Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१६६] ।। श्री ।। १९ फेब्रुआरी १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासीः-
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी सविस्तर वरच्यावर लिहीत जाणें. इकडील वर्तमान तरी निजामआल्लीखानांनीं जागीर व दोन किल्ले देऊ केले असतां मागें पुढें पाहूं लागले. याजकरितां आह्मी बाहेर निघालों. फौज पाठवून नगरचा किल्ला घेतला. मागाहून आह्मीं नगरास येऊन तेथील बंदोबस्त करून दरमजल येऊन उदगिरीस मोगलास गांठले. पांच सात मजली पुढें चालिला. चंद्र १५ जमादिलाखरीं चंडोलावर हल्ला करून मारून लुटून फस्त केला. तेव्हां मोगल जेर होऊन जागीर व अशर, ब-हानपूर दौलताबाद, विजापूर, मुल्हेर किल्ला याप्रमाणें तह केला. हें वर्तमान तुह्मांस कळावें यास्तव लिहिलें असे. सारांश, मोगल फार तरतुदीनें जुंझला. बहुता प्रकारें त्यास झुंझावयाची गांठ घालितां छातीचा कोट करून चंडोलावर फौजा उडवल्या. चारसा घटका२४२ तीर तरवार, गोळा गोळी, बाण, हात, धोंडा याप्रमाणें मारीत मारीत खासियाचे अंबारीपर्यंत मोकळा केला. कादरखान मातबर गाडद्याचा सरदार ठार झाला. शोकतजंग हत्तीसुद्धां धरून आणिला. त्यास जखम होती. तो मेला व सुरेराव२४३ निरमळकर जखमी आहे. तोफा पंधरा व हत्ती आठ, अंबारी, हौदे निशाणाचे आले. सरकारचे मातबर बराणजी मोहिते व भगवंतराव शिंदे व महादजी सालोंखी व केशवराव पानशी व सखोजी घाटगे आणखी ठार झाले व जखमीहि झाले. तीर्थरूपाच्या पुण्येंकरून मोठी फत्ते झाली. या जुंजानें मोगलांत बाकी न रहातां साठ लक्षांची जागीर व सदरहूप्रमाणें स्थळें घेतलीं. याउपरि इकडील गुंता उरकला. चिरंजीव राजेश्री दादा फौजसुद्धां दरमजल त्या प्रांतीं येतील. + इकडे मुलुख स्थळें चांगलीं मिळालीं, परंतु खर्च जाहला. कर्नाटकची स्वारी न झाली. तिकडेहि अबदालीचा पेच. पैका मिळायाचें झालें नाहीं. तिकडील पेचामुळें इकडे आटोपावें लागलें. नाहीं तरी सारी दक्षिण मोकळी२४४ होती. असो. तिकडील वर्तमान वरचेवर आठा रोजाआड तुह्मीं लिहीत जाणें. मामलियाचा ऐवज बाकी फार आहे. दहावीस लाख जरूर पाठवणें. चंद्र १ रजब. बहुत काय लिहिणें. हे विनंति.