Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

५०. यूरोपांत ऐतिहासिक तत्त्वज्ञानाच्या ज्या अनुनायक व निर्णायक नांवाच्या दोन शाखा’ आहेत, त्यांपैकीं अनुनायक पद्धतीचा उदय भारतवर्षात व महाराष्ट्रांत अद्याप झाला नाहीं. निर्णायक अथवा A priori अथवा deductive अथवा पूर्वग्रहात्मक पद्धतीचेंच राज्य या देशांत आज दोन हजार वर्षे चालू आहे. भारतवर्षांतील ऐतिहासिक निर्णायक पद्धतीच्या दोन शाखा आहेत. सर्व चराचर सृष्टीशीं समबुद्धि ठेवून चालणारी एक शाखा आहे. ह्या शाखेंत लोष्ठ, अश्म, कांचन, पशु, पक्षीं, मनुष्य, गंधर्व, यक्ष, ईश्वर व ब्रह्म ह्यांचें तादात्म्य कल्पून व्यक्तिमात्राचें आचरण चालावें असा उपदेश केलेला असतो. प्रपंचात जन्मावें लागतें, त्याला उपायच नाहीं. परंतु, जन्म हें एक महददु:ख कल्पून व प्रपंचाचा म्हणजे समाजाचा स्पर्श अपरिहार्य मानून, देहाचा त्याग करून ब्रह्मांत विलीन होण्यांत पुरुषार्थ आहे, अशी ह्या शाखेची समजूत आहे. म्हणजे प्रपंच, संसार, समाज, समाजाची धडपड, राष्ट्र, राज्ययंत्र, धर्मयंत्र, युद्धयंत्र, व्यक्तिस्वातंत्र्य, समाजस्वातंत्र्य वगैरे सर्व संस्थांचा व व्यवहारांचा पूर्ण तिटकारा ह्या शाखेच्या मनांत भरलेला असतो. ह्या शाखेचे पक्के, अर्धे, चौथाईचे, असे अनेक भेद आहेत. ब्रह्मांत विरून जाण्याला सर्व चराचर सृष्टीशीं समबुद्धि ठेवणें म्हणजे व्यक्तित्वाचा अत्यंत लोप करणें आहे. व्यक्तित्वाचा अत्यंत लोप म्हणजे समाजत्वाचाहि अत्यंत लोपच होय. कारण, समाज म्हणजे व्यक्तिंचा समुदाय होय. ह्या शाखेला ममत्वबुद्धि आत्म्याच्याहि ठायीं राहिलेलीं नसते. ज्ञान व अज्ञान ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच सिद्ध व असिद्ध हे लोक मानतात. फार कांय सांगावें, सिद्धि व असिद्धि ह्या परस्परविरोधी वस्तु हे लोक एकच समजतात. ह्या मताचा कट्टा पुरस्कर्ता महाराष्ट्रांत ज्ञानेश्वर झाला. ह्याच्या अमृतानुभवांत अज्ञानखंडनाप्रमाणेंच ज्ञानाचेंहि खंडन केलेलें आहे. शिष्य म्हणजे गुरु व गुरु म्हणजे शिष्य, बायको म्हणजे आई व आई म्हणजे बायको, पुरुष म्हणजे प्रकृति व प्रकृति म्हणजे पुरुष, आपण म्हणजे ईश्वर व ईश्वर म्हणजे आपण, इतकी व्यष्टि व समष्टि ह्यांची जेथें तादात्म्यस्थिति झाली, तेथें प्रपंच कसला आणि इतिहास कसला ! हें तत्त्वज्ञान किंवा ह्याचा अल्पहि अंश ज्यांच्या डोक्यांत भरला, त्यांना समाजहि नाहीं व राष्ट्रहि नाहीं. पूर्णत्वाची, शून्यत्वाची, समत्वाची, अमृतत्वाची, कल्पना ज्या विचारांत परिपूर्ण भरली तो विचार विचाराभावाच्या रूपाला पोचला. त्याला विचार, आचार, उच्चार करण्याची जरूरच राहिली नाहीं. अखंडैकरसांत, आत्मस्वरूपांत, स्वसंवेद्यत्वांत, अनाद्यनन्तांत निमग्र झाल्यावर आणखी निमग्र तें कशांत व्हावयाचें? वस्तीचें गांव गांठल्यावर प्रवास कोठें करावयाचा? असली ही विलक्षण शाखा आहे. चिरंजीव, जीवन्मुक्त, संन्यस्त, व उदासीन असल्या लोकांना समाज व संसार व प्रपंच व इतिहास व तत्त्वज्ञान, हीं काय करावयाची? ह्या लोकांचें व्यक्तिस्वातंत्र्य अथवा ममत्व इतक्या प्रकर्षाला पोचलें कीं, समाजापासून पूर्णपणें विलग होण्यापर्यंत त्याची मजल गेली. अथवा ज्यांना समाज नाहीं-- सारखा मानण्यांत पुरुषार्थ वाटला त्यांना ममत्व तरीं कोठं राहिलें? ममत्व ही वस्तु समाजत्वाच्या तुलनेनेंच भासमान होणारी आहे.