Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
१७५० किंवा १७५३ सालापर्यंत बाळाजीनें, दाभाडे, गायकवाड, प्रतिनिधि, यमाजी शिवदेव, ताराबाई व भोसले ह्यांचे महत्च कमी करण्याचा उद्योग केला. १७५० पासून पुढे पेशव्यांना आपल्याच सरदारांचे डावपेंच, कृत्रिमपणा, फितवेखोरी व उद्दामपणा ह्यांना आळा घालण्याचें काम पत्करावें लागलें. बाळाजी बाजीरावाच्या व सदाशिवरावभाऊच्या अधिकाराखाली सरदारांना स्वातंत्र्य फारच थोडें राहिलें होतें. तेव्हां केंद्रप्रवण न होतां स्वतंत्र होण्याचा उद्योग निरनिराळ्या हेतूंतीं प्रोत्साहित होऊन निरनिराळ्या सरदारानीं केला. बाळाजी बाजीराव असेतोंपर्यंत (कदाचित् खर्ड्याची लढाई होईतोंपर्यंत देखील) हा उद्योग सफल झाला नाहीं. परंतु ह्या दुरुद्योगाचे हानिकर परिणाम पेशव्यांना पानिपत येथे व इतरत्र सोसावे लागले हें सोदाहरण सिद्ध करितां येण्यासारिखें आहे. ह्या दुरुद्योगाच्या खटपटी संबंधांनें, मल्हारराव होळकर, अंताजी माणकेश्वर, लक्ष्मण शंकर, बापूजी महादेव व दामोदर महादेव आणि गोविंदपंत बुंदेले, वगैरे गृहस्थांचीं नांवें प्रमुखत्वानें उल्लेखितां येतात. १७५० पासून १७६० पर्यंत ह्या इसमांच्या उद्योगाचें त्रोटक वर्णन खालीं देतों.
१७४६/१७४७ त मल्हारराव होळकर व जयाजी शिंदे बुंदेलखंडांत कालिंजर, जैतापूर, अजेगड वगैरे स्थलीं लढत होते (का पत्रें, यादी वगैरे ६२, ६९, ७४). ह्या स्थलीं दाखविलेल्या शौर्याबद्दल मल्हाररावांची बाळाजीने बहुत स्तुति केली आहे. १७४९ त मल्हारराव होळकर साता-यास बाळाजीचा पाठिंबा करण्याकरिता आला होता. १७५० त मल्हाररावाचें व जयाप्पाचें वितुष्ट पडले होतें असें लेखांक २ वरून कळतें. ह्यावेळीं ताराबाईनें मल्हाररावाला आपल्या बाजूस ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु मल्हाररावानें बाळाजीचा पक्ष सोडिला नाहीं (का पत्रे, यादी वगैरे ३५९). १७५१ त सलाबतानें बाळाजीला कुकडी नदीवर नाडिलें त्यावेळीं बाळाजीनें मल्हाररावाची पायधरणी केली. तेव्हा मल्हाररावानें जयाप्पाच्या द्वारा बाळाजीकडे शपथपूर्वक बेलभंडार पाठविला (का पत्रे, यादी वगैरे ३६३). १७५२ च्या आगष्टांत मल्हारराव व जयाप्पा दक्षिणेस आले व १७५२ च्या डिसेंबरात ते भालकीच्या लढाईंत हजर होते. पुढें १७५४ त कुंभेरीस मल्हाररावाचें व जयाप्पाचें वाकडें आलें. जयाप्पावर मारेकरी घालण्याची प्रथम सूचना मल्हाररावानेंच केली. म्हणून कित्येकांनीं शंका काढिली आहे. ह्या वेळेपासून मल्हारराव, शिंद्यांचा व पेशव्यांचा द्वेष करू लागला. १७५७ त मल्हाररावानें लटकीच लचांडें काढून रघुनाथरावास त्रास दिला (लेखांक ५२, ६७, ७१). पेशव्यांची सत्ता अपरंपार झाली हें पाहून ह्यावेळी मल्हाररावानें नजीबखानाचें संरक्षण केलें आणि दत्ताजीस व जनकोजीस पेशव्यांच्या विरुद्ध जाण्याचा इतिहासप्रसिद्ध उपदेश केला. ह्याच वेळीं रसदेच्या पैशासंबंधानें मल्हाररावाचें व पेशव्यांचे वैमनस्य आलें. १७५९ त दत्ताजीचें व अबदालीचें युद्ध चाललें असतां मल्हारराव जयपूरप्रांतीं लहानसहान गढ्या घेत बसला व दत्ताजीला त्यानें मदत केली नाहीं. दत्ताजीला मदत करण्यास जाण्याविषयीं बाळाजी बाजीरावानें मल्हाररावाला बरीच पत्रें पाठविलीं (लेखांक १५६, १५७, १६१).