Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

७१ असा हा पाणिनीकालीन समाज होता. ह्या समाजाचे भाषेच्या दृष्टीने दोन भाग, १) त्रैवर्णिकाचा पहिला आणि २) क्षुद्रांचा दुसरा. पाणिनीने ज्या भाषेचे व्याकरण दिले आहे ती भाषा त्रैवर्णिक बोलत. तिला आपण पाणिनीय संस्कृत भाषा म्हणू. बंदी न केलेल्या क्षुद्रांना ही संस्कृत भाषा कळे, परंतु बोलताना तिचा ते अस्पष्ट उच्चार करीत. ह्या अस्पष्ट बोलण्याला पाणिनीयात म्लिष्ट असा शब्द आहे. हा शब्द, म्लेच्छ अस्पष्टे शब्दे, धातूपासून निघाला आहे. अस्पष्ट उच्चार करणा-या सर्व लोकांना म्लेच्छ शब्द त्या काळी लावीत. न ब्राह्मणेन म्लेच्छितवै असे एक छांदस वाक्य आहे. ते ब्राह्मणांना अनुलक्षून विशेषत: असल्यामुळे असा तर्क करता येतो की, क्षत्रियांनी किंवा वैश्यांनी ह्न शूद्रांची तर गोष्टच नको ह्न अस्पष्ट बोलले असता चाले. म्हणजे क्षत्रिय व वैश्य त्या काळी अस्पष्ट उच्चार करिताना ऐकू येत असत हे उघड झाले. एकटी ब्राह्मण जात तेवढी स्पष्ट उच्चार करी व शुद्ध पाणिनीय संस्कृत भाषा बोले. क्षत्रिय व वैश्य थोडेफार अस्पष्ट उच्चार करीत व कमीजास्त अशुद्ध भाषा बोलत. क्षुद्र तर बोलूनचालूनच अस्पष्ट अशुद्ध बोलत. पैकी पाणिनीय काली क्षुद्रांची विशेष म्हणजे मुळीच मातब्बरी नव्हती. त्यांना संस्कार नव्हते, धर्म नव्हते, ते केवळ उच्च प्रकारचे उपयोगी पशू गणले जात आणि वस्तुस्थितीही त्यापैकीच होती. अमनुष्यकर्तृकेच (३-२-५३) या सूत्राच्या व्याख्यानात क्षुद्राचे एक परंपरागत विशेषण दिले आहे त्यावरून क्षुद्रांच्या तत्कालीन रानटी स्थितीवर लख्ख उजेड पडतो. ते विशेषण आखुघात हे होय. क्षुद्र म्हणजे कोण आणि कसा ओळखावा? तर आखुघात: क्षुद्र:। आखुघात हा क्षुद्राचा त्याकाली पर्यायशब्दच होता. उंदीर मारणारा व अर्थात ते खाणारा जो तो क्षुद्र. सध्याही वडार (पाणिनीकालीन वध्र) वगैरे जातींचे उंदीर हे मोठे प्रिय खाद्य आहे. पाणिनीकाली ते सा-या शूद्रांचे खाद्य होते. तात्पर्य, पाणिनीकालीन क्षुद्र अगदी निकृष्ट संस्कृतीचे लोक होते. हेच आर्यांना भरतखंडात प्रथम भेटलेले एतद्देशीय रानटी लोक होत. हे लोक पाणिनीकाली, युरोपीयन समाजशास्त्रीय परिभाषेत बोलावयाचे म्हणजे नुकतेच कोठे लोहयुगात प्रवेश करण्याच्या तयारीत होते. यांच्यात काही जाति ओबडधोबड प्राथमिक शिल्पकाम करणा-या होत्या. कित्येक बांबू, वेली इत्यादींचे बुरुडकाम करीत, त्यांना वरुड ही संज्ञा होती. कित्येक वनफळे चेचून त्यांनी वस्त्रे रंगवीत, त्यांना रजक म्हणत. कित्येक डोंगरात खड्डे काढून त्यातून तांबे व लोखंड तयार करीत, त्यांना ताम्रकुट्ट व अयस्कार म्हणत. असे प्राथमिक शिल्पे करणारे काही क्षुद्र होते. त्यांचे स्वभावसिद्ध धंदे करण्यास आर्यांनी त्यांना स्वत:च्या ग्रामात जागा दिल्या व कालांतराने त्यांना त्रैवर्णिकांच्या जोडीस घेऊन त्यांच्यासुद्धा सर्वत: प्रसिद्ध जे अपूर्व चातुर्वर्ण्य ते निर्माण केले. सहज माणसाळण्यासारखे जे क्षुद्र नव्हते त्यांना त्यांच्या अरण्यात आर्यग्रामाबाहेर स्वतंत्र राहू दिले. माणसाळलेले जे धंदे करणारे कारु अथवा कारि तेच अष्टाध्यायीतील अनिरवसित क्षुद्र होत. ह्यांच्या पूर्वभाषा काय असतील त्या असोत, त्यांचा आता पाणिनीकाली मागमूसही राहिला नसावा. ते म्लिष्ट अशी संस्कृत भाषा बोबड्याने बोलत व त्रैवर्णिकांची संस्कृत समजत. एणेप्रमाणे पाणिनीकाली ब्राह्मणात शुद्ध संस्कृत भाषा, क्षत्रियवैश्यात अस्पष्ट व गावंढी भाषा व माणसाळलेल्या क्षुद्रात बोबडी चालीपुरती चालचलाऊ बोली, असे भाषेचे तीन प्रकार रूढ होते. पैकी अत्यंत उच्च प्रतिष्ठितपणा एका ब्राह्मणांच्या भाषेला तेवढा आलेला होता. क्षत्रिय-वैश्यांची अस्पष्ट बोली अद्याप स्वतंत्र भाषेच्या तोलाची बनली नव्हती आणि शूद्रांच्या बोबड्या बोलीचे नावही घेण्यासारखे नव्हते. उघडच आहे की, प्राकृत म्हणून ज्या भाषेला म्हणू लागले, ती बोली ह्या काळी मुळातच गौण व ग्राम्य रूपात असल्यामुळे तिचे नावही अष्टाध्यायीत नाही. मिश्र शरीरसंबंध समाजात चालू असता, तो प्रतिष्ठितपणे व स्वतंत्रपणे संकर म्हणून ओळखण्याची आवश्यकता ज्याप्रमाणे पाणिनीयकाली समाजाला भासली नव्हती, त्याप्रमाणेच अस्पष्ट व गावंढे उच्चार समाजात चालू असता, त्यांना प्रतिष्ठितपणे व स्वतंत्रपणे प्राकृत म्हणून ओळखण्याची आवश्यकता त्याकाळी भासली नाही.