Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

५४. तेव्हां ह्या विकृत इतिहासाला फार जपलें पाहिजे. परभाषांतून किंवा स्वभाषांतून लिहिलेल्या किंवा लिहिवलेल्या असल्या इतिहासांचा दुष्ट परिणाम टाळावयाला एकच उपाय आहे. तो हा कीं, सशास्त्र पद्धतीनें प्रामाणिक इतिहास स्वभाषेंत स्वदेशांतील तज्ज्ञांनीं लिहिला पाहिजे. परदेशांतील लोक स्वेतर देशाचा इतिहास नि:पक्षपातबुद्धीनें लिहितील ही गोष्ट अनेक कारणांस्तव अशक्य असते. एक तर, जो ज्या देशांत जन्मला, वाढला व शिकला, तो त्या देशाच्या संस्कृतीनें भारून जाऊन, इतर देशांची संस्कृति कमी दर्जाची साहजिकपणेंच मानूं लागतो. स्वतःचा देश व स्वतःची संस्कृति पृथ्वीवरील सर्व संस्कृतींहून अत्युत्तम व सर्व संस्कृतीचा केंद्र आहे, असा अभिमान प्रत्येक देशांतील बहुतेक सर्व लहानमोठ्या इतिहासकारांचा असतो. गिझो, फ्रेंचराष्ट्र, व्हिको, इतालियन राष्ट्र, हेंगेल, जर्मनराष्ट्र, व बकल, इंग्लिश राष्ट्र पृथ्वीवरील सर्व संस्कृतींचें केंद्र समजतो. आतां प्रत्येक राष्ट्र एकाच वेळीं पृथ्वीवरील सर्व संस्कृतींचें केंद्र असूं शकणार नाहीं, हें स्पष्ट आहे. कोणतें तरी एक राष्ट्र केंद्र असणें संभवनीय आहे. कदाचित् निरनिराळ्या गुणांचें प्रामुख्यानें अधिष्ठान एकेका राष्ट्राच्या ठायीं असण्याचा संभव व शक्यता आहे. अशी स्थिति असून स्वतःचें राष्ट्र सर्व गुणांचें अधिष्ठान आहे, असें मतप्रदर्शन अभिमानानें व ममत्वानें तत्तद्देशीय इतिहासकार करतात. जिंकलेल्या राष्ट्रावर तर सर्वांचीच इतराजी असते. तशांत तें राष्ट्र पूर्वेकडील असल्यास, पुसावयालाच नको. त्याच्या माथीं असतील नसतील ते सर्व दोष मारण्यांत पाश्चात्य इतिहासकार एकमेकावर चढाओढ करतात. हिंदुस्थानासंबंधानें, तर, त्यांचें ग्रह फारच विपरीत व विपर्यस्त झालेले आहेत. रानटी, पोरकट, खुळा, म्हातारचळ लागलेला, अर्धवट सुधारलेला, भटाभिक्षुकांनीं नाडलेला, दास्यांत डुबलेला, खोटा धर्म पाळणारा, विलासी, संन्यस्त, जादूनें भारलेला, भोळा, लुच्चा, खोटा, खरा, अशीं नाना प्रकारचीं विसंगत विशेषणें हिंदुस्थानाला लावण्यांत पाश्चात्य इतिहासकार मोठा प्रामाणिकपणा समजतात. सर्व चराचर सृष्टीशीं समबुध्दि ठेविल्यानें शक, यवन, किरात, म्लेंछ, मुसुलमान, इंग्रज, फ्रेंच, डच, फिरंगी, वगैरे पश्विमेकडील अर्धपोटीं, बुभुक्षु, व असंस्कृत समाजांना हिंदुस्थानांत पाय घालता आला, हें कोणीच लक्षांत घेत नाहीं. अत्युत्कट कोटीप्रत पावलेलीं Cosmopolitanism हिंदुस्थानाला राष्ट्रत्त्वाच्या दृष्टीनें घातक झालेली आहे, हें तत्त्व विसरणें, ह्या लोकांना सध्यां सोईचें दिसतें. पाश्चात्यांचीं हीं