Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१३९] ।। श्री ।। २१ आक्टोबर १७५९.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवसी:-
पोष्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. तुह्मी बीदा होऊन गेला. आह्मी श्रीगंगेच्या पायघाटें उतरोन जलालाबादेस गेलों. मध्यें त्याचें ठाणे सबळगडीं होतें. ते उभाउभी आवईनेंच सोडून जलालाबादेस आवघे रोहिले गेले. आवसा पाहून दुंदेखान वगैरे चौघेजण याचे कुमकेस होते. आह्मी गेलियाउपरि मामलत विल्हे लावा ऐसा पैगाम आफीजरहिमत याजकडून आला. तों अगोदरच रोहिल्याचें व सुजातदौल्याचें सूत्र जालेच होतें. तो दरकूच लखनऊहून रामगंगेस पूल बांधोन पुढें उमराव वगैरे दाहा बारा हजार प्यादीं, काही निम्मे स्वार, ऐसा जलालाबादेस आले. अटकेपलीकडून अबदाली चाळीस हजार फौजेनिसी लाहोरास येऊन खासा राहून पुढें जाहानखान वगैरे सरदार पंधरा हजार स्वारानिसी सरदेवर आले. राजश्री साबाजी पाटील अलीकडे आले. एवंच दंगा व्हावयासी जालें आहे. आपल्या फौजा राजश्री, मल्हारबा पंधरा दिवसांत येतील. त्यांचे यांचे एक झुंज जाल्यावर सर्व उत्तमच आहे. नाहीं तर कठीण काम ! दंगा व्हावयासी उशीर नाहीं. त्यास तुह्मीं तूर्त जावयाची उतावळी सर्वथा न करणें. पंधरा दिवसांत सर्व ठीक होतें. तुह्मी पंधरा दिवस इटावीसच राहून मागाहून सविस्तर आह्मी लिहून पाठवितों. एकंदर न जाणें. दक्षणेकडेहि मोगलासी कजीया. मार्ग निभावत नाहीं. तुह्मीं पुढें न जाणें. आह्मी मुजरद जोडी प।। त्याजबदल लिहून पाठवून. पुढे एकंदर न जाणें. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे हे विनंति.