Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
करार केलेली जाहागीर देण्यास मोगल ह्या वेळी राजी झाला; परंतु आता तें बोलणें पेशवे कबूल करीतना (लेखांक १४९); तेव्हा लढणें हाच मोगलाला शेवटचा उपाय राहिला व उदगीरची मोहीम सुरू झालीं. ९ जानेवारीला भाऊसाहेब परळीजवळ गेले त्यावेळीं त्यांजवळ पंचवीस हजार सैन्य व दहा हजार गाडदी होते व निजामअलीपाशीं दहा हजार फौज व दहा हजार गाडदी होते. सलाबतजंगाची व त्याचा दिवाण निजामअल्ली यांची ह्या वेळेस फारच हलाखी होती. सलाबतजंग फुटून कर्नाटकास गेला; मुसाबूसी १७५८ च्या जूनांत पांडिशेरीस गेला व इम्राईमखान पेशव्यांचा चाकर झाला (लेखांक १५४). उदगिरीजवळ १७६० च्या १९ व २० जानेवारीला मोगलाशीं दोन युद्धें झालीं, त्यांत मोंगल अगदीं नरम आला (लेखांक १६०), परंतु त्याचें पकें पारपत्य १७६० च्या फेब्रुवारींत उत्तमोत्तम झालें (लेखांक १६५). ह्या लढाईचें सविस्तर वर्णन विस्तारभयास्तव मी येथें देत नाहीं कारण, तें ह्या ग्रंथातील लेखांक १५१ पासून १६७ पर्यंतच्या पत्रात ज्यानीं साक्षात ती लढाई मारिली त्यानीं स्वतःच केलें आहे. लढाईनंतर जो तह झाला त्यांत निजामाचा बहुतेक प्रांत पेशव्यांनीं घेतला (टीप २४१ पहा). दक्षिण घेण्याचा येथपर्यंत पहिला भाग झाला. ह्यापुढें खरें पाहिलें तर सदाशिवरावभाऊनें दुस-या भागाला म्हणजे श्रीरंगपट्टणावर स्वारी करण्याच्या उद्योगाला लगावयाचें; पंरतु, तें काम त्याला तसेंच टाकून द्यावें लागलें. कां कीं, उदगीरची मोहीम सुरूं होऊन पंधरा दिवस होतात न होतात तों दत्ताजी शिंद्याच्या पराजयाचीं वर्तमानें आलीं हिंदुस्थान गडबडलें आहे, संस्थानिकांचा अबदालीकडे फितूर आहे, वगैरे बातम्या लागोपाठ येऊं लागल्या. तेव्हां उदगीरची मोहीम हातीं घेतल्यासारखी यथास्थितपणें शेवटास लावून श्रीरंगपट्टणाकडे न जाता हिंदुस्थानांत सरदारांच्या साहाय्याला जाणें पेशव्यांस भाग पडलें. १७५९ च्या मार्चात दक्षिण सबंद मोकळी करण्याचा जो बूट पेशव्यानीं योजिला होता तो तसाच अर्धा टाकून हिंदुस्थानांतील सरदारांचीं पडती बाजू सावरण्याची पेशव्यांस तयारी करावी लागली. ह्या कामाकरितां सदाशिवरावभाऊ व बाळाजी बाजीराव रंगपंचमीला म्हणजे ७ मार्च १७६० ला पडदूर येथें भेटले (लेखांक १६८) व तेथें आठ रोजपर्यंत हिंदुस्थानांत कोर्णी जावें याबाबत खलबत झालें. हिंदुस्थानांत दादांनीं जाऊं नये वगैरे पुष्कळ बाबींची शहानिशा १७५९ च्या दस-यास पुण्यासच झालीं वगैरे भ्रामक विधानें अनेकांनी केली आहेत. त्यांचा विचार २५४ व्या टिपेंत व २४५ ब, ह्या टिपेंत सविस्तर केला आहे. त्या टीपांकडे वाचकांचे लक्ष्य पोहोंचवून, प्रस्तुत अर्थाकडे वळणें रास्त दिसतें. पडदूर येथील खलबतांत सदाशिवरावभाऊनें हिंदुस्थानांत जावे असा सिद्धांत झाला. असा सिद्धांत होण्याचें मुख्य कारण रघुनाथरावाचा नाकर्तेपणा हें होय. ह्या नाकर्तेपणाचें स्वरूप मागें दाखविलेंच आहे. सदाशिवरावभाऊनें ह्या नाकर्तेपणाची ओळख राघोबाला ह्यावेळीं दिली. ती त्याला मर्माग्रीं झणाणून त्यानें आपण होऊन हिंदुस्थानांत जाण्याचें नाकारलें (ऐतिहासिकलेखसंग्रह नं. १४).