Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

बाळाजी बाजीरावाच्या व सदाशिवरावभाऊच्या मनांत रघुनाथरावानें जाण्याचें नाकारावे असेच होते. कारण, ह्या वेळी प्रसंग फार बिकट होता माधोसिंग, विजेसिंग, पृथुसिंग, नजीबखान, मल्हारराव, गोविंदपंत व अबदाली असल्या गृहशत्रूच्या व परशत्रूच्या पुढे राघोबासारख्या भोळ्या सांबाचा टिकाव क्षणभरहि न लागता. असल्या चांडाळचौकडीचा खरपूस समाचार घेण्यास सदाशिवरावभाऊसारखाच पंचतंत्री मुत्सद्दी हवा होता. तेव्हां हिंदुस्थानांत त्याची रवानगी करून देण्यात बाळाजी बाजीरावानें आपल्या विचारशक्तीचा केवळ गौरव केला असेंच कबूल करणें भाग पडतें.

बाळाजी बाजीरावानें सदाशिवरावभाऊची जी निवड केली ती यथायोग्य होती. कारण, सदाशिवरावभाऊ असा उत्तम मुत्सद्दी म्हणून नांवाजला गेला होता तसा लढवय्या सरदार म्हणूनहि त्याचा चांगला लौकिक होता. १७४७ त सदाशिवरावभाऊने बहादूर मेंड्याची स्वारी केली (का. पत्रे, यादी ६८). १७५० त यमाची शिवदेवाचें बंड त्याने स्वतः जाऊन मोडिले -१७५१ च्या मार्चात बाळाजीने सलाबताला तुंगभद्रेवर अडविलें त्या वेळी भाऊ त्याच्या बरोबर होता. १७५१ च्या नोव्हेंबरांत सलाबत बुसीला घेऊन कोरेगांवास आला तेव्हा भाऊ लढाईत हजर होता. १७५२ च्या डिसेंबरातं भालकीची लढाई झाली तींत तो होता. १७५३ च्या जानेवारींत श्रीरंगपट्टणची स्वारी झाली. तींतही भाऊ व रामचंद्रबाबा शेणवई हे दोघे होते. १७५४ च्या होळीहोन्नरच्या स्वारींत भाऊ तीन दिवस मोर्च्यांत होता. १७५५ च्या सावनूरच्या स्वारींत भाऊ हजर होता. १७५७ च्या श्रीरंगपट्टणच्या स्वारींत भाऊ मोर्च्यांत होता. १७५८ च्या जानोजी भोसल्यांवरील टेहळणींत भाऊ होता. १७६० त उदगीरची लढाई भाऊ व विश्वासराव ह्या दोघांनीं चालविलीं. सारांश, भाऊला लढाईचा सराव सारखा तेरा वर्षे होता. रघुनाथरावाचीं पहिली मोहीम १७५० त झाली म्हणजे १७६० पर्यंत रघुनाथरावाला लढाईचा सराव सरासरी दहा वर्षे होता. रघुनाथरावाची तडफ व भरारी ह्या गुणांबद्दल जशी ख्याती होती तशी भाऊची युक्ति व दूरदर्शीपणा ह्यांबद्दल प्रसिद्धी होती. रघुनाथराव फार मेहनत करून थोडें फल मिळवी; सदाशिवरावभाऊ थोड्या युतीक्तीनें फार लाभ करून घेई. रघुनाथरावानें लाहोरापर्यंत भटकून शत्रु व बरेंच कर्ज पैदा केले. सदाशिवरावभाऊनें जवळच्या जवळ सलाबतजंगावर स्वा-या करून दीडदोनकोटींचा मुलूख मिळविला व शहानवाजखान, सय्यदलष्करकखान व मुस्साबुसी अशांचा स्नेह जोडिला. दत्ताजी शिंदे, नाना पुरंदरे, महीपतराव चिटणीस असले सज्जन सदाशिवरावाच्या प्रीतींतले व मल्हारराव होळकर, सखारामपंत बोकील व सखाराम हरी असले दुर्जन रघुनाथरावाच्या मर्जीतले. तात्पर्य, सदाशिवरावभाऊ व रघुनाथरावदादा ह्या दोघांत जमीनअस्मानाचें अंतर होतें. हे बाळाजी बाजीराव १७४२ पासून जाणून होता (टीप ११३ पहा). महादोबा पुरंध-यानेंहि भाऊसाहेबाविषयीं असेच मत दिले आहे (र. या. पाणिपतची बखर, पृष्ठ ८).