Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

(१६) मल्हारराव होळकर माळव्याच्या अलीकडे खाशांनीं येऊं नये म्हणून सांगत असतां भाऊनें त्याचा उपदेश ऐकिला नाहीं.

(१७) लाहोरास जाऊन अबदालीची धाड मुद्दाम बोलावून आणण्यांत रघुनाथरावाचा मूर्खपणा झाला.

(१८) अबदालीसारख्या अनुभवलेल्या शिपायापुढें सदाशिवरावभाऊसारख्या नवशिक्या सरदाराचें कांहीं एक चाललें नाहीं.

इत्यादि कारणें पानिपतास मराठ्यांचा मोड होण्यास झालीं म्हणून ग्रंथोग्रंथीं लिहिलेलें आढळतें. ह्या कारणांत तथ्य कितपत आहे व मराठ्यांचा मोड होण्याचीं खरीं कारणें कोणतीं ह्याचा विचार करणें जरूर आहे.

(अ) स्वामिद्रोहोत्पन्न पापाचे दैवी परिणाम काय झाले असावे त्याचा तलास लावण्याचें काम धर्मशास्त्र्यांकडे सोंपवून, त्या पापाचे मानवी परिणाम काय झाले ह्याचा विचार करणे उपयोगाचें आहे. बाळाजी बाजीरावानें सातारच्या छत्रपतींना शून्यवत् करून टाकिलें ही गोष्ट सर्वस्वी खरी आहे. परंतु, सातारच्या छत्रपतींना शून्य होऊन बसण्या खेरीज अन्य गति शक्य नव्हती हीहि गोष्ट तितकीच खरी आहे. शाहूराजा वयातींत होऊन राज्य करण्यास अयोग्य झाला. त्याच्या मृत्यूनंतर रामराजा गादीवर आला. तो बुद्धीनें मंद, राजपदाला अयोग्य व मतलबाला अजागरूक असा होता. अशाचा बडीजाव करीत बसण्यांत व अशाच्या हातीं राज्यसूत्रें ठेविण्यांत राष्ट्राचें हित कांहींच साधणें शक्य नव्हतें. तेव्हां आत्यंतिक राष्ट्रहित साधण्याची ज्याच्या अंगीं कर्तबगारी विशेष त्याच्या हातांत सूत्रें जाणें स्वाभाविक व अपरिहार्य होतें. येणेंप्रमाणें बाळाजीच्या हातांत राज्याचीं सर्व सूत्रें गेलीं व सातारचे छत्रपति, त्यांचें राजमंडळ व त्या सर्वांना मुठींत ठेवूं पाहणारी ताराबाई ही साता-यांत भिकार तंटें करीत बसली. खर्चाकरितां साठ सत्तर लाखांचा मुलूख त्यांच्या नांवानें तोडून दिला होता; परंतु, त्यांतील उत्पन्न व्यवस्थेनें काढून घेण्याचीहि ऐपत त्यांच्यांत नव्हती. १७५५ त तर आपला खर्च पेशव्यांनीं चालवावा व उत्पन्नाची व्यवस्था वाटेल तशी बघून घ्यावी (चिटणीस बखर) अशी तोड त्यांनीं काढिली. ह्यामुळें छत्रपतीचें, राजमंडळाचें व विशेषतः ताराबाईचें जें काहीं थोडेसें स्थानिक महत्व होतें तेंहि गेलें. ह्यापुढें ताराबाईला व रामराजाला बाळाजीच्या ओंजळीनें पाणी पिणें भाग पडलें. हें कर्म ताराबाईनें आपल्या हातानें आपल्या अंगावर ओढून घेतलें व घरांत बसून थिटे, देवस्थळे इत्यादि पुराणिकांच्या उपदेशानें बाळाजीच्या नांवानें मात्र खडे फोडण्यास तिनें प्रारंभ केला.