Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
मराठ्यांची फौज १७५९ च्या ७ नोव्हेंबरला गंगेअलीकडे आली; तों थोडक्याच दिवसांत अशी बातमी आलीं कीं अबदाली लाहोरास येऊन पोहोंचला. १७५८ च्या मेंत रघुनाथरावानें तैमूरशहाला हाकून दिल्यापासून अबदाली हिंदुस्थानांत येणार होताच. परंतु बलुचिस्थानांत नासीरजंगानें बंड केले होतें तें मोडून शिकारपूरच्या वाटेनें हिंदुस्थानांत येण्यास त्याला १७५९ चा नोव्हेंबर महिना लागला. अबदाली ज्या अर्थी १७५९च्या नोव्हेंबरात लाहोरास आला त्याअर्थी १७५९ च्या सप्टेंबरांत तो अनूप शहरी आला म्हणून कीन म्हणतो (Fall of the Mogul Empire p.41) तें अविश्वनीय आहे हे उघड आहे. दत्ताजीच्या मनांत नजीबखानाला पक्की तंबी पोहोचवावयाची होती, परंतु, अबदालीच्या येण्यामुळें दत्ताजीला तें काम तसेंच ठेवून द्यावें लागलें व तो लचकरच शुक्रतालास आला. रोहिले व सुजाउद्दवला यांना दबकविण्याकरितां गोविंद बल्लाळाचा पुत्र बाळाजी गोविंद ह्यास ठेवून दत्ताजीनें यमुनेकडे मोर्चे वळविले (लेखांक १४३). शुक्रतालाहून कुच करून दत्ताजी यमुना कुंजपु-यावर उतरला व अबदालीशीं टक्कर देण्याची तयारी करूं लागला. लाहोरास आल्यावर शीख लोकांची व अबदालीची एक मोठी लढाई झाली. साबाजी शिंदे व त्रिंबक बापूजी हीं दोन पथकें दत्ताजीनें १७५८ त पंजाबांत ठेविलीं होतीं. तीं दोन्ही महिना पंधरा दिवसांच्या अंतरानें दत्ताजीला येऊन मिळालीं. लाहोरास अबदाली आला त्याचवेळी साबाजी शिंदे दत्ताजीस शुक्रताल येथें येऊन मिळाला. त्रिंबक बापुजी अबदालीच्या पुढें सरकत सरकत सरहिंदापर्यंत आला. तेथें त्याची व गव्हारांची लढाई जुंपली. त्या लढाईत त्रिंबक बापूजीचें पथक गव्हारांनीं सर्वस्वीं नागविलें. त्रिंबक बापूजीच्या पथकांतील माणसें-उघडीं बोडकीं अशीं-दत्ताजीच्या सैन्यास नोव्हेंबरच्या २३ व्या तारखेला मिळालीं (लेखांक १४६). कुंजपु-याहून दत्ताजी निघाला तों त्याची व अबदालीची सन्निधता दहा कोसांच्या अंतरानें ७ डिसेंबरीं झाली (लेखांक १५५). ह्या सुमारास येरंड्यांना भेटावयास जाण्याकरितां गोविंदपंत दत्ताजीपाशीं निरोप मागूं लागला. ह्याचा राग येऊन दत्ताजी अबदालीला रेटण्यास एकटाच निघाला व गोविंदपंताला आपले कबिले बुणगे दिल्लीकडे घेऊन जाण्यास त्यानें सांगितलें (लेखांक १४७). इतर कांहीं मंडळींबरोबर गोविंदपंत बुंदेल्याला दत्ताजीनें पुढें अबदालीच्या तोंडावर पाठविलें म्हणून भाऊसाहेबाच्या बखरीच्या आधारावर रा. नातू महादजीच्या चरित्रांत (पृष्ठ ४९) लिहितात, तो खरा प्रकार नसून, गोविंदपंत मागें राहिला. ह्या प्रसंगासंबंधानें लिहित असतां गोविदपतानें फारच चमत्कारिक शब्द वापरिले आहेत. अबदालीची व दत्ताजीची “आज लढाई अगर प्रातःकाळीं होईल” असें येरंड्यांना कळवून गोविंदपंत पुढें म्हणतो, “ईश्वर ज्यास यश देईल त्यास सुखें देऊ!” ह्या वाक्यावरून व विशेषतः “सुखे” ह्या शब्दावरून गोविंदपंताची दत्ताजीच्या ठायीं कितपत भक्ति होती तें स्पष्ट ध्यानांत येण्यासारखें आहे (लेखांक १४७). गोविंदपंत कबिले बुणगे घेऊन पाठीमागें राहिला त्यांत गाजुद्दिन वजीरहि होता. १० नोव्हेंबराच्या सुमाराला अलमगीर पातशाहाला ठार मारून गाजुद्दिन नोव्हेंबराच्या १४/१५ तारखेला मराठ्यांच्या सैन्यांत सामील झाला होता (लेखांक १४३). त्याला घेऊन गोविंदपंत मथुरेकडे गेला व दत्ताजी अबदालीची टेहळणी करीत राहिला. दत्ताजीच्या व अबदालीच्या दोन चार झटापटी होऊन २४ डिसेंबरी एक मोठं युद्ध झालें. त्यांत मराठ्यांना यश आलें (लेखांक १५७).