Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

ताराबाईच्या ह्या तोंडच्या बडबडीनें १७५३ च्या पुढें बाळाजीचें कांहींच नुकसान झालें नाहीं. सरदारांपैकीं ब्राह्मण अगर मराठे कोणींहि तिच्याकडे लक्ष्य दिलें नाहीं. अर्थात् ताराबाईचा पुरस्कार करून बाळाजीचें वाकडें करण्यास १७५३ च्यापुढें कोणीच धजला नाहीं. पानिपतच्या मोहिमेच्या वेळीं तर ताराबाईचें व रामराजाचें स्मरणहि कोणास राहिलें नाहीं. १७५१ त ताराबाईचा कड घेऊन भांडणारा दमाजी गायकवाड १७६० त पेशव्यांच्या बाजूनें पानिपतच्या मोहिमेंत हजर होता. येणेंप्रमाणे पानिपतीयुद्धांत ताराबाईच्यामुळे पेशव्यांचें कांहींएक नुकसान झालें नाहीं. मराठा सरदारांपैकीं भोसल्यांखेरीज बहुतेक सर्व सरदार व ब्राह्मणांपैकींहि प्रतिनिधीखेरीजकरून बहुतेक सर्व सरदार पानिपतांत हजर होते. रामराजाला व ताराबाईला पेशव्यांनीं शून्यवत् करून सोडिलें म्हणून कोणी सरदार पेशव्यांच्या विरुद्ध गेल्याचा दाखला तर कोठें मिळत नाहींच; परंतु, कोठें ध्वनि देखील काढिलेला आढळत नाहीं. आतां मराठ्यांपैकीं कांहीं सरदार व ब्राह्मणांपैकीं कांहीं सरदार पानिपतच्या मोहिमेंत पेशव्यांच्या उलट गेल्याचे दाखले सांपडतात. परंतु, त्या उलट जाण्याचा संबंध छत्रपतींच्या शून्यावस्थेशीं मुळींच नसून इतर कारणांशीं आहे. ह्या कारणांचे स्पष्टीकरण पुढल्या कलमांत केलें आहे.

(ब) पेशव्यांच्या हातीं सर्व सत्ता आली त्यावेळीं मुख्य सरदार व मामलतदार म्हटले म्हणजे, शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, भोसले, अंताजी माणकेश्वर, विठ्ठल शिवदेव, गोविंद बल्लाळ, गोपाळराव पटवर्धन, नारो शंकर, मानाजी आंग्रे, सदाशिव रामचंद्र शेणवई, रामचंद्र गणेश कानडे, त्रिंबकराव विश्वनाथ पेठे, मेहेंदळे, पुरंधरे, चिटणीस, पायगुडे, थोरात वगैरे होत. हे सर्व सरदार पेशव्यांचे नोकर असत. उत्पन्नाच्या संबंधाने ह्या सरदारांची गणना मामलतदार म्हणून होत असे. ह्यांनीं आपापल्या प्रांतांतील वसूल उत्पन्न करून, खासा, कारकून व शिबंदी यांचा खर्च वारून बाकी राहील तो पैसा रसद म्हणून पुण्यास पोंचवावा असा करार असे. ह्यांपैकीं कित्येक मामलतदारांना लहानमोठ्या फौजा बाळगाव्या लागत. ह्या फौजांच्या खर्चाकरितां जे निव्वळ मामलतदार असत त्यांना महालांतून रोकड रक्कम मिळे व जे सरदार असत त्यांना सरंजामाला महालांतील कांहीं प्रांत स्वतंत्र तोडून दिलेला असे. ह्याप्रमाणें मुलकी व लष्करी अशा दोन नात्यांनीं पेशव्यांशीं सरदारांचा संबंध येई. सरदारांनीं मोंगलाईंतील एखादा प्रांत काबीज केला म्हणजे त्याची सरकार व सरदार ह्या दोघांत कांहीं प्रमाणानें वांटणी होत असे. (१) सरदारांना आपापल्या प्रांताचा हिशोब वर्षाच्या वर्षास खडान् खडा द्यावा लागे. (२) सरदारांच्या ताब्यांतील प्रांतातील संस्थानिक, जमीदार व रयत ह्यांना सरदार-मामलतदाराविरुद्ध तक्रार करावयाची असल्यास संस्थानिकांना खुद्द पुण्याच्या दरबारांत जाऊन दाद मागतां येत असे आणि जमीदार व रयत ह्यांना पेशव्यांनीं पाठवून दिलेल्या दरखदारांना भेटून आपली गा-हाणी सांगतां येत.