Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
७५. क्षत्रिय व वैश्य यांच्यापैकी काहींशी ब्राह्मणांनी जो दूरीभाव स्वीकारिला त्याची कारणे वरच्यांच्याहून किंचित निराळी आहेत. पाणिनीकाली सर्व क्षत्रिय व वैश्य सनातनधर्माचरणी होते. कात्यायनपतंजलीकाली ह्या क्षत्रियवैश्यांपैकी काहीत यज्ञादी वैदिक क्रियांचा लोप होऊन ते केवळ वृषल म्हणजे क्षुद्रसम बनले. असे जे लुप्तक्रिय क्षत्रियवैश्य होते ते यद्यपि दिसण्यात क्षत्रियवैश्यांसारखे दिसत, तत्रापि क्रियाच्युत झाल्यामुळे ब्राह्मणांच्या आदरास अपात्र ठरले. चंद्रगुप्त मौर्य एवढा पराक्रमी की त्याने विस्तीर्ण साम्राज्य स्थापन केले, परंतु त्याला कौटिल्य क्रियालोपास्तव, रे वृषल! म्हणून संबोधी. जे वैश्यक्षत्रिय बुद्धजिनाद्यनुयायी बनले होते त्यांच्यात व ह्या वृषलात अंतर एवढेच की ते सपशेल धर्मच्युत होऊन गेले होते व हे फक्त लुप्तकर्म बनले होते म्हणजे क्षुद्रसम झाले होते. अशा क्षुद्रसम वृषलप्राय वैश्या क्षत्रियांचे प्रत्यभिवादन करणे धर्मशील ब्राह्मणांना अनन्वित वाटू लागले. जे वैश्यक्षत्रिय सनातन क्रियांचे आचरण करीत त्यांचे प्रत्यभिवादन ब्राह्मण आनंदाने करीत; परंतु, ज्यांच्यात यज्ञोपयलयनादी क्रियांचा लोप झाला होता त्यांचा प्रत्यभिवाद करणे ब्राह्मणांना अधर्म्य भासे. हे लुप्तक्रिय वैश्यक्षत्रिय सनातन धर्माच्या व बौद्धजैनादी पाखंडांच्या सीमाप्रदेशावर असत. प्रसंग पडेल त्याप्रमाणे कधी सनातन धर्माकडे झुकत व कधी पाखंडांचा पुरस्कार करीत. ब्राह्मण तिरस्कार करीत, क्षुद्र किंवा वृषल यांच्या पंक्तीस बसवीत, म्हणून अशोकादी सम्राटही बौद्धजैनादींच्या पाखंडांचा पुरस्कार करू लागले. मग लुप्तक्रिय झालेल्या सामान्य वैश्यक्षत्रियांची गोष्टच काढावयाला नको. असा हा फेरफार पाणिनी व कात्यायनपतंजली यांच्या कालांच्या दरम्यान झालेला होता. क्रियाकर्मांतर व धर्मधर्मांतर या बाबीत हे जे भयंकर परिवर्तन झाले त्यांची मुळे स्त्रिया व क्षुद्र यांच्याशी ब्राह्मणक्षत्रियवैश्यादी त्रैवर्णिकांचे जे शेकडो वर्षे वर्तन घडत येत होते त्यात गुरफटलेली आहेत. ती मुळे शोधून काढण्याचा व त्यांची परिनाळिका अथपासून इतिपर्यंत साद्यंत लाविण्याचा उद्योग केवळ बोधप्रदच नव्हे तर मोठा फलप्रद होण्याची शक्यता आहे. फार काय सांगावे, चातुर्वर्ण्याचा इतिहास म्हणजे त्यातील स्त्रिया व क्षुद्र यांचा इतिहास प्रामुख्येकरून आहे. ह्या प्रचंड ऐतिहासिक नाटकात ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य ही तीन पात्रे एका बाजूस आपली आसने सदैव स्थिर करण्यात गुंतलेली दिसतात आणि ती आसने डळमळविण्याचा भगीरथ प्रयत्न करणारे क्षुद्र हे पात्र दुस-या बाजूस जिवापाड मेहनत घेताना आढळते. ह्या झगड्यात विजयश्री कधी ब्राह्मणादींच्या गळ्यात माळ घालते व कधी क्षुद्रावर फिदा होते आणि शेवटी दोन्ही पक्ष हार न खाता तिसरे पात्र जे स्त्री त्याच्याद्वारा, तडजोडीने वेळोवेळी भांडण मिटविताना दृष्टीस पडतात.