Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
५६. नि:पक्षपात व निरहंकार बुद्धीनें इतिहास लिहिणें म्हणजे काय, ख-या व निर्भेळ इतिहासाचें रूप कसें असतें, तो लिहिण्याच्या सशास्त्र पद्धती कोणत्या, प्रसारक इतिहास कशाला म्हणावें, अभिमानी इतिहास कशाकरतां लिहितात, व इतिहासविकृति म्हजे काय चीज आहे, वगैरे प्रकरणांचें संक्षिप्त दिग्दर्शन येथपर्यंत केलें. आतां महाराष्ट्रांत इतिहासलेखनाची हालहवाल कशी काय आहे, तें पाहूं.
५७. संस्कृत भाषेंत इतिहास व मराठी भाषेंत बखर ज्याला म्हणतात तो सारस्वताचा प्रकार संस्कृतांत व मराठींत फार पुरातन कालापासून असावा, हें ह्या दोन शब्दांच्या अस्तित्वावरून अनुमानतां येतें. संस्कृत इतिहासाचा विचार प्रस्तुतस्थलीं कर्तव्य नसल्यामुळें, प्राकृत व मराठी भाषांतील बखरींपासून महाराष्ट्रांतील इतिहासलेखनाचा इतिहास देण्यास प्रारंभ करणें सयुक्तिक आहे. बक=बकणें, बोलणें, ह्या धातूपासून बखर शब्द मराठींत निपजला आहे. ह्यावरून असें अनुमान करावें लागतें कीं, फार पुरातन कालीं बखरी तोंडानें बोलत असत, हातानें लिहीत नसत. तोंडानें बखरी बोलण्याचा हा काल दोन अडीच हजार वर्षांपलीकडील असावा. कारण, अलीकडील अडीच हजार वर्षांत जेव्हां लेखनकला माहीत नव्हती, असा काळ महाराष्ट्रांत आढळत नाहीं. जींत इतिहासाचा कांहीं अंश सांपडतो अशी अत्यंत जुनी मराठी बखर म्हटली म्हणजे शालिवाहनाची बखर होय. ह्या बखरीच्या सध्यां ज्या पोथ्या सांपडतात, त्यांची भाषा लेखकांनीं परंपरेनें आधुनिक करून टाकिली आहे. परंतु, मूळ फार जुनें असावें यांत संशय नाहीं. शालिवाहनाच्या बखरीपुढील जुन्या बखरी मानभावांनीं लिहिलेल्या सिंघणादि यादवांच्या आहेत. ह्या बखरींपैकी काहींची पानें मीं पाहिलीं असून, ह्यांची भाषा जुनी आहे. यादवांच्या बखरींच्या बरोबरीचीच हेमाडपंताची बखर समजावी लागते. हिचीहि भाषा लेखकांनीं आधुनिक केली आहे. हेमाडपंतांच्या बखरीच्यापुढील बखर राक्षसतागडीची आहे. ही मुळीं शक १४८८ त लिहिली असून भाषा बरीच तत्कालीन आहे. शक १४८८ च्या नंतर पांचपंचवीस वर्षांनीं भोसल्यांचे कुळ महाराष्ट्रांत उदयास आलें व स्वराज्याचा पाया घातला गेला. तेव्हांपासून शक १७४० पर्यंतच्या अडीचशें वर्षांत ह्या देशांत दोन अडीचशें बखरी मराठ्यांच्या इतिहासांतील निरनिराळ्या प्रसंगांवर लिहिल्या गेल्या. ह्या अडीचशें बखरींत पांचपंचवीस ओळीच्या त्रोटक टिपणापासून हजार हजार पानांच्या बाडापर्यंत संक्षिप्त व विस्तृत इतिहास आले आहेत. टिपणें, रोजनिशा, शकावली, वंशवेल, हकीकती, कुळकट, आत्मचरित्र, राजावलि, अखबारा, दंतकथा, लोककथा, पवाडे, प्रशस्त्या, घराण्यांची वर्णनें, युध्दांचीं वर्णनें, मोहिमांचीं वर्णनें, राजनीति, स्मरणवह्या, ताम्रपट, शिलालेख, शिलशिले, दफातीं, निवाडे, ऐतिहासिक लेखसंग्रह, संतचरित्रें, बखरी व इतिहास, अशीं इतिहासाचीं जीं नाना अंगें व उपांगें तीं ह्या काळांत निर्माण झालीं. त्यांपैकीं कित्येक अत्यंत वकृत्वप्रचुर असून, कित्येकांत प्रसंगांचें कथन साध्या व सोप्या भाषेंत फार हृदयंगम केलें आहे. ह्या सर्व बखरींत व हकीकतींत असा एक मोठा अद्वितीय गुण आहे कीं, प्राय: झाल्या प्रसंगाची हकीकत सांगतांना सत्याचा अपलाप जाणूनबुजून कोंठोंहि केलेला नाहीं. त्यांची कांहीं विधानें जर सध्यां अविश्र्वसनीय भासूं लागलीं, तर त्याचें कारण लेखकांचा असत्याभिमान नसून, त्यांचें अज्ञान किंवा गैरसमजूत आहे, असें आढळून येतें लेखकांच्या ज्ञानाच्या व्याप्तीच्या प्रमाणें लेखांतील माहिती नाना प्रकारची आहे. प्रत्यक्ष व कर्णोपकर्णी जी माहिती जशी मिळाली, तशी ती टिपून ठेविलेली ह्या बखरींतून आढळते. यूरोपांतील राष्ट्रांच्या अडीचशें वर्षांपूर्वील ज्या बखरी, हकीकती वगैरे आहेत त्यांच्यापेक्षां ह्या बखरी सरस असून विश्वसनीयतेच्या बाबतींत जास्त मान्य आहेत. तीनशें वर्षांपूर्वी यूरोपांतील राष्ट्रांतील जी स्थिति होती, तीपेक्षां शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रदेशाची स्थिति ब-याच बाबतींत श्रेष्ठ होती, ही गोष्ट लक्ष्यांत घेतली असतां, ह्या बखरींच्या गुणोत्कर्षाचें कारण निराळें धुंडाळावयास नको.