Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

५२. इतिहासाचें खरें स्वरूप काय, सध्यां आपल्या देशांत तो कोणत्या रूपानें दाखविला जातो व वस्तुत: तो कोणत्या रूपानें दाखविला जाणें जरूर आहे, ह्या तीन प्रकरणांचा विचार करण्याची प्रतिज्ञा मागें केली होती पैकीं इतिहासाचें खरे स्वरूप काय, ह्या प्रश्र्नाचें उत्तर येथपर्यंत दिलें. पूर्वप्रलयीन कालापासून आतांपर्यंत पृथ्वीवरील सर्व देशांतील अखिल मानवसमाजाचें इत्थंभूत जें चरित्र तें इतिहास होय. कौलिक पद्धतीनें मानवसमाजाचें वर्गीकरण करून, प्रत्येक शुद्ध व भ्रष्ट शाखेचें चरित्र कालानुक्रमानें व देशपरत्वें दिल्यानें इतिहासलेखनाला सौकर्य येतें. समाजाच्या चरित्रांतील शेकड़ों व हजारों प्रसंग केवळ नमूद करून इतिहासाचें काम भागत नाहीं; तर प्रसंगांचें पौर्वापंर्य व कार्यकारणसंबंध दाखवून, ऐतिहासिक कारणपरंपरा सिद्ध करावी लागते. ह्या कारणपरंपरेलाच मानवसमाजशास्त्र अशी संज्ञा आहे. मानवसमाजशास्त्र व्यक्तमध्य अशा प्रपंचाचा म्हणजे समाजाचा विचार करतें; समाजाच्या आद्यन्ताचा शोध लावून, प्रपंच व परमार्थ ह्यांची संगति करण्याचा पत्कर तें घेत नाहीं. हा पत्कर तत्त्वज्ञान घेतें. मायोपधिक आत्म्याच्या निरनिराळ्या वृत्तींचा परिष्कार अथपासून आतांपर्यंत व अंतापर्यंत प्रपंचरूपानें कसा झाला आहे व कसा होईल, वगैरे भूत, भविष्य व वर्तमान समाजचरित्राची संगति लावून दिल्याचा तत्त्वज्ञान बहाणा करतें व ह्या बहाण्याचा त्या त्या काळीं समाजाच्या चरित्रावर अनिवार परिणाम होतो. येथपर्यंत केलेल्या विवेचनाचा हा असा इत्यर्थ आहे. इतिहास, समाजशास्त्र व ऐतिहासिक तत्त्वज्ञान, ह्यांचें खरें स्वरूप काय, तें स्थूलमानानें दाखविण्याचा अल्प प्रयत्न केलेला आहे. त्यावरून समाजाच्या सुस्थितीला ज्ञानाच्या ह्या त्रिविध शाखेचा उपयोग काय होतो, तें सूक्ष्मदृष्टीनें मनन करून पहचयाचें आहे.

५३. इतिहासाचें खरें स्वरूप काय, हा प्रश्न सोडविला म्हणजे स्वदेशांत तो कोणत्या रूपानें दाखविला जाणें जरूर आहे, हा प्रश्न सोडविल्यासारखाच आहे. खरा इतिहास कोणत्याहि काळीं व कोणत्याहि देशांत एकाच स्वरूपाचा असतो. इतिहास लिहिण्याची जी पद्धति यूरोपांत सशास्त्र समजली जाते, तीच पद्धत हिंदुस्थानांत तितकीच सशास्त्र समजली जाते. इतिहास राजकीय असो, धार्मिक असो, सामाजिक असो किंवा सांपत्तिक असो; विद्या, युध्द, संस्कृति, वन्यावस्था, अनीति किंवा असद्विचार इत्यादि (एकेका) कल्पनांचा इतिहास असो; किंवा ह्या कल्पना अमलांत आणणा-या संस्थायंत्राचा असो; तो प्रामाणिकपणें व सशास्त्र लिहिण्याच्या पद्धती सर्व देशांत सर्व कालीं एकच असल्या पाहिजेत. प्रामाणिकपणा व सशास्त्र पद्धती हे दोन इतिहासाचे केवळ प्राण होत. त्यांतल्यात्यांत एक वेळ अशास्त्रता निभावून घेतां येईल. कारण, तिच्यामुळें विषयाची फार झाली तर, व्यवस्थित मांडणी व्हावयाची नाहीं. परंतु अप्रामाणिकपणा इतिहासप्रणयनाला सर्वस्वीं घातक होय. स्वतःच्या पक्षाच्या किंवा मताच्या किंवा देशाच्या किंवा सत्तेच्या किंवा मतलबाच्या मंडनार्थ एखाद्या ऐतिहासिक प्रंसगाच्या किंवा गोष्टीच्या वास्तविक रूपाचा मनास मानेल त्याप्रमाणें जाणून बुजून विपर्यास किंवा भंग किंवा लोप करणें म्हणजेच इतिहासप्रदर्शनांत अप्रामाणिकता करणें होय. असल्या अप्रामाणिक इतिहासांनाच इतिहासविकृति अशी संज्ञा आहे. असतें एक व दाखवावयाचें दुसरेंच, हा ह्या अवास्तव इतिहासांचा मुख्य मतलब असतो. असले इतिहास म्हणजे तल्लेखकांच्या मतलबी मतांचीं प्रदर्शनेंच होत. एका समाजानें दुसरा समाज जिंकला म्हणजे जेते लोक असले अप्रामाणिक इतिहास नाना त-हांच्या मतलबांच्या सिद्धयर्थ लिहीत असतात. सध्यां इंग्रजींत जे हिंदुस्थानचें किंवा महाराष्ट्राचें इतिहास किंवा बखरी किंवा निबंधवजा ऐतिहासिक टिपणे किंवा राजकीय, सामाजिक अगर धार्मिक विषयांवर लेख येतात, त्यांपैकी अनेक अप्रामाणिक व विकृत असतात. अशा लेखांवर भोळेपणानें विश्वास ठेवणा-या लोकांसारखे हतभागी इसम जगाच्या पाठीवर दुसरे कोणी नसतील. परदेशाभिमान, स्वदेशाभिमान, गुलामगिरीला स्वतंत्रता, परधर्माभिमानाला स्वधर्माभिमान व परभाषाभ्यासाला उदार विद्या, अशीं विकृत नामाभिधानें विकृत इतिहासांत व राजकीय निबंधांत व प्रबंधांत दिलेलीं असतात आणि जित राष्ट्रांतील साध्या भोळ्या तरुणांच्या मतिभ्रंशाला कारण होतात. मतिभ्रंश करणें हा विकृत इतिहासाचा मूख्य मतलब असतो. हे इतिहास लिहिणा-याला लांछनास्पद व वाचणा-याला लज्जास्पद होत.