Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
बद्धांची संख्या जेव्हां जास्त असते, तेव्हां धार्मिक, सामाजिक, राजकीय व मानसिक बंधन दास्य, अथवा गुलामगिरि समाजांत जास्त आविर्भूत होते. आणि कमी असेल तेव्हां धार्मिक, सामाजिक, राजकीय व मानसिक स्वातंत्र्य समाजांत नादूं लागतें. असा ह्या शाखेचा मुख्य ऐतिहासिक सिद्धान्त आहे. हा सिद्धान्त श्रीसमर्थ रामदासस्वामी यांणी दासबोधांत ब-याच विस्तारानें प्रपांचिला आहे व तो प्रपंच ग्रंथमालेंतील 'रामदास” ह्या निबंधांत मीं स्पष्ट करून सांगितला आहे. सबब त्याची पुनरुक्ति येथें करीत नाहीं. येथें रामदासी तत्त्वज्ञानांत व संन्यस्त तत्त्वज्ञानांत इतिहासाच्या अथवा प्रपंचाच्या अथवा समाजाच्या दृष्टीनें भेद कोणता आहे, तें मात्र सांगतों. बद्ध, मुमुक्षु व साधक यांना संन्यस्तांचें तत्त्वज्ञान प्रपंच म्हणजे समाज सोडून देण्याचा अशक्य उपदेश करतें. हा अशक्य उपदेश रामदासी व नैतिक तत्त्वज्ञान सांगत नाहीं. कारण, नरदेह धारण करणा-यांना-- मग ते बध्द असोत किंवा सिध्द असोत-- प्रपंच व समाज सहज असून कदापिही सुटण्यासारखे नाहींत. प्रपंचांत राहूनच, प्रपंच उत्तमोत्तम करूनच, परमार्थाचें साधन करावयाचें आहे. परमार्थांचें साधन करण्यास, परमार्थाची सिध्दि होण्यास, प्रपंच हाच एकटा अनन्य मार्ग आहे. प्रपंच सोडल्यावर, परमार्थ ही वस्तूच रहात नाहीं. प्रपंच आहे तोंपर्यंतच परमार्थ ह्या वस्तूंत हांशींल आहे. सारांश, प्रपंच साधून परमार्थाचा लाभ करून घेणें, हाच परम पुरुषार्थ होय. तेव्हां, बद्धांना व मुमुक्षूंना सन्याशाचें एकदेशी तत्त्व अमलांत आणावयास सांगणें केवळ मौर्ख्य आहे. प्रपंच सुटावयाचा नाहीं व संन्यास साधावयाचा नाहीं, अशी त्रिशंकुवत् अवस्था असल्या गुरुशिष्यांची अवश्य व्हावयाची. अशी दुरवस्था आर्य समाजाची अनेक वेळां झालेली आहे. तींतून सोडविण्याचा प्रयत्न भगवद्रीता व दासबोध या दोन ग्रंथांनीं केला आहे. ह्या दोन ग्रंथोत्तमांतल्या ऐतिहासिक तत्वज्ञानाचा यथास्थित व सर्वांगांनीं खुलासा करण्यास आणि त्याची तुलना यूरोपांतील पन्नास शंभर ऐतिहासिक तत्त्वज्ञानांशीं करून दाखविण्यास, एखादा स्वतंत्र ग्रंथच लिहिणें जरूर आहे. भगवद्रीतेंत वेदान्तापेक्षां इतिहासाचें म्हणजे प्रपंचाचें म्हणजे समाजाचें तत्त्वज्ञान स्पष्ट करून दाखविण्याचा विशेष कटाक्ष आहे, हें बीज महाराष्ट्रांतील लोकांच्या जितकें जास्त ध्यानांत येईल तितकें जास्त हिताचें होईल.