Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
सर्व हिंदुस्थान व सर्व दक्षिण महाराष्ट्र साम्राज्यांत अंतर्भूत करण्याचा त्याचा मनोदय होता. हे अवाढव्य कृत्य पुढील वर्षी म्हणजे १७६० त उरकावयाचा निश्चय करून त्यानीं दत्ताजीला लाहोरचा बंदोबस्त करून काशी, प्रयाग व बंगाला ह्या प्रांतांवर पूर्वेकडे स्वारी करावयास सांगितलें, दत्ताजी प्रयागास पोहोचतो न पोहोचतो तोंच रघुनाथरावानें १७५९ च्या सप्टेंबरांत दक्षिणेंतून बंगाल्यांत दत्ताजीला जाऊन मिळावें, तो प्रांत आसमुद्र जिंकून टाकावा व सुजाउदौल्यानें मदत केल्यास त्यापैकी अर्धा प्रांत त्यास द्यावा, असे ठरविलें (का. पत्रे, यादी ३६२, ३७३, ३८७, ३८८). हिंदुस्थानची व्यवस्था दत्ताजी, जनकोजी व रघुनाथराव यांजकडे सोंपवून दक्षिणची व्यवस्था करण्याचे काम सदाशिवरावभाऊ, बाळाजी बाजीराव व विश्वासराव ह्या तिघांनीं आपल्याकडे घेतलें. दक्षिणेत ह्या वेळी मराठ्यांना दोन प्रतिस्पर्धी होतेः- एक सलाबतजंग व दुसरा श्रीरंगपट्टणचा कुंभार राजा व त्याचा सरदार हैदरअल्ली. ह्या दोघांची रग जिरविली म्हणजे आसमुद्र दक्षिण मोकळी झाली. गोपाळराव पटवर्धनाला लिहितां लिहितां बाळाजी बाजीराव म्हणतो, “पन्नास हजार फौज जमा करून अगदीं मोगल दक्षिणेंत होता कीं नव्हतासा करूं” (ऐतिहासिक लेखसंग्रह १५). तसेंच १७६० च्या फेब्रुवारींत गोविंद बल्लाळाला सदाशिव चिमणाजी लिहितो, “कर्नाटकची स्वारी न झाली, तिकडेहि अबदालीचा पेंच; पैका मिळायाचें झालें नाहीं; नाहीं तरी सारी दक्षण मोकळी होती” (लेखांक १६६). १७६० त सेतुबंधापर्यंत दक्षण मोकळी करावयाचीं असा पेशव्यांचा बेत होता. हा बेत करण्यांत परदेश जिंकण्याच्या उच्छृंखल मनोवृत्तीचें प्राबल्य यत्किंचितहि नसून सर्व घटना, योग्य असा सारासार विचार करून पेशव्यांनीं जुळवून आणिली होती. श्रीरंगपट्टणचें हिंदूराज्य कलंडण्याच्या बेतांत आलें होतें; सलाबतजंग अर्धाअधिक पेशव्यांनी गिळलाच होता व हिंदुस्थानांत क्षुद्र नजीबखानाखेरीज म्हणण्यासारखा शत्रू मराठ्यांना राहिला नव्हता. दक्षण मोकळी करण्याकरितां होणा-या स्वारीचे सदाशिवरावानें दोन भाग केले. पहिल्या भागांत सलाबतजंगाचा चुराडा करण्याचें ठरविलें व दुस-या भागात तसेच पुढें कर्नाटकांत जाऊन श्रीरंगपट्टण घेण्याचे योजिलें सलाबतजंगावर स्वारी करण्यास पेशव्यांस एक कारण होते ते हें की, शिंदखेडची लढाई झाल्यावर निजामअल्लीनें पेशव्यांस दहा लाखांची जहागीर व नगर व परांडा असे दोन किल्ले देण्याचा करार केला असून तो करार अमलांत आणण्याचा निजामअल्ली अनमान करूं लागला (लेखांक १५४). यास्तव १७५९ च्या दस-या डेरेदाखल होऊन फौजा जमा करणें सदाशिवरावभाऊला प्राप्त झालें. सर्व फौज जमा होईतोपर्यंत म्हणजे १७५९ च्या नोव्हेंबरपर्यंत सदाशिवरावभाऊ पुण्याजवळ गारपिरावर डेरे देऊन होता (टीप २३१ पहा). विसाजी कृष्णानें कविजंगाशीं फितूरी करून नगरचा किल्ला १० आक्टोबर १७५९ (लेखांक १४७) ला घेतला अशीं बातमी भाऊला तेथें कळली (टीप २१७ पहा). नोव्हेंबरांत भाऊला दगा करण्याचा विचार मुजफरखानानें केला; परंतु तो फसला (लेखांक २३१). नंतर, भाऊ, दादा, नाना व विश्वासराव निजामावर निघाले (टीप २१९ पहा). नाना नगरास गेले व भाऊ, दादा व विश्वासराव राक्षसभुवनाकडे गेले (लेखांक १४९).