Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
४९. शास्त्र व तत्त्वज्ञान, यांचे प्रांत भिन्न केले, म्हणजे यूरोपीयन व भारतीय "Philosophy of History” चा परिचय करून घेण्याचा मार्ग खुला होतो. युरोपांतील ऐतिहासिक तत्त्वज्ञांच्या दोन शाखा आहेत. एक शाखा विवेचकपद्धतीनें हजारों ऐतिहासिक प्रसंगांची छान करून अनुनयनपद्धतीनें सदर प्रसंगांची कार्यकारणपरंपरा शोधीत सामान्य कारणांपर्यंत येऊन ठेपते, एवढ्यानें आपलें कार्य संपलें असें समजते. मानव समाजाच्या चरित्राच्या आद्यन्तांचा शोध लावण्याचा किंवा लागल्याचा बाणा ही शाखा धरीत नाहीं. ह्या शाखेला A posteriori व inductuctive असें नामाभिधान दिलें असतां शोभण्यासारखें आहें. दुसरी शाखा तत्त्वज्ञांनीं स्वतंत्र रीतीनें कल्पिलेल्या सर्वसामान्य आदिकारणाचा स्वीकार करून त्याचा परिष्कार मानवसमाजाच्या चरित्रांतील प