Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

५१. भारतवर्षांतील ऐतिहासिक निर्णायक पद्धतीच्या एका शाखेचें रूप असें आहे. दुसरी जी शाखा तिला पहिलींतील गोम कळून चुकली आहे. अखिल कर्माचा किंवा समाजाचा त्याग करणें संन्याशाला किंवा मनुष्यमात्राला अशक्य असल्यामुळें, ह्या अशक्य स्थितीचा निषेध ही शाखा कंठरवानें करते. “आये दु:खं व्यये दु:खं धिगर्थान्दु:खकारिण:” "मांसपांचालिकायास्तु स्त्रिय: किमिव शोभनं” वगैरे समाज व समाजाच्या धडपडीचा द्वेष करण्यास शिकविणा-या विद्यारण्यांच्या संन्यस्त क्लृप्त्या ह्या शाखेला बिलकूल मान्य नाहींत. "नियतस्य तु संन्यास: कर्मंणो नोपपद्यते । मोहात्तस्य परित्यागस्तामस: परिकीर्तित: ।” "दु:खमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् । स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्; ॥" वगैरे मतें ह्या शाखेला मान्य आहेत. समाजांत देहधारण करून प्रपंच नियत म्हणून यथास्थित केलाच पाहिजे; मोहानें त्याचा त्याग करणें तामस होय; संपत्तीपासून किंवा पोराबाळापासून म्हणजे समाजापासून दुःख होतें म्हणून तो टाकणें भयावह आहे, असें तत्त्व ही शाखा मानते. “प्रपंच साधुनी परमार्थाचा लाभ ज्यानें केला, तो नर भला,” असा उत्तमोत्तम सिद्धान्त या शाखेचा आहे. ह्या शाखेचें ऐतिहासिक निर्णायक तत्त्वज्ञान स्थूलत्वानें असे. कोव्हांहि व कोठेंहि कोणत्याहि मनुष्यसमाजाच्या शाखेंतील लोकांचे चार प्रकार असतात. प्रपंचाचा अर्थ न कळतां प्रपंचाच्या गोंधळांत अज्ञानानें बद्ध होऊन गेलेल्या माणसांचा पहिला वर्ग. प्रपंचाचा अर्थ कळून घेण्याची इच्छा गुरुकृपेनें म्हणजे सिद्ध म्हणजे ज्ञाते यांच्या कृपेनें ज्यांना होते त्या मुमुक्षूंचा म्हणजे प्रपंचाचा व परमार्थाचा संबंध काय आहे तें समजून घेऊन परमार्थाकडे प्रपंचांतून सुटून जाऊं इच्छिणारांचा जो वर्ग तो दुसरा वर्ग होय. प्रपंचाचा अर्थ कळण्याची नुसती इच्छाच नव्हे, तर अर्थ कळून तद्नुसार आचरण ठेवण्याचा अभ्यास करणा-यांचा जो वर्ग तो तिसरा वर्ग. ह्या वर्गाला साधकांचा वर्ग म्हणतात. आणि प्रपंच व परमार्थ, वस्तु व आभास, तत् व त्वं यांचा तादात्म्यबुद्धीनें ज्यांना अर्थ कळला व तदनुसार ज्यांचे सहज आचरण होतें त्या सिद्धांचा जो वर्ग जो चवथा व शेवटला. असे मनुष्यांचे चार वर्ग आहेत. अत्यंत कमी संस्कृत समाजाप्रमाणें अत्यंत जास्त संस्कृत समाजांतहि हे चारी वर्ग निरनिराळ्या प्रमाणाने सांपडतात. मानसशास्त्राच्या अनुरोधानें हे चार वर्ग केलेले आहेत, कालानुक्रमानें केलेले नाहींत, हे ध्यानांत धरलें पाहिजे. म्हणजे, दहा हजार किंवा वीस हजार वर्षांपूर्वी प्रथम सर्व लोक बद्ध होते, पुढे पांच हजार वर्षांनी मुमुक्षू झाले, नंतर चार हजार वर्षांनी साधक झाले व आतां सिद्ध होत आहेत, असा प्रकार नाहीं. तर जेव्हां केव्हांपासून मानवसमाजाचा इतिहास कळूं लागला, तेव्हांपासून हें चार वर्ग समाजांत दृष्टोत्पत्तीस येतात. इतकेंच कीं कधीं मुमुक्षूंच्या मानानें बद्धांची संख्या जास्त असते व कधीं कमी असते.