Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१६५]                                        ।। श्री ।।                 १५ फेब्रुआरी १७६०.

तीर्थस्वरूप राजश्री गोविंदपंत दादा वडिलाचे सेवेसीः-

अपत्यें बाबूराव दोनी कर जोडून शिरसाष्टांग नमस्कार विनंति तागायत माघ वद्य १४ पावेतों मुक्काम अमदानगर येथें लष्करांत यजमानापाशीं सुखरूप असों. विशेष. वडिलांचीं पत्रें दक्षणी मित्तीचीं पौष वद्य ७ सप्तमीचीं आलीं ते येथें माघ शुद्ध १० दशमीस पावलीं. पत्रार्थ आज्ञेप्रमाणें करून सरकारीं पत्रें सरकारांत दिलीं. त्यांत मजकूर उदईक शिंदे यांजशीं व अबदाली याजशीं युद्ध प्रसंग आहे. याजप्रमाणे वर्तमान. त्यास, छ २०२३७ विसावे जमादिलावलीं #बडाऊच्या घाटीं अबदालीशीं आपले फौजेशीं युद्ध जाहलें. रा. पाटीलबावांस मानेवर गोळी लागली. रणांत राहिले. ह्मणून पत्रें छ २५ जमादिलावलीचीं पुरुषोत्तमपंत याचीं आलीं. हेंच वर्तमान अगोदर चवदावे रोजीं दिल्लीहून सावकारी२३८ शहरास आलें, याजप्रमाणें. शिंदेयांशी लढाई जाली. पाटील युद्धांत गोळी लागून राहिले. याजप्रमाणे उज्जेनहून गोविंद विश्वासराव यांची पत्रें साडेसा रोजांचीं आलीं उज्जेनहून. त्या मागून उज्जेनहून दुसरें पत्र आलें कीं रणांत पाटीलबुवा राहिले. आपले फौजेचा भणाण जाहला. मग पेंढारी रण सोधावयास गेले. अबदाली दिल्लींत गेला. त्यांणी रण सोधिले तों पाटीलबुवा रणांत जीवंत सांपडले. पेंढारी उचलून लष्करांत घेऊन आले. याजप्रमाणें उज्जेनहून पत्रें आलीं. आपली फौज पळाली ते कोटपुतळीनजीक सांवर धरून र॥ जनकोजीबावा मुक्काम करून राहिले. बुनगे सडे हत्ती, उंटें राहिलीं. लुटिलीं गेलीं. तों मुकाम मजकुरीं र॥ मल्हारजीबावा होळकर फौजसुद्धां आले. उदईक भेटी होतील ह्मणून पत्रें वकीलांची उज्जेनीचे पत्रांत भेटले. अबदाली याणें तेमूरपातशा बसविला, त्याची दोही फिरविली, गाजुद्दीखान लष्करीं आले, त्याजबराबर पातशाहाजादा आले, याजप्रमाणें येथें वर्तमानें आलीं.२३९ परंतु तेथून कोणाचें पत्र आलें नाहीं. त्यावरून यजमान फार श्रमी. आपलीं पत्रें रोज जलद येतात. या दिवसांत पत्रें यावीं ते येत नाहींत. काय विचार आहे हा न कळे. ऐसियास, वडिलीं सविस्तर वर्तमान लिहून पाठविणें. सविस्तर जरूर जलद वर्तमान लिहून पाठवणें. मजला फार चिंता लागली आहे. वडील तेथें होते. परंतु बुनगेयांत होते. ते चाकरी वडिलास सांगितली आहे. ह्मणून पत्रें येथें वकिलांची आलीं होतीं. सविस्तर लिहून पाठवावयास आज्ञा करावी.

देशाकडील वर्तमान तर मोगलाशीं बिघाड जाहला होता तें वर्तमान सविस्तर सेवेसी लिहिलें होतें. अलीकडील वर्तमान तर मोगलास उदगिरीस नजीक बेदर येथें गांठ श्रीमंताची पडली. तेथें युद्ध जाहलें. परंतु ते माफक. त्याजवर मोंगल आवशास आला. वाटेस युद्ध होत आला. आवशाहून धारूरास येणार. वीस कोस आवशाहून धारूर. त्यास तीन मुक्काम, दाहा कोस मोंगल आला. धारुरास र॥ व्यंकटराव निंबाळकर, लक्षुमणजी खंडागळे व आणखी कांहीं मराठे ऐसी सात आठ हजार फौज जमा झाली. ते सामील करून घ्यावी याजकरितां मोंगल चालिला. तों श्रीमंत भाऊसाहेब, दादासाहेब यांणीं मनसुबा केला जे दहा कोस धारूर राहिलें. धारूरास गेला, मराठे मिळाले ह्मणजे विचार पडेल, हें उत्तम नाहीं. ते करार झाला. माघ वद्य २ द्वितीयेस २४०रविवारीं मोंगलाचे कुच आहे. युद्ध उत्तम करावें; मरेल तो मरो. याप्रमाणें मातबर सरदार होते, त्यांशीं सर्वांहीं करार याजप्रमाणें केला. त्याप्रमाणे प्रातःकाळीं कुच जाहलें. दोन प्रहरां मुकामास न येतां तळावर आठ कोसांवर मोगल आवळून राहिला. आह्मांकडील तोफ लागली. त्याजवर दोन प्रहरां युद्ध जाहलें.