Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

रजपुतान्यांतील माधोसिंग, बिजेसिंग वगैरे संस्थानिकांच्या मामलती विल्हेस लावण्याच्या कामीं मल्हाररावानें रघुनाथरावदादाला बरेच अडथळे आणिले (लेखांक ७१, ६६). का कीं, ह्या मंडळीला मल्हाररावाची आंतून फूस होती. सहारणपूर, जालापूर वगैरे ठिकाणचे रोहिले रघुनाथरावाला शरण आले. परंतु नजीबखान रोहिला दादासाहेबाच्या हातीं लागला नाहीं. १७५७ त पातशहाला व गाजुद्दिनाला फसवून नजीबखान अबदलीला मिळाला होता. रघुनाथराव दिल्लीस आल्यावर ह्या लुच्याचें शासन करणार तों तो दिल्लीतून मोठ्या शिताफीनें पळून गेला. पुढें त्यानें मल्हाररावाला अंतस्थ रीतीनें पैसा देऊन रघुनाथरावाचा राग कसा तरी टाळला (लेखांक ४८). लाहोरास जाऊन जाहानखान व अबदालीचा पुत्र तैमूरशाहा यांना रघुनाथरावानें घालवून दिलें व मराठ्यांचा अंमल त्या प्रांतांत बसविला, परंतु अबदालीचा कायमचा बंदोबस्त त्याच्या हातून झाला नाहीं (का पत्रें, यादी ३४१). आपण गेल्यावर पाठीमागून अबदाली लाहोरास येईल म्हणून अंताजी माणकेश्वरानें दादासाहेबाला सुचविले होतें. (का पत्रें,यादी ३४१) परंतु पावसाळ्यामुळें दादाला देशीं लवकर जाणें भाग पडलें व अबदालीचा कायमचा बंदोबस्त करण्याचें, मामलतदार व मुत्सद्दी यांची चवकशी करण्याचें व पूर्वेकडे स्वारी करण्याचें काम तहकूब ठेवून तो पुण्यास परत आला. ह्या स्वारींत मिळकत काडीचीहि न करितां रघुनाथराव एक कोट रुपवे कर्ज करून आला. ह्या कर्जाचे ओझें बाळाजी बाजीरावाला फारसे वाटलें नाहीं (टीप २५४ पहा). बाळाजी बाजीरावाला रघुनाथरावाचा जो राग आला तो वरील नऊ कामें त्यानें केली नाहीत म्हणून आला. माधोसिंग, बिजेसिंग वगैरे संस्थानिकांचा कल अबदालीकडे आहे; दामोदर महादेव, लक्ष्मण शंकर वगैरे मंडळी रयतेंत फितूर करितात; अंतस्थ नजराणा घेऊन मल्हारराव नजीबखानाला आश्रय देतो; काशी प्रयाग देण्याच्या सुजाउद्दौला नुसत्या थापा मारितो; गोविंदपंत वगैरे मामलतदार पैशाची अफरातफर करतात; वगैरे कथा पेशव्यांच्या मुत्सद्दी मंडळांत प्रसिद्ध असून व त्यांचा प्रतिकार करण्याकरिता रघुनाथरावाला मुद्दाम पाठविलें असून, त्याच्या हातून जेव्हां तें काम झालें नाहीं, तेव्हां रघुनाथरावांच्या नाकर्तेपणाचा नानासाहेबाला व भाऊसाहेबाला वीट आला व पुढें कोणत्याहि महत्त्वाच्या नाजूक प्रसंगी रघुनाथरावावर कामगिरी सोपविण्यांत अर्थ नाही अशी त्यांची खात्री झाली. रघुनाथरावाच्या ह्या नाकर्तेपणाबद्दल ह्या दोघांनी काही कालपर्यंत एक चकार शब्दहि काढिला नाहीं पुढें वेळ आली तेव्हां मात्र आपल्या मनांतील आशय भाऊसाहेबानें रघुनाथरावाला बोलून दाखविला व बाळाजी बाजीरावाने भाऊसाहेबाचें समर्थन केलें. ह्या प्रकाराचा उल्लेख पुढील वर्णनांत येईल.