Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
५५. प्रसारक वर्गांतील कित्येक इतिहास विशिष्ट मतांच्या किंवा संस्थांच्या पक्षपातानें मुद्दाम लिहिलेले असतात. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा व स्वसंस्कृति सर्व जगांत श्रेष्ठ आहेत व परदेश, परधर्म वगैरे कनिष्ठ आहेत, असें प्रतिपादन करण्याची असल्या इतिहासाची प्रतिज्ञा असते. परदेश जिंकण्याची व स्वदेशाला उत्कर्षाप्रत नेण्याची हांव धरणा-या राष्ट्रांत बहुतेक प्रसारक इतिहास स्वदेश, स्वधर्म, स्वभाषाभिमानी असतात स्वदेशाभिमानी लेखकांच्या हातून असला प्रकार होणें रास्तच आहे. कोंवळ्या व अपरिपक्क बुद्धीच्या माणसांच्या ठायीं स्वदेशादिकांबद्दल प्रेम उत्पन्न करावयाला स्वदेशाभिमानीच इतिहास हवा असतो. स्वदेश भिकार, स्वराष्ट्र कुचकामाचें, स्वभाषा दरिद्री, स्वधर्म खोटा, स्वजन लुचे, व स्वत: चे आईबाप अडाणी, असें वर्णन स्वदेशाच्या ज्या इतिहासांत केलेलें असतें, ते वाचून कोंवळ्या व अपरिपक्क बुध्दीच्या माणसांना स्वदेशादिकांविषयीं प्रेम कसें बेरें उत्पन्न होईल? परंतु असलेहि इतिहासकलंक कित्येक देशांत प्रत्यक्ष देशांतल्या लोकांच्या हातून निर्माण होतात! असल्या इतिहासांना स्वदेशावमानी इतिहास अशी संज्ञा आहे. स्वदेशावमानी इतिहास लिहिणारेच स्वशालोपयोगी परदेशाभिमानी इतिहास लिहित असतात. स्वदेशावमानी व परदेशाभिमानी अशा इतिहासकाराधमांची ही दुक्कल स्वतंत्र राष्ट्रांत क्षणभरदेखील टिकत नाहीं; त्यांची वाढ परतंत्र राष्ट्रांतच शक्य असते. हे अभिमानी इतिहास नाना प्रकारचे असतात. कित्येकांत राज्ययंत्राचा अभिमान, कित्येकांत राजाचा अभिमान,कित्येकांत महाजनांचा अभिमान, कित्येकांत सुधारणेचा अभिमान व कित्येकांत स्वजातीचा अभिमान ओतप्रोत दाखविलेला असतो. अशा हेतूनें कीं, अजाण वाचकांना इष्ट व्यक्तीचा, वर्गांचा किंवा मताचा योग्य व क्कचित फाजिलहि अभिमान उत्पन्न व्हावा. हे अभिमानी इतिहास केवळ इतिहास नव्हत, तर मतलबी लोकांच्या मतांची प्रसरणद्वारेंहि होत. वाईट मतलबाप्रमाणें चांगल्या मतलबाच्याहि सिद्धीला असल्या विकृत इतिहासांचा उपयोग होतो. प्रसारक इतिहासांचे अनेक प्रकार आहेत; पैकीं कांहींचा येथें निर्देश करतों:-
(१) शालोपयोगी इतिहास.
(२) पाठशालोपयोगी इतिहास.
(३) स्वदेशाभिमानी इतिहास.
(४) स्वदेशावमानी इतिहास.
(५) परदेशाभिमानी इतिहास.
(६) परदेशावमानी इतिहास.
(७) स्वराज्याभिंमानी इतिहास.
(८) लोंकाभिमानी इतिहास.
(९) महाजनाभिमानी इतिहास.
(१०) धर्माभिमानी इतिहास.
(११) व्यक्तभिमानी इतिहास.
(१२) सुधारणाभिमानी इतिहास.
(१३) स्वजात्यभिमानी इतिहास.
(१४) स्वभाषेंत लिहिलेला स्वदेशाचा इतिहास.
(१५) स्वदेशांतील लोकांकरितां परभाषेंत लिहिलेला स्वदेशाचा इतिंहास. वगैरे, वगैरे, वगैरे.
चवथ्या, पांचव्या व पंधराव्या नंबरचे प्रसारक इतिहास स्वतंत्र राष्ट्रांत असूं शकत नाहींत; परतंत्र राष्ट्रांत असूं शकतात. कारणें खोल नसल्यामुळें, त्यांचा निर्देश करून जागा अडवीत नाहीं.