनंतर पाचसहाशे वर्षांनी झालेला जो कात्यायन तो काय सांगतो ते पहा. पाणिनीकाली त्रैवर्णिक जसे पुरुष तशा त्रैवर्णिक स्त्रियाही मायेचा व आपलेपणाचा विषय असल्यामुळे, त्यांच्या नावातील अंत्य स्वर मायेने प्लुत उच्चारीत. कात्यायनकाली हा प्रघात बंद पडला. कात्यायन लिहितो, स्त्रियां न:, स्त्रियांच्या नावातील अंत्य स्वर प्लुत उच्चारू नये, तुटक व आखुडता उच्चारावा. तसेच, या सूत्रावर कात्यायन दुसरे एक वार्तिक लिहितो; राजन्यविशां वेति वाच्यं. क्षत्रिय आणि वैश्य यांच्या नावातील अंत्य स्वराचा उच्चार विकल्पे करून प्लुत करावा किंवा न करावा. या विकल्पाचा अर्थ असा होतो की, क्षत्रिय आणि वैश्य यांना माया व आपलेपणा प्रसंगी दाखवावा किंवा प्रसंगी न ही दाखवावा. एकाच मनुष्याची अशी दोन त-हेने प्रत्यभिवादना करावी असे सांगण्याचा कात्यायनाचा आशय नाही. तर क्षत्रिया क्षत्रियात व वैश्या वैश्यात तारतम्य पाहून प्लुत किंवा अप्लुत संभावना करावी. तात्पर्य, पाणिनीच्या वेळेस एकटी क्षुद्रजात तेवढी मायेतून वगळली जात असे; कात्यायनकाळी क्षुद्रांना तर वगळीतच, परंतु त्यांच्याबरोबर चारही वर्णांच्या दरोबस्त स्त्रियांना आणि क्षत्रिय व वैश्य यातील काही व्यक्तींना मायेतून ब्राह्मणांनी कमी केले होते. सर्व स्त्रिया, काही क्षत्रियवैश्य व सर्व क्षुद्र एवढ्यांनाच कात्यायनकाली ब्राह्मणांनी मायेतून कमी केले होते असे नव्हे, तर कात्यायनाच्या नंतर दोनशे वर्षांनी झालेल्या पतंजलीच्या काली ब्राह्मणांहीपैकी काही लोक ब्राह्मणांच्या मर्जीतून उतरले होते. अक्षुद्रस्रयसूयकेषु, असे पतंजली नमूद करतो. असूयक म्हणजे ब्राह्मणधर्माचा मत्सर करणारा असा जो कोणी व्यक्ती असेल, मग तो ब्राह्मण असो की कोणी असो, त्याचा धर्मशील ब्राह्मण धिक्कार करीत. असूयकस्त्वमसि जाल्म, न त्वं प्रत्यभिवादमर्हसि, धर्माची अवहेलना करणारा वृषल आहेस, जळो तुझे तोंड, प्रत्यभिवादनास तू अपात्र आहेस, असे पतंजलीचे शब्द आहेत. तात्पर्य, सर्व स्त्रिया, सर्व क्षुद्र, काही क्षत्रियवैश्य आणि सर्व असूयक, यांच्यावरील माया धर्मशील ब्राह्मणांनी कमी केली होती. अशी ही इतकी माया कमी करण्याचे कारण काय? पाणिनी व कात्यायनपतंजली ह्यांच्या दरम्यानच्या काळात स्त्रियांच्या, क्षत्रियांच्या, वैश्यांच्या व ब्राह्मणांच्या सामाजिक स्थितीत असे कोणते भयंकर फेरफार व बदल झाले होते की हे सर्व लोक ब्राह्मणांच्या मायेस अशा विलक्षण त-हेने पारखे व्हावे? प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, इतक्या पराकाष्ठेच्या महत्त्वाचा की त्याचा साद्यन्त उलगडा करणे परम अगत्याचे भासते.