Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
तात्पर्य, ममत्व व ममत्वाभाव, अहंता व अहंताभाव, मृतत्व व अमृतत्व, अशा परस्परविरुद्ध स्थितिप्रत ही मंडळी जाऊन पोचली. अशांचें तत्त्वज्ञान जसें प्रपंचाला तसेंच परमार्थालाहि परम बाधक होय. ह्यांना प्रपंचहि नाहीं व परमार्थहि नाहीं. कारण, परमार्थाला आपण जाऊन पोहोंचलों व प्रपंचाला सोडून दिलें, अशी ह्यांची भावना असते. ह्या शाखेच्या तत्त्वज्ञानाचा परिणाम महाराष्ट्रांत दोन चार वेळां झालेला आहे व जेव्हां जेव्हां झाला आहे तेव्हां तेव्हां राष्ट्रत्वाचा लोप होऊन गेला आहे. जीवन्मुक्त, संन्यस्त, व विरक्त ह्यांनीं प्रपंच सोडलेलाच असतो; तेव्हां त्यांची कांहीं हानि व्हावयाची राहिलीच नसते. ज्यांनी प्रपंच सोडला नाहीं, त्यांची मात्र ह्या तत्वज्ञानानें पुरी फजिती होते. व्यक्तिंचा समुदाय जो समाज किंवा राष्ट्र त्यांच्या प्रपंचाला व परमार्थ मार्गाला तर हें तत्त्वज्ञान अत्यंत घातक असतें. समाज किंवा राष्ट्र ह्मांना समाजाचा किंवा राष्ट्राचा तिटकारा करावयास शिकविणें म्हणजे समाजाला किंवा राष्ट्राला नाशाच्या पंथासच लावणें आहे शिवाजीच्या हत्तींना, रथांना व घोड्यांना व जनसमूहाच्या मताला धाब्यावर बसविणारा तुकाराम, ज्ञानेश्वराचाच शिष्य होय. ही ग्यानबातुकारामांची जोडी महाराष्ट्रांतील समाजाच्या व राष्ट्राच्या प्रपंचाला बहुत घातक झालेली आहे. जर्मनींत इसवीसनाच्या अठराव्या शतकांत असाच प्रकार झाला. लेसिंग, गेटी, शिलर, हेगेल, फिश्ट, वगैरे जीवनमुक्तांच्या तत्त्वज्ञानानें राष्ट्राचा व प्रपंचाचा अभिमान कर्त्या व विचारी लोकांना वाटेनासा झाला व नेपोलियनाच्या मगमिठींत जर्मन लोक सांपडले.* * जगांतील माणसापुरतीच असणारी ही जर्मनींतील समबुद्धि जर्मन राष्ट्राच्या नाशास कारण झाली, अखिल चराचर सृष्टीची समबुद्धि ठेवणारी महाराष्ट्रांतील Cosmopolitanism महाराष्ट्राच्या नुसत्या राष्ट्रनाशासच तेवढी कारण झाली असें नाहीं; तर ह्या राक्षसीच्या उपदेशानें कला, संपति, संतति, वगैरे सर्व संस्कृतीचा लोप झाला.
विद्यांपि खेदकलिता विमुखी बभूव !
आणि मोक्षाची व परमार्थाची प्राप्ति एकीकडेच राहून, स्वतःच्या घरांत गुलामाप्रमाणें राबून परक्याच्या ओंजळीनें पाणी पिण्याचा दुर्घट व लाजिरवाणा प्रसंग मात्र झाला !!!