आपमतलबी विधानें स्वदेशांतील तज्ज्ञ इतिहासकारांनीं स्वदेशाचा स्वभाषेंत इतिहास लिहून खोडून टाकिलीं पाहिजेत. इतकेंच नव्हे तर, पाश्चात्यांचे हे आपमतलबी विचार स्वदेशांतील साध्याभोळ्या तरुणांच्या अपरिपक्क मनावर बेमालूम ठसण्याचा जो कल दिसत आहे, तोहि वेळींच काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाश्चात्यांचें मतलबी अपविचार व स्वदेशीयांचें तदुध्दूत भ्रष्ट विचार खोडून टाकण्याचा हा प्रयत्न दोन त-हांनीं केला पाहिजे. सशास्त्र पद्धतीनें प्रामाणिक इतिहास एतद्देशीयांतील तज्ज्ञांनीं लिहिल्यानें पहिलें कार्य साधणारें आहे. दुसरेहि कार्य ह्याच प्रयत्नानें साधेल; परंतु त्याची व्याप्ति स्वदेशीय समाजाच्या अत्यंत संकुचित प्रदेशावर होणार आहे. सूक्ष्म पृथक्करणानें लाखों बाबींचा ज्यांत विस्तृत खल झाला आहे, असले व्यापक इतिहास राष्ट्रांतील फारच थोड्या व्यक्तींच्या उपयोगाचे होतात. इतिहासाचें सूक्ष्म व खोल परिशीलन करण्याची अपेक्षा बाळगणा-या व्यक्ती कोणत्याहि कालीं कोणत्याहि राष्ट्रांत फारच थोड्या असतात. व्यक्ति, वर्ग, राष्ट्र, लोक व अखिल मानवसमाज इत्यादींच्या गुणावगुणांचे व स्वभाववैचित्र्याचें ज्या मुत्सद्यांना व विचारवंताना सूक्ष्म ज्ञान करून घ्यावयाचें असतें, त्यांना हे विस्तृत व गहन इतिहास बहुमोल होत. स्वराष्ट्राच्या व मानवसमाजाच्या इतिहासाचें स्थूल ज्ञान झालें म्हणजे ज्यांची ज्ञानभूक शांत होते, अशा लोकांना हे इतिहास फारसे उपयोगाचे नसतात; आणि असल्याच लोकांचें प्रमार कोणत्याहि राष्ट्रांत अधिक असतें. अशा लोकांना--स्वराष्ट्राच्या व परराष्ट्रांच्या---इतिहासाचें ज्ञान करून देणें अनेक कारणांस्तव राष्ट्रचालकांना इष्ट असतें. पाठशालांतील व शालांतील विद्यार्थी, शेती, उदीम व व्यापार करणारे धंदेवाले, आणि इतर सामान्य स्त्रीपुरुष, यांना स्वदेशाच्या व परदेशाच्या इतिहासाचें योग्य ज्ञान झाल्यास, राष्ट्रीय हेतु सफल होण्यास फार साहाय्य होतें. स्वदेश, स्वधर्म, स्वराज्य, स्वभाषा, स्वसंस्कृति वगैरेंचे स्थूल ज्ञान सामान्य जनांना झाल्यास, त्यांच्या ठायीं स्वदेशादिकांच्या संबंधानें यथार्थ प्रेम सहज वृद्धिंगत होतें आणि स्वसमाजाशीं ताडून पहातां, परसमाज कोणत्या बाबींत समविषम आहेत, तें कमजास्त प्रमाणानें स्पष्ट कळूं लागतें. इतिहासाच्या स्थूल ज्ञानापासून असे नाना प्रकारचे महत्त्वाचे फायदे असल्यामुळें, इतिहास व विशेषतः स्वेतिहास लोकप्रिय करण्याकडे राष्ट्रांतील विचारवंत पुढा-यांची स्वाभाविक व अत्युकट इच्छा असते. ही सदिच्छा सफल करणारी जी इतिहासाचीं पुस्तकें त्यांना इतिहासज्ञानप्रसारक हें विशेषण यथास्थित शोभतें.