Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शक १७४० पर्यंत ज्या दोन अडीचशें लहानमोंठ्या बखरी झाल्या, त्यांत परदेशाची किंवा परसमाजाची नांवाला देखील एक बखर नाहीं. महाराष्ट्रांतील मुसुलमानी राजांच्या दोन चार बखरी आहेत. परंतु त्या बहुतेक हिंदुरिवाज ग्रहण केलेल्या मुसुलमानांच्या आहेत. अहिंदु समाज सोडून, हिंदुस्थानांतील सधर्मीय जे बंगाली, पंजाबी, गुजराथी, रजपूत, द्राविड वगैरे समाज त्यांचा जरी इतिहास लिहिण्याचा प्रयत्न तत्कालीन मराठ्यांनीं केला असता, तरी देखील तुलना बुध्दि त्यांच्यांत निपजली असती आणि पध्दती व शास्त्र यांची निश्चित कल्पना त्यांना आली असती. इंग्रज, फ्रेंच, डच, फिरंगी वगैरे ताम्रमुखांचा संसर्ग मराठ्यांना बराच झाला होता. त्यांची एखादी लहानशी तरी बखर तत्कालीन बखरींत सांपडेल, अशी माझी फार दिवसांची अपेक्षा होती. परंतु, ती अद्याप सफल झाली नाहीं. बहुश: अशी बखर नसावी, असेंच कबूल करणें भाग पडतें. येणेंप्रमाणें परदेशांतील समाज, संस्कृति व शास्त्र यांची तुलना स्वदेशांतील समाज, संस्कृति व शास्त्र यांशी करावयाला न सांपडल्या मुळें, मराठी बखरकारांच्या इतिहासलेखनांत पध्दती व शास्त्र यांचा तर अभाव आहेच. परंतु दुसरीहि एक मोठी उणीव आहे. झाल्या प्रसंगाची हकीकत नाना बाजूंनी कशी द्यावी, यांची कल्पना त्यांना आली नाहीं. त्यामुळें होतें काय कीं व्यक्ति, काल व स्थल बदलून पाहिलें असतां, सर्व बखरींचें रूप सारखें एका मासल्याचें दिसतें. अवलोकन, पृथक्करण, टीका, व पध्दती ह्यांचा मागमूसही या बखरींतून नाहीं. तुलनेच्या अभावामुळें हा दोष होतो. ह्याच्याशिवाय दुसरा दोष म्हणजे संशोधनाभाव होय. आपल्यापूर्वी कोणीं काय लिहिलें आहे, आपण ज्या लोकांचा इतिहास लिहीत आहों, त्यांचा पूर्व व प्राचीन इतिहास काय आहे व त्याचीं साधनें कशीं मिळतील, ही विवंचना ह्या बखरकारांना पडलीच नाहीं. कारण, स्वदेशाचा पूर्व किंवा प्राचीन इतिहास लिहिण्याच्या भानगडींत ते शिरलेच नाहींत कित्येक बखरींच्या प्रारंभी पुराणांतील व तवारिखांतील राजांच्या व पातशाहांच्या अर्ध्याकच्या यादी दिलेल्या आढळतात. परंतु त्यांना इतिहास हें बडें नांव देण्याचें धाष्टर्य करवत नाहीं. सारांश, देश व काल ह्या दोन्ही दृष्टींनीं हे बखरकार पंगू होतें, असें म्हणणें प्राप्त होतें. दिशाभूल झाल्यामुळें परदेशांच्या इतिहासांचे अज्ञान कायम राहिलें व कालभूल झाल्यामुळें स्वदेशाचाहि प्राचीन इतिहास समजण्याला मार्ग राहिला नाहीं. स्वतःचा पूर्वेतिहास किंवा परकीयांचा प्राचीन व समकालीन इतिहास ह्यांच्या परिशीलनानें व तुलनेनें दृष्टीला वैशद्य, बुद्धीला प्रागल्भ व मनाला विचक्षणत्व जें येतें, तें शक १७४० पर्यंतच्या महाराष्ट्रांतील बखरकारांना आलें नाहीं. स्वदेशाचें स्वकालीन चरित्र स्वत:च्या प्रत्यक्ष किंवा ऐकीव माहितीनें जेवढे लिहितां येण्याजोगें होतें, तेवढें मात्र त्यांनी सत्यापलाप न करतां लिहिलें. ह्या संकुचित एकदेशीयत्वाचा परिणाम कूपमंडुकन्यायाने बुद्धिमांद्याच्या रूपानें फळास आला. सकलमानवजातीच्या घटनेंत व भ्रमणांत आपली स्थिति दिक्कालावच्छेदानें कोठें आहे, हें सूक्ष्म दृष्टीनें वारंवार पाहिल्यानें अवलोकनाची व तुलनेची मर्यादा विस्तार पावते आणि स्वदेशाच्या व स्वसमाजाच्या चरित्राचें अनेक अंगांनीं वर्णन करण्याचें सामर्थ्य येतें. सारांश, तुलनेच्या साहाय्यानें अवलोकनाच्या बाबी वाढतात, ही गोष्ट ह्या बखरकारांच्या मनांत बिलकुल उतरली नव्हतीं.