Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१६८]                                        ।। श्री ।।                १६ मार्च १७६०.

तीर्थस्वरूप राजश्री गोविंदपंत दादा वडिलांचे सेवेसीः-

अपत्यें बाबूराव साष्टांग नमस्कार विनंति त॥ फाल्गुन वद्य ३० अमवाशा मु॥ शिंदखेड वर्तमान यथास्थित असे. विशेष. सांप्रत वडिलाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी सविस्तर लेहून पाठवावें. यानंतर इकडील वर्तमान तरी श्रीमंत राजश्री नानासाहेब अमदानगराहून कुच करून दरमजल पडदुरास आले. व श्रीमंत राजश्री भाऊसाहेब मोंगलांचा उपमर्द करून तह करून आले. पडदुरचे मुकामीं उभयतां श्रीमंतांच्या भेटी फाल्गुन वद्य२५३ पंचमीस जाहल्या. तदोत्तर हिंदुस्थानचे रवानगीचा प्रकार जाहला. आठ रोजपर्यत खलबत जाहलें. शेवटी श्रीमंत राजश्री भाऊसाहेबी२५४ जावें, ऐसा सिद्धांत होऊन पडदुराहून वद्य एकादशीस कुच करून मु।। मजकूरास आले. तेथून फाल्गुन वद्य त्रयोदशीस श्रीमंत राजश्री भाऊसाहेब डेरादाखल झाले. या लष्कराहून पुढें दोन कोसांवरी मुकाम केला आहे. दोन चार रोज मुक्काम करून लोकांचे हिशेबकितेब आजमास मनास आणून दरमजलींनीं येऊन पोंहचतात. पावणा लाखपर्यंत फौज जमा जाहली आहे. पन्नास हजार फौजेनिशीं हिंदुस्थानांत येत आहेत. पंचवीस हजार फौज देशीं राहिली. निजामअल्ली व बसालतजंग व सलाबतजंग ऐसे त्रिवर्ग एकत्र जाहले. कलबुर्गेयास जाणार होते. फौज दाहा पंधरा हजारपर्यंत आहे. लबाडी करावयास चुकणार नाहीं; याजकरितां श्रीमंत दादासाहेब यांजपाशीं पंचवीस हजार ठेवून गंगातीरी ज्येष्ठमासपर्यंत दादासाहेब राहणार. श्रीमंत राजश्री नानासाहेब दरमजल पुणियास जाणार. कर्नाटकांत र॥ विसाजी कृष्ण बिनीवाले यांजबरोबर दाहा हजार फौज व दाहा तोफा देऊन रवानगी जाहली. बंदोबस्त यथास्थित केलाच आहे. पुढें अबदालीचे पारिपत्याबद्दल श्रीमंत येत आहेत. यांची सलाबत पुण्यप्रताप भारी आहे. त्याचें पारपत्य होतें. कांहीं चिंता नाहीं. मित्ती फाल्गुन वद्य १४. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विज्ञापना.