Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
जी गत शिंद्यांची झाली तीच मल्हाररावाची झाली. मार्च महिन्याच्या ४ किंवा ५ व्या तारखेस मल्हाररावाचे सरदार शेट्याजी खराडे, त्याचा पुत्र शिवाजी खराडे, रमाजी यादवाचा पुत्र आनंदरावराम व गंगाधर यशवंत चंद्रचूड ह्यांची व अबदालीची गाठ पडली व बाकीची सर्व मंडळी ठार झाली. मल्हारराव होळकर स्वतः मागेंच राहिला होता. ह्या मागें मागें रहाण्याच्या कामी गोविंदपंत बुंदेल्याशीं मल्हाररावाचें साम्य चांगलें जुळतें. ह्यावेळीं मल्हाररावाचें वय ६४ वर्षांचें व गोविंदपंताचें सुमारें तितकेंच असावें. दोघेहि वयस्कर झाले असून तरुणपणची तडफ, त्यांच्या अंगीं राहिली नव्हती. जेथें जातील तेथें माघार घेण्याचा त्यांचा विचार फार असे. लढाईच्या कामीं त्यांचा उत्साह जरी थंडा होत चालला होता तरी द्वेष, मत्सर, कुडाभाव, स्वामिद्रोह व मित्रद्रोह करण्याच्या कामीं ह्या दोघां म्हाता-याचें पाऊल सारखे पुढें होतें. द्वेष व मत्सर ह्या गोड व तिखट दुर्गुणांना भुलून जाऊन ह्या दोघांनीं दत्ताजींचें व पेशव्यांचें अतोनात नुकसान केलें. असो. शिंद्यांप्रमाणें मल्हाररावाचीं दुर्दशा झाल्यावर मेच्या सुमारास शिंदेहोळकर केरौलीच्या आसपास राहिले व अबदाली यमुनेच्या उत्तरतीरीं अंतर्वेदींत अनुपशहरीं जाऊन बसला.
शिंद्यांच्या पराजयाची बातमी १७५९ च्या डिसेंबरांत व १७६० च्या जानेवारीत पेशव्यांना पोहोचली. त्यावेळी पेशवे उदगीरच्या मोहिमेंत गुंतले होते. शिंद्यांची अबदालीशीं युद्धे १७५९ च्या जूनच्या अगोदर झालीं व त्याच्या अगोदर त्यांनीं पेशव्यांना मदतीस येण्याविषयीं पत्रे पाठविलीं वगैरे भ्रामक विधानें रा. नातू ह्यांनीं महादजीच्या चरित्रांत (पृष्ठें ५४-५५) केलीं आहेत. त्यांचें निरसन २४५ व्या टीपेंत मी साधार केलें आहे. येथे फक्त १७५८ त दत्ताजी हिंदुस्थानांत गेल्यापासून सदाशिवरावभाऊनें व बाळाजी बाजीरावानें १७६० च्या मार्च-एप्रिलपर्यंत केलें काय त्याचें दिग्दर्शन करितों.
१७५७ त शिंदखेडच्या लढाईत विश्वासरावाला मदत न केल्याबद्दल जानोजी भोसल्यावर बाळाजी बाजीराव व सदाशिव चिमणाजी चालून गेले ते १७५८ च्या एप्रिल-मेंत पुण्यास आले. १७५८ च्या जून पासून सप्टेंबरपर्यंत ते पुण्यास होते. १७५८ च्या जुलैत रघुनाथराव लाहोराहून पुण्यास आला. पुढें बाळाजी बाजीराव आक्टोबरांत कोकणांत पुळ्याच्या गणपतीस गेला. तो १७५९ च्या मार्चात पुण्यास आला. तोंकालपर्यंत पुण्यांत सदाशिवरावभाऊ कारभार पहात होता. १७५९ च्या मार्चात गोपाळराव गोविंद श्रीरंगपट्टणाकडे मोहिम करीत होता; दत्ताजी शिंद्या दिल्लीहून लाहोराकडे चालला होता व कोकणात मानाजी आंग्रे व रघोजी आंग्रे, कांसे, उंदेरी वगैरे शामळांची स्थळे घेण्यात गुंतले होते (का. पत्रें, यादी ६१, ७६, १०२). बाकी हिंदुस्थानांत व दक्षिणेंत वरकांती शांतता विराजत होती. ह्यावेळीं सदाशिवरावभाऊच्या व बाळाजी बाजीरावाच्या मनांत काहीं प्रचंड कल्पना खेळत होत्या.