Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

१७५८च्या जुलैंत रघुनाथराव पुण्यास आला. ह्याच सुमाराला दत्ताजीची रवानगी हिंदुस्थानांत झालीं. १७५८ च्या डिसेबरपर्यंत दत्ताजीचा व जनकोजीचा काल रजपुतान्यांतील मवासांची व संस्थानिकांची व्यवस्था लावण्यात गेला. नंतर ते दिल्लीस गेले. तेथे १७५९ च्या जानेवारी फेब्रुवारीपर्यंत राहून बाळाजी बाजीरावाने सांगितलेल्या कामगि-या करण्याच्या उद्योगास ते लागले. ह्या कामगि-या येणेंप्रमाणें होत्याः- (१) लाहोरचा बंदोबस्त करून तेथून पैसा पाठवणें. (२) नजीबखानाला तंबी देणे. (३) सुजाउद्दौल्याकडून काशी प्रयाग घेणे व बंगल्यावर स्वारी करणें (४) सुजाउद्दौल्याला अगर गाजुद्दिनाला वजिरी देऊन कसे तरी पन्नास लाख रुपये काढणें. (५) अंताजी माणकेश्वराला दिल्लीच्या कामांतून काढून टाकणें. पैकी पहिल्या कामास म्हणजे लाहोरचा बंदोबस्त करण्यास दत्ताजी शिंदे १७५९ च्या मार्चांत गेला व सतलज नदीवर एप्रिलांत जाऊन पोहोंचला (का. पत्रें, यादी ३६२). तेथून साबाजी शिंदे व त्रिंबक बापूजी ह्या दोन सरदारांना लाहोरकडे पाठवून दत्ताजी स्वतः नजीबखानाला तंबी देण्याकरितां व सुजाउदैल्यावर स्वारी करण्याकरितां १७५९ च्या जून महिन्याच्या सुमाराला कुंजपु-यास आला. कुंजपु-यावर यमुना उतरून अंतर्वेदींत गेला व गोविंदपंत बुंदेल्याला इटाव्याकडून नजीबखानास पायबंद देण्यास त्यानें हुकूम केला. १७५९ च्या सप्टेंबरपर्यंत अतर्वेदींतील नजीबाचा मुलूख घेऊन दत्ताजीने २२ अक्टोबरला शुक्रतालास गंगानदी ओलांडिली व खुद्द रोहिलखंडात प्रवेश केला. गोविंदपंत बुंदेल्यानेंहि ह्याच सुमाराला गंगा उतरून जलालाबादेनजीक ठाणें दिलें (लेखांक १३८). वरून दत्ताजी व खालून गोविंदपंत ह्यांच्या कचाटींत सापडल्यामुळें नजीबखानाची ह्यावेळीं बहुतेक गाळण उडून गेली. तो, त्याचा मुलगा व त्याचे साथीदार-दुंदेखान, सादुल्लाखान व हफीज रहिमत-ह्यांचा दोन चार लढायांत पराजय झाला; नजीबखानाच्या पुलापर्यंत मराठ्यांनीं रोहिल्यांचे गांव जाळले व नजीबखानाच्या पुलच्या दोन नावा तोडून त्याचा पूल केवळ निरुपयोगी करून टाकिला. ही अशी जबर तंबी मिळाल्यावर नजीबखानानें हफीज रहिमतखानाच्या द्वारें वरकरणी सलूखाचें बोलणें लाविलें (लेखांक १३९) व आतून सुजाउद्दौल्याचे सूत्र सिद्ध करून ठेविलें. मराठे आपलाहि मुलूख पुढें मागें बळकविणार या रागानें, लखनौहून रामगंगेस पूल बांधोन सुजाउद्दौला व उमरागीर गोसावी दहा-बारा हजार सैन्यानिशीं जलालाबादेस येऊन पोहोचले. गोविंदपंत जलालबादेच्या आसपास असून त्यानें सुजाउद्दौल्याला काहीं एक अडथळा केला नाहीं. मराठ्यांची फौज संख्येनें अतीच कमी असल्यामुळें, सुजाउद्दोला नजीबखानाच्या मदतीस येतो असें ऐकून, गंगेच्या अलीकडे आलीं व कांहीं फौज व बुणगे यावयाचे राहिले होते त्यांपैकी कित्येक नजीबखान बाहेर निघाला अशी खोटीच दहशत खाऊन गंगेच्या अलीकडे येतांना पाण्यांत बुडून मेले, कित्येक वाहवले व कित्येक मारले गेले. ह्या प्रसंगाचे वर्णन करितांना गोविंदपंतानें दत्ताजीच्या व्यवस्थेची थट्टा केली आहे (लेखांक १४१).