Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
६६. दुसरा वर्ण जो क्षत्रियांचा तोही पाणिनी काली ब्राह्मणांच्याप्रमाणेच सैल असे. क्षत्र शब्दाला घ प्रत्यय लागून क्षत्रिय व राजन् शब्दाला यत् प्रत्यय लागून राजन्य असे दोन शब्द पाणिनी सांगतो (४-१-१३७/१३८). क्षत्रिय हा सामान्यवाचक शब्द असून, राजन्य हा अभिषिक्तवंश्य क्षत्रियांचा वाचक असे. राजाच्या पुत्रांना राजपुत्र म्हणत (४-२-३९). कित्येक प्रांतांची व तेथील क्षत्रियांची नावे एकच असत (४-१-१६८) व तेथील राजांचेही नाव त्या जनपदवाचिक्षत्रिय शब्दाला अण् प्रत्यय लागून होई. क्षत्रिय त्रिकर्माधिकारी असून, ब्राह्मणांच्या प्रमाणेच त्यांच्यातही दोन प्रकारची गोत्रे असत, १) प्रवराध्यायप्रसिद्ध गोत्रे व २) लौकिक गोत्रे. पुरोहिताचे जे प्रवराध्यायप्रसिद्ध गोत्र तेच क्षत्रियांचे असे. लौकिक गोत्र ऊर्फ आडनाव पित्याच्या किंवा पूर्वजाच्या नावावरून पडे, उदाहरणार्थ, युधिष्ठिरा: नृपतय:. युधिष्ठिर जो भारतवंशी धर्मराजा त्याच्या सहाशे वर्षे राज्य करणा-या वंशजाचे हे आडनाव आहे. ह्या आडनावासंबंधाने पाणिनी सांगतो की, इतर तद्धित शब्दाप्रमाणे यौधिष्ठिरि: वगैरे रूपे या युधिष्ठिर शब्दापासून होत नाहीत, तर हा शब्द तद्धितार्थी जसाचा तसाच रहातो (२-४-६६). ब्राह्मणांच्याप्रमाणेच यांचीही लौकिक गोत्रे नाना प्रकारे साधत असत. क्षत्रियांचा एकच एक धंदा देशसंरक्षण करण्यासाठी लढण्याचा. लढताना भारतीय क्षत्रिय मृत्यूलाही भीत नसत, ह्याकरता त्यांना नाभि: अशी संज्ञा असे. पाणिनीकाली लढण्याचा हा धंदा क्षत्रियांखेरीज इतर अनेक आयुधजीवी संघ करीत (५-३-११४). अशा क्षत्रियेतर आयुधजीविसंघांची पाचपन्नास नावे पाणिनीने दिली आहेत, उदाहरणार्थ, दामनीय, कौंडोपरथीय, पर्शु, असुर, रक्षस्, यौधेय, कौशेय, शौक्रेय, इ.इ.इ. ह्या क्षत्रियेतर लढाऊ लोकांपैकी कित्येक चातुर्वर्ण्यबाह्य होते आणि कित्येक चातुर्वण्यातील क्षत्रियात मोडणारे असावेत. पहिल्या वर्गाची उदाहरणे म्हणजे पर्शु, असुर इत्यादी आणि दुस-या वर्गाची उदाहरणे म्हणजे क्षौद्रक्य, मालव्य, यौधेय, दामनीय इत्यादी. ह्या आयुधजीविसंघांचे राजेही असत. पाणिनीयकाली क्षत्रियांची ही अशी सामाजिक स्थिती होती.