Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१६९] ।। श्री ।। २० मार्च १७६०.
तीर्थस्वरूप राजश्री गोविंदपंत दादा वडिलांचे सेवेसीः-
अपत्यें बाबूराव स।। नमस्कार विनंति तागाईत चौत्र शुद्ध ३ तृतीया मु॥ सिंदखेड वर्तमान यथास्थित असे. विशेष. वडिलीं फाल्गुन शुद्धT२५५ तृतीयेचीं पत्रें पाठविलीं तीं फाल्गुन वद्य चतुर्दशीस मुक्काम मजकुरीं पावलीं. सविस्तर वर्तमान कळलें. श्रीमंतांस पत्रें होतीं ती दिलीं. पत्रें पाहून बहुत संतोषी जाले. अबदालीची हिंमत बहुत दिसोन येत होती. परंतु त्याणें अवसान टाकिलें. हें आयकोन बहुत समाधान पावलें. देशीचें वर्तमान तरी श्रीमंत नानासाहेबांच्या व श्रीमंत राजेश्री भाऊसाहेबांच्या भेटी पडदुरचे मुक्कामीं फाल्गुन वद्य पंचमीस होऊन पांच सात मुकाम तेथें झाले. तदोत्तर फाल्गुन वद्य एकादशीस मुक्काम मजकुरास आले. तेथून श्रीमंत राजश्री भाऊसाहेबाची रवानगी फाल्गुन२५६ वद्य त्रयोदशीस जाली. डेरादाखल जाले. लोकांचा दीलदिलासा करून तमाम नालबंदी दिली. पन्नास२५७ हजार फौज समागमें येत आहे. देशी श्रीमंत राजश्री दादासाहेब पंचवीस हजार फौजेनिशी राहिले. गंगथडी बालाघाट इतक्यांत राहणार. सलाबतजंग व निजामअल्ली एकत्र होते. बसालतजंग अदवानीकडे होता. तोहि येऊन त्यास भेटला. तिघे एकत्र आहेत. कलबुरगेयास जाणार होते. फौज त्यांची आहे ती आहे. लबाडी करावयास चुकणार नाहींत. याजकरितां देशीं नेहमीं पंचवीस हजार फौज ठेविली. कर्नाटकांत विसाजी कृष्ण याजबरोबर दाहा हजार फौज देऊन रवाना केलें. येणेंप्रमाणें बंदोबस्त ठीक केला आहे. श्रीमंत भाऊसाहेबासमागमें मुत्सदी राजश्री बळवंतराव गणपत व नाना पुरंदरे व महीपतराव चिटणीस ऐसे येत आहेत. थोरले श्रीमंतापाशीं राजश्री सुखारामपंत व कृष्णराव पारसनीस ऐसे राहिले. वडिलांस कळावें. मित्ती. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विज्ञापना.
पै॥ मिती वैशाख शु।। ४