Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
७६. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य ही तीन पात्रे एका बाजूस लढाईस सज्ज झालेली दिसतात म्हणून वर सांगितले. त्यातील ब्राह्मण हे पात्र सर्वांत प्रधान समजावे. बाकीची दोन्ही पात्रे ब्राह्मणाच्या अनुषंगाने वागणारी होत. त्यातून वैश्य हे पात्र तर अत्यंत सौम्य व निरुपद्रवी आहे. ऋग्वेदकालाच्या अगदी पहिल्या थराच्याही पलीकडील काळात ब्राह्मण हे एकच पात्र होते. मूलत: ब्राह्मणाचा वर्ण शुक्लभास्वर, मनोरचना देवधार्मिक आणि हव्यास आत्मानात्मविचाराचा. ह्या ब्राह्मण नावाच्या आर्ष लोकांना पामीरच्या पठारावर वर्णाने लाल अशा दुस-या एका लोकांची गाठ पडली. हे रक्तवर्ण लोक शौर्याने सिंहासारखे, क्रौर्याने लांडग्यासारखे, कजाखीने कुक्कुटाप्रमाणे, सोशीकपणाने कुत्र्यासारखे असून, डोक्याचे किंचित मंद असत. ऐतरेयारण्यककाराने तर क्षत्राची व्याघ्राला उपमा दिली आहे. क्षत्रं वा एतद् आरण्यानां पशूनां यद् व्याघ्र:। ह्या मंद डोक्याच्या रक्तवर्ण लोकांवर तीव्र डोक्याच्या शुक्लवर्ण ब्राह्मणांनी बोलू छाप बसविली आणि वेदवाङ्मयात गाजणारे जे ब्रह्मक्षत्रनामक द्वंद ते निर्माण केले. तीव्र डोके व कणखर मनगटे यांच्या बलिष्ठ सामर्थ्यापुढे सर्व शत्रू नामोहरम होऊन ब्रह्मक्षत्राचा सर्वत्र विजय झाला. वर्णभिन्नत्वास्तव व भिन्नयूथत्वास्तव ब्रह्मात व क्षत्रात बेटीव्यवहार अत्यंत प्राचीनकाळी होत नसे आणि पुढेपुढे यद्यपि अल्पस्वल्प होऊ लागला, तथापि बेटीव्यवहारापासून अलिप्त राहण्याचा ब्राह्मणांचा कटाक्ष तेव्हाही सध्याप्रमाणेच जाज्वल्य होता. म्हणजे वर्णशुद्धी राखण्याची बुद्धी ब्राह्मणात फार प्राचीन काळापासून उपजत असलेली दिसते. जातिसंस्था जी पुढे कालांतराने इतक्या अवाढव्य नामारूपास आली तिची मुळे ब्राह्मण समाजात ही अशी फार प्राचीनतम आहेत. शुक्लवर्ण ब्राह्मणांचा व रक्तवर्ण क्षत्रियांचा हा असा द्वंद्वसमास होऊन फार काळ लोटला नाही तो ह्या द्वंद्वाची तिस-या एका पीतवर्ण टोळीशी गाठ पडली. ह्या टोळीतील लोक कृषि, पाशुपाल्य व वाणिज्य करण्यात कुशल असून, स्वास्थ्याच्या कलात ब्रह्मक्षत्राहून जास्त पटाईत असत, परंतु डावपेचांच्या व ठोकाठोकीच्या कामात पंगू असत. ह्या पंगू परंतु द्रव्योत्पादक टोळीला ब्रह्मक्षत्रांनी विश हे नाव ठेविले; परंतु यांचे मूळ पणि असावे व हे पश्चिमेकडील पणि लोकांचे ह्न ज्यांना आधुनिक युरोपियन लोक फिनिशियन व प्राचीन रोमन लोक प्यूनिक म्हणतात त्यांचे ह्न सवंश्य असावे किंवा पूर्वेकडील पीतवर्ण चिनी लोकांशी वंशसंबद्ध असावे. कसेही असो, ह्या पीतवर्ण वीशास सामील करून घेऊन ब्रह्मक्षत्रांनी वेदप्रसिद्ध त्रैवर्ण्य पैदा केले. ब्रह्मक्षत्राचा व विशाचा फार प्राचीन काळी बेटीव्यवहार वर्णभिन्नत्वास्तव व भिन्नयूथत्वास्तव होत नसे हे सांगावयाला नकोच आणि कालांतराने पुढेपुढे यद्यपि क्वचित झाला तत्रापि तो म्हणण्यासारख्या प्रकर्षास कधीच पोहोचला नाही. अशा त-हेने क्रमयोगे करून विकास पावलेले हे त्रैवर्ण्य पामीरप्रदेशातून दक्षिण दिशेने उत्तरकुरु, हिरण्यय, रम्यक, इलावृत, हरिवर्ष, किंपुरुष अशा उत्तरोत्तर दक्षिणेकडील देशातून भारतवर्ष म्हणून ज्यास पुढे म्हणू लागले त्या देशात उतरले. हिमालया पलीकडील उत्तरकुलु व उत्तरभद्र ह्या प्रांतात असताना ह्या त्रैवर्णिकांची कृष्णवर्ण अशा क्षुद्र नामक अर्धरानटी लोकांशी प्रथम गाठ पडली आणि त्या लोकांना माणसाळवून त्यांना त्यांनी आपले दास्यकर्म करण्यास लाविले. दास्यकर्म करावयास लाविले म्हणजे त्यांच्यावर जुलूम केला असा अर्थ घ्यावयाचा नाही. त्रैवर्णिक ज्याला दास्यकर्म म्हणत ते अर्धरानटी क्षुद्र उच्च व सुखाचे कर्म समजत. सध्या महारमांग लोक युरोपियनांच्या रेल्वेवर खडी फोडण्यात जसा अभिमान बाळगतात व ग्रामसंस्थेत महारकी करीत बसण्यापेक्षा खडी फोडण्याची कामगिरी करण्यात उच्चतर व किफायतशीर धंदा मिळाला म्हणून संतोष मानतात, तसाच अभिमान व संतोष त्रैवर्णिकांची वेठबेगार करण्यात त्या काळच्या अर्धरानटी क्षुद्रांना वाटे. ह्या रानटी क्षुद्रांशी प्रथम बेटीव्यवहार त्रैवर्णिक करीत नसत. रानटी क्षुद्र माणसाळल्यावर त्रैवर्णिकांनी चातुवर्ण्यनामक जी त्रिखंडप्रसिद्ध समाजसंस्था ती निर्माण केली. त्रैवर्णिकांनी ही चातुर्वर्ण्यसंस्था प्रथम उत्तरकुरु व उत्तरमद्र नावाचे हिमालयाच्या पलीकडे देश होते त्यात सुरू केली. ह्या नवीन संस्थेचे सुंदर व भव्य वर्णन ऋग्वेदातील पुरुषसूक्तात प्रथम केलेले आढळते. आर्यांनी ही जी नवीन संस्था स्थापिली तिचे वर्णन ह्या सूक्तात आले असल्यामुळे, राजनीतिशास्त्रदृष्ट्या व समाजशास्त्रदृष्ट्या ह्या नामांकित सूक्तांचे महत्त्व अपंरपार आहे. यास्क, शंकर, सायण, दयानंद व पाश्चात्य पंडित इत्यादींनी ह्या सूक्तावर बहुत पांडित्य केले आहे. परंतु ह्यांच्यापैकी कोणाच्याही लक्षात ह्या सूक्ताचा खरा अर्थ व खरे मर्म आले नाही. करता, सदर सूक्ताच्या विशदीकरणार्थ एक स्वतंत्र रकानाच खर्च करणे प्राप्त आहे.