Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

६७. तिसरा वर्ण वैश्यांचा. यांच्या संबंधाने पाणिनीने विशेष काही लिहिलेले नाही. वैश्य त्रिकर्माधिकारी असून, कृषि, पाशुपाल्य व वाणिज्य हे यांचे धंदे असत. ह्यांच्यातही प्रवराध्यायप्रसिद्ध गोत्रे व लौकिक गोत्रे ऊर्फ आडनावे ब्राह्मणक्षत्रियातल्याप्रमाणेच असत. ब्राह्मणक्षत्रियात व वैश्यात भेद असा की, ब्राह्मणक्षत्रियांना आर्य ही संज्ञा असे व वैश्यांना वैशेष्ये करून अर्य म्हणत (३-१-१०३). ह्या तीन वर्णातील लोकांना समवायाने त्रैवर्णिक ही संज्ञा असे. या तिघांना उपनयनादि सर्व संस्कार असून, यांचे शिक्षण गुरुगृही आचार्यद्वारा होत असे (८-२-८३).

६८. चौथा वर्ण क्षुद्रांचा. पाणिनीला दोन प्रकारचे क्षुद्र माहीत होते, १) अनिरवसित क्षुद्र व २) निरवसित क्षुद्र (२-४-१०). अवसित म्हणजे आत येण्याचे बंद केलेले. निरवसित म्हणजे आत येण्याचे नि:शेष बंद न केलेले, अंशता बंद केलेले पतंजली निरवसित या शब्दाचा अर्थ बहिष्कृत म्हणून देतो. बाहेर घालवून देण्याच्या क्रियेपेक्षा आत येऊ देण्याचे थांबविण्याची क्रिया अवसो या धातूने दाखविली जाते. प्रथम आत जे असतील त्यांना नंतर बाहेर घालवून देणे शक्य असते. क्षुद्र हे प्रथम आर्यसमाजात होते अशी पतंजलीची समजूत होती. परंतु खरा प्रकार तसा नव्हता. अनार्य जे क्षुद्र ते पहिल्यापासून चातुर्वर्ण्यात नव्हते ह्न ते त्रैर्वर्ण्याच्या बाहेर होते. नंतर जास्ती संघटन झाल्यावर त्यांना अंशत: आत घेतले. या अंशत: आत येण्याच्या क्रियेला अनुलक्षून पाणिनीने अनिरवसित हे पद सूत्रात घातले आहे. पाणिनीच्या काळी काही क्षुद्रांना अंशत: समाजात घेतले होते. असे अनिरवसित म्हणजे नि:शेष किंवा पूर्णपणे बंदी नसलेले क्षुद्र म्हटले म्हणजे तक्षन्, अयस्कार, रजक, तंतुवाय इत्यादी समाजाच्या कमीजास्त उपयोगी पडणारे क्षुद्र होत. न उपयोगी पडणारे असे जे क्षुद्र होते त्यात चंडाल, निषाद, मृतप इत्यादी लोक येत. अभीरांना महाक्षुद्र म्हणत. अनिरवसित व निरवसित या दोन्ही क्षुद्रांना षट्कर्मांपैकी कोणताच अधिकार नसे. अनिरवसित म्हणजे बंदी न केलेल्या क्षुद्रांनी बनविलेल्या लाकडाच्या पेट्या, लोखंडी भांडी, रंगविलेली कापडे व विणकरीची वस्त्रे, स्पृश्य मानीत. बंदी केलेल्या चंडालादी क्षुद्रांचा साक्षात् स्पर्श गर्ह्य मानीत.