Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
६५. पाणिनीच्या काली ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र असे पुरुषसूक्तोक्त चार वर्ण होते; परंतु हे वर्ण पक्के जाति झालेले नव्हते, म्हणजे ह्या वर्णात ब्राह्मण्यत्व, क्षत्रियत्व इत्यादी जन्माने प्राप्त व्हावे असे सर्वांशी नसे. ब्राह्मण षट्कर्माधिकारी असून राजाचे पुरोहितत्व त्याच्यावाचून इतर कोणालाही प्राप्त होत नसे. प्रसंगी तो राजाशी लढणारा व एकाला पदच्युत करून तत्स्थानी दुसरा नवा राजा करणारा असे. वर्णानुपूर्वीने ब्राह्मण सर्ववर्णश्रेष्ठ असून तो देहदंडय नसे. ब्राह्मण म्हटला म्हणजे त्याला देहान्त शिक्षा नाही, असा दंडक असल्यामुळे, बिकटप्रसंगी इतर वर्ण शिक्षा ऊर्फ दंड टाळण्याकरिता ब्राह्मणाचे सोंग घेत. अशा सोंगाड्या ब्राह्मणाला अधिक्षेपाने भयब्राह्मण 'भयेन ब्राह्मण: संपन्न:' म्हणत (६-२-६९). ब्रह्महत्या हा भयंकर देहदंड्य अपराध समजत. ब्राह्मण अक्षरश: सर्ववर्णवंद्य असे. तो कोठेही कसाही आढळो, त्याला सर्व वर्ण वंदन करीत. सामान्ये करून हे ब्राह्मणाचे लक्षण झाले. सर्वच ब्राह्मण विद्वान किंवा अग्निकर्मरत नसत. असे जे अविद्वान व कुलशीलहीन ब्राह्मण असत त्यांना ब्राह्मणजातीय हे विशेषण अधिक्षेपाने लावीत (५-४-९). कित्येक प्रांतातील ब्राह्मण ब्रह्मकर्म टाकून आयुधजीवी बनले होते. अशा लढवय्या ब्राह्मणांच्या प्रांताला ब्राह्मणक म्हणत व तेथील ब्राह्मणांना ब्राह्मणकीय ही विशिष्ट संज्ञा असे (४-२-१४१). ब्राह्मण गोत्रप्रवरांना बराच जपे. अमुक प्रवराध्यायप्रसिद्ध गोत्रांनी अमुक गोत्रांशीच शरीरसंबंध करावा असा निर्बंध असे. पाणिनीयकाली गोत्रे दोन प्रकारची असत. प्रवराध्यायप्रसिद्ध गोत्रे आणि लौकिक गोत्रे. लौकिक गोत्रे म्हणजे सध्या ज्यांना आपण कुलनामे अथवा आडनावे म्हणतो ती. अपत्ये दोन प्रकारची असत - १) गोत्रापत्ये व २) अनंतरापत्ये. मुलगा हा बापाचा अनंतरापत्य आणि नातवापासून पुढील प्रजा गोत्रापत्ये. धाकटा भाऊ हा थोरल्या भावाचा किंवा वयाने थोर अशा इतर जिवंत सपिंड्यांचा युवापत्य. अनंतरापत्य, युवापत्य व गोत्रापत्य ह्या तीन संबंधांनी जखडून गेल्यामुळे, कोणाही व्यक्तीला वाटतील ते अधर्म्य थेर करण्याला बिलकूल वाव नसे. सध्या आपण बापाचे नाव मुलाच्या नावापुढे लावतो व शेवटी आडनाव ऊर्फ कुलनाम जोडतो; जसे विष्णु कृष्ण आत्रे. पाणिनीय काली प्रथम गोत्रनाम उच्चारीत; नंतर बापाचे नाव उच्चारीत आणि शेवटी व्यक्तिनाम उच्चारीत:- आत्रेय: कार्ष्णि: विष्णुशर्मा, म्हणजे आत्रेय गोत्रनामाचा कृष्णपुत्र विष्णु. सध्याची विष्णु कृष्ण आत्रे असे म्हणण्याची पद्धत मुसलमानी अमलातील आहे. विष्णु इ कृष्ण इ आत्रे = विष्णु of of कृष्ण of the the आत्रे family family = आत्र्यांच्या कृष्णाचा विष्णु. मधील फारसी ईचा लोप होऊन विष्णु कृष्ण आत्रे असे नाव सध्या बनले आहे. मुसलमानांच्या पूर्वी ज्ञानेश्वरकाली सबंध नाव येणेप्रमाणे लिहीत : महेशान्वयसंभूत निवृत्तिनाथसुत ज्ञानदेव. ज्ञानेश्वरापूर्वी पाणिनीपावेतो ही ज्ञानदेवी पद्धतच प्रचलित होती. पाणिनीय काली कोणती पद्धत सुरू होती ते वर सांगितलेच आहे. पाणिनीकाली वंश दोन प्रकारांनी प्रचलित होई: पित्याच्या नावाने किंवा मातेच्या नावाने, पितृवंश किंवा मातृवंश. पितृवंशाने प्रथित होणा-या कुलातील अपत्ये बापाच्या नावावरून आपले नाव विशिष्ट करीत आणि मातृवंशाने प्रथित होणा-या कुलातील अपत्ये आईच्या नावावरून आपले नाव विशिष्ट करीत; जसे, वसिष्ठ: - वासिष्ठ: - पीला- पैलेय:. पैकी मातृवंशपद्धति पाणिनीच्याच काली कुत्सित ऊर्फ निंद्य समजली जाऊ लागली होती, गोत्रस्त्रिय: कुत्सने ण च (४-१-१४७). गार्ग्या अपत्यं गार्गो गार्गिको वा जाल्म:॥ गार्गी या स्त्रीच्या नावाने प्रथित होणाऱ्या मुलाला शिंदळिच्चा गार्ग किंवा गार्गिक असा अपशब्द योजिला जाऊ लागला होता. एकंदरीत पितृवंशपद्धती पाणिनीकाली प्रशस्ततर समजली जात असे एवढे खरे. परंतु, मातृवंशपद्धती अगदीच लोपली नव्हती. विद्येने किंवा कर्माने कमतर असे ब्राह्मण किंवा निरनिराळ्या प्रांतात राहणारे ब्राह्मण अद्याप स्वतंत्र जात करून राहू लागले नव्हते.