Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
३ जानेवारी १७६० ला अंतर्वेदींत शिरून अबदाली शुक्रतालीं रोहिल्याला मिळाला व तेथून त्यानें दिल्लीचा रोंख धरिला (लेखांक १६४). इकडे कुंजपु-याहून दत्ताजी शिंदेहि दिल्लीस यमुनेच्या दक्षिणीतीरीं येऊन पोहोंचला. अबदाली व दत्ताजी ह्यांच्यामध्यें यमुनेचें पात्र तेवढें राहिलें होतें. १० जानेवारी १७६० ला अबदालीचें व दत्ताजीचें दिल्लीजवळ बडाऊंच्या घाटीं मोठें तुंबळ युद्ध झालें व त्यांत मराठ्यांचा पराजय होऊन दत्ताजी शिंदे रणांत राहिला (लेखांक १६५). जनकोजी तेथून पळून कोटपुतळीस आला व तेथें १२ जानेवारी १७६० ला त्याची व मल्हारराव होळकरांची गांठ पडली (लेखांक १५३ व १६५). १७५९ च्या नोव्हेंबर महिन्यांत अंतर्वेदींत शुक्रतालीं रोहिल्याशी लढत असतां जेव्हां अबदली आल्याची बातमी आली तेव्हांच दत्ताजीनें मल्हाररावाला मदतीस येण्याकरितां पत्रे पाठविलीं होतीं. परंतु बलवडा, झिलाडा वगैरे भिकार ठिकाणें जयनगर प्रांतीं घेत बसून मल्हाररावानें दोन महिने व्यर्थ दवडिले. पेशव्यांनीहि मदतीस जाण्याबद्दल मल्हाररावाला वारंवार पत्रें पाठविलीं (लेखांक १६१). “मल्हाररावांनीं आधी काम कोणतें करावें, मग कोणतें करावें, माधोसिंगाचा मजकूर काय? जेव्हां म्हटले तेव्हां पारपत्य होतें तो विचार त्यांनी न केला” (लेखांक १५७), ह्याप्रमाणें दोष देऊन, पुढें लेखांक १५८ त “मल्हाररावांस वारंवार पत्रें रवाना केलीं आहेत, परंतु, त्याचे प्रकृतीस तुम्ही जाणता,” म्हणून पेशव्यांनी मल्हाररावांचा दुष्ट हेतुहि उघड करून दाखविला. मल्हारराव, शिंद्यांना जर १७५९ च्या नोव्हेंबरांत मिळाला असता तर रोहिले व सुजाउद्दौला यांचे पारपत्य होऊन अबदाली एकटा राहता व त्यांचें पारपत्य त्या दोघां सरदारांना सहजासहजीं करितां आले असतें. रघुनाथरावदादाचेंहि असेच मत होतें (लेखांक १५२). "दोन्ही सरदार एकत्र असलियास उत्तम रीतीने पठाणाचें पारपत्य होईल, पठाणांत कांहीं फार बल नाहीं व त्यांना मागील वर्षी दहशतहि खादली आहे. सारांश, एकदिल फौज असलिया तें काम सहजांत आहे,” असें रघुनाथरावानें लिहून पाठविलें. परंतु मल्हाररावाच्या मनांत शिंद्यांविषयीं अढी पक्की बसली होती. शिंदे पेशव्यांच्या मतानें चालतात; नजीबखानाला मारून टाकून पेशव्यांचें राज्य निष्कंटक करून टाकण्याचा शिंद्यांचा आत्मघाती प्रयत्न आहे; हिंदुस्थानांत एखादा तरी “खळी” ठेवण्याचा आपला विचार शिंद्यांना पसंत नाहीं; इत्यादि कुकल्पना मनांत धरून मल्हाररावानें शिंद्यांना साहाय्य करण्याचें लांबणीवर टाकिलें व शिंद्यांचा सर्वस्वी नाश झाल्यावर कोटपुतळीस जनकोजीस येऊन तो भेटला (टीप २१५). परंतु त्याच्या येण्याचा फारसा उपयोग झाला नाही.