Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
(३) सरदार-मामलतदारांकडून येणा-या वार्षिक रसदेची रक्कम दरवर्षी नवीन ठरविली जात असे. रयतेकडून जास्त उत्पन्न मामलतदार घेतात असें दरखदाराच्या नजरेस आल्यास रसदेची रक्कम वाढविली जात असे. (४) सरकारी मोहिमांस पेशवे सांगतील तेव्हां सरदारांना आपापल्या सरंजामी फौजा घेऊन जावे लागे. (५) सरदारांच्या जहागिरीची तगारी बहाली पेशव्यांच्या खुषीवर असे. (६) तथापि ह्या जहांगिरी वंशपरंपरेनें चालणा-या असत. (७) जहागिरदार निपुत्रक झाल्यास दत्तक कायम करण्याचा अधिकार पेशव्यांचा असे. (८) एखाद्या सरदाराची वावगी वर्तणूक दिसल्यास त्यास बर्तर्फ करण्याचा अधिकार पेशव्यांस असे. (९) परराष्ट्रांशी किंवा संस्थानिकांशीं तहरह पेशव्यांच्या नांवानें, संमतीनें व आज्ञेप्रमाणें सरदारांना करावा लागे. १७५० पासून १७६१ पर्यंत (सध्यां ह्या-अकरा वर्षांचाच विचार ह्या प्रस्तावनेंत चालला आहे हें ध्यानांत धरून) पेशव्यांचा सरदारांशीं हा असा संबंध होता हें ह्या अकरा वर्षांतील घडामोडीसंबंधीं जे काहीं कागदपत्र उपलब्ध झाले आहेत, त्यांवरून दिसून येतें. ह्या कागदपत्रांत सातारच्या छत्रपतींच्यासंबंधीं एक अक्षरहि नाहीं. पेशवे आपले मुख्य आहेत व आपलें बरे वाईट काय पाहिजे तें करण्याचा अधिकार सर्वस्वी पेशव्यांच्या हातांत आहे असा सरदारमंडळांत सर्वत्र ग्रह झाला होता. सातारच्या राजमंडळांतील, प्रतिनिधी, सचिव, दाभाडे, सुमंत, राजाज्ञा वगैरे सरदार क्षुल्लक असून पेशव्यांच्या शिंदे, होळकर, विंचूरकर इत्यादि सरदारांप्रमाणें व पुरंधरे, फडणीस, मुजुमदार इत्यादि मुत्सद्यांप्रमाणें वजनदार पुरुष त्या राजमंडळांत एकही नव्हता. तेव्हा त्यांचा विचार करण्याची येथें जरूरच राहत नाहीं. शिंदे, होळकर, भोंसले, गायकवाड, विंचूरकर, राजेबहाद्दर, बुंदेले वगैरे सरदारांच्या मामलतदारांच्या वर्तनांचा तेवढा येथे विचार करावयाचा आहे. वर नमूद केलेल्या ९ बंधनांनी ह्या सरदारांच्या व मामलतदारांच्या हालचाली नियमित करून टाकिलेल्या होत्या. कोणतेंहि मुलकी किंवा लष्करी लहानमोठं काम करावयाचें असल्यास सरदारांना व मामलतदारांना पेशव्यांची परवानगी घ्यावी लागे. राज्याचीं सर्व सूत्रे पेशव्यांच्या हातांत एकीभूत झाली होतीं. मोहिमा, तह, महालांची जमा व त्याचा खर्च ह्या सर्वांची व्यवस्था पुण्याहून होत असे. सरदारांना स्वतंत्र हालचाल कोठेंच करितां येण्याची सवड सदाशिवरावभाऊनें व बाळाजी बाजीराबानें ठेविली नव्हतीं. त्याकालीं सत्तेचें केंद्रीभवन पेशव्यांच्या ठायीं पूर्णपणें होत चाललें होतें. हा केंद्रीकरणाचा उद्योग बाळाजी बाजीरावानें १७४० पासून सुरूं केला. १७४४ त त्यानें रघोजी भोसल्याची हालचाल मर्यादित केली. १७४६ त बाबूजी नाईक बारामतीकराला त्यानें घरी बसविलें. १७५० त प्रतिनिधि व यमाजी शिवदेव ह्यांची, १७५१ त दाभाडे व दमाजी गायकवाड ह्यांची व १७५३ त ताराबाईची रग जिरवून त्यानें सातारच्या छत्रपतींचें महत्व कमी केलें. सारांश, १७५३ च्या पुढें मराठ्यांच्या हालचालींची सर्व सूत्रे बाळाजीच्या हातीं केंद्रीभूत झाली. पेशव्यांच्या हाती झालेल्या सत्तेच्या ह्या केंद्रीभवनाच्या विरुद्ध बरीच खटपट ह्यापुढें काहीं सरदारानीं, मामलतदारांनी व मुत्सद्यांनीं केली. ही खटपट सत्तेचे केंद्रीभवन झालें नव्हतें म्हणून करितां आली अशी गोष्ट नसून, सतेचे केंद्रीभवन फार झालें व तें तत्कालीन काहीं सरदारांना असह्य झालें म्हणून ती करितां आली. होळकर, शिदे वगैरे सरदारांचें पारडें पुढें फार जड होईल म्हणून ह्या वेळेपासून बाळाजीनें व सदाशिवरावभाऊनें त्यांना योग्य बंधनांनीं जखडून टाकण्याचा बेत केला. हा बेत तडीस नेत असतां पेशव्यांना त्यांच्या स्वतःच्या सरदारांकडून अडथळे येऊ लागले. पूर्वीच्या राजमंडळातील सरदारांच्या शत्रुत्वाच्या ऐवजी आतां पेशव्यांच्याच सरदारांकडून पेशव्यांना त्रास पोहोंचूं लागला.