Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

६९. चार वर्णांच्या सामाजिक स्थितीत मनुष्य या नात्याने स्त्रियांचीही सामाजिक स्थिती अंतर्भूत होते. तत्रापि, वैशिष्ट्याकरिता, स्त्रियांच्या सामाजिक स्थितीचा तपशील देतो. स्त्रिया विवाह करीत किंवा क्वचित कुमारी म्हणजे अविवाहितही रहात (२-१-७०). विवाहापूर्वी कुमारींना मुले झाल्यास ती चालत, फक्त त्या मुलांना कानीन हे विशेषण देत. अर्थात स्त्रियांची लग्ने बरीच उशिरा होत हे उघड झाले. कौमारावस्थेत कानीन संतती झाल्यास ती ज्या अर्थी खपत असे, त्याअर्थी पहिला नवरा वारल्यास किंवा कोणत्याही कारणाने पतित्वास पारखा झाल्यास, दुसरा नवरा करण्यास म्हणजे पुनर्विवाह करण्यास समाजाची आडकाठी नसे (४-२-१३). पूर्वपती जिला नव्हता तिच्या नव-याला कौमार पती म्हणत व तिला स्वत:ला कुमारी भार्या म्हणत. देशात सपत्नीकत्वाची जशी चाल होती (४-१-३५), तशीच एकाच काली अनेक नवरे करण्याची चालही क्वचित् प्रचलित होती, हे द्वैमित्रि; म्हणजे दोन मित्रांचा मुलगा, या शब्दावरून स्पष्ट दिसते. क्षुद्र वर्णातील स्त्रीला इतर वर्ण भार्या करीत (६-३-४१), हे क्षुद्राभार्य: या रूपावरून स्पष्ट आहे. क्षत्रिय व वैश्य ब्राह्मण स्त्रीलाही भार्या करीत हेही ब्राह्मणीभार्य: या रूपावरून स्पष्ट आहे. परंतु, या वर्णबाह्य भार्यांना पत्नी हे सन्मान्य पद मिळत नसे. पत्नी म्हणजे पतीची जी सहधर्मचारिणी (४-१-३३) तिला यज्ञकर्मात पतीच्या बरोबरीने सहाधिकार असे. गार्ह्यपत्य अग्नीचे स्थान जे गृह त्याची मालकी पतीइतकीच सहधर्मचारिणी पत्नीची असे; सबब, गृहपती या शब्दाने पतीच्याप्रमाणेच पत्नीचाही बोध होई. लिंगवैशिष्ट्य दर्शवावयाचे असल्यास गृहपत्नी असे रूप योजीत. क्षेत्र, गाई इत्यादींची मालकी म्हणजे स्वतंत्र स्वामित्व स्त्रियांचे असू शके. स्वतंत्र म्हणजे पतिनिरपेक्ष. कारण, काही कुलात पती जसा प्रधान मालक असे, त्याप्रमाणेच काही कुलात पत्नी प्रधान मालक असे. म्हणजे वंश दोन प्रकाराने उत्पन्न होई. पित्याच्या नावाने जो वंश चाले तो पितृवंश व मातेच्या नावाने जो वंश चाले तो मातृवंश. जेथे मातृवंश चाले त्या गृहात गृहपतित्व म्हणजे गृहाचे स्वामित्व सहजच स्त्रीकडे म्हणजे पत्नीकडे म्हणजे मातेकडे येई. अर्थात, गार्ह्यपत्याग्नीचे रक्षण पुरुषांप्रमाणे स्त्रियाही करीत. मातृवंशीय घराण्यातील प्रधान स्त्री लौकिक गोत्राची प्रवर्तक होई. परंतु, पाणिनिकाली अशा स्त्रीच्या अपत्याची कुत्सना म्हणजे निर्भर्त्सना होत असे (४-१-१४७). स्त्रियांना युवसंज्ञा नसे, कारण विवाहाने त्या परगोत्रात जात. पाणिनीकाली जशा कुलटा म्हणजे चवचाल स्त्रिया होत्या, तशा पण्यस्त्रिया ऊर्फ वारस्त्रियाही होत्या. पाणिनीकाली कित्येक स्त्रिया आचार्यांचे म्हणजे अध्यापकाचे काम करीत. परंतु, ब्राह्मणस्त्रियांची विशेष प्रसिद्धी अन्न तयार करण्याच्या पटाईतपणाबद्दल असे. कित्येक पराक्रमी स्त्रिया मणाचा, कित्येक खंडीचा, कित्येक गाडाभर तांदुळाचा भात काढीत, त्यावरून पात्रीणा, आढकिकी, प्रास्थिकी, आचितीना इत्यादी शब्द प्रचलित झाले होते. क्षत्रिय स्त्रियांना वीरपत्नी व असूर्यंपश्या ही विशेषणे पाणिनीयात लाविलेली आहेत, त्यावरून दिसते की क्षत्रिय स्त्रिया थोड्याफार पडदानशीन असत. इतर स्त्रियांचे व्यवहार अप्रतिबद्ध असत. आर्यकृती व ब्राह्मणकृतेयी या शब्दांवरून दिसते की, कित्येक अनार्य व अब्राह्मण स्त्रीपुरुषांना आर्य व ब्राह्मण करून घेण्याची चाल पाणिनीय काळाच्या पूर्वी कधी तरी अस्तित्वात असावी. धर्मच्युत जे वृषल त्यांच्या स्त्रियांना वृषलपती किंवा वृषलपत्नी अशी संज्ञा असे. यद्यपि कित्येक बाबतीत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मान असे, तत्रापि एकंदरीत स्त्रियांचा पक्ष गौण व अध्याहरणीय लेखीत. एकशेषप्रक्रियेत पाणिनी सांगतो की, स्त्रिया सहोक्तौ पुमान् शिष्यते (१-२-६७). भ्रातरौध्ये बहिणी अध्याहृत धरीत. पुत्रौध्ये मुलगा व मुलगी ह्या दोहोंचा समावेश होई. बहीण व मुलगी यांच्याहून आईला व सासूला किंचित् जास्त मान मिळे. सर्वसाधारण संक्षेपाने उल्लेख करावयाचा असला म्हणजे मातापित्यांचा दोघांचाही निर्देश पितरौ या एका शब्दाने होई. आईची जी गत तीच सासूची. श्वशुरौ म्हणून सास-याबरोबर सासूचीही वासलात लावीत. तत्रापि विशेष निर्देश करावयाचा असल्यास मातापितरौ, मातरपितरौ, श्वश्रूश्वशुरौ असा खुलासा करीत. तात्पर्य, स्त्रियांची पायरी पुरुषांच्या पायरीहून कमतर लेखीत यात संशय नाही. तत्रापि वयाला काही मान देत. युवा व वृद्ध स्त्री यासंबंधी समासाने बोलावयाचे असल्यास वृद्ध स्त्रीच्या पोटी युवा गणीत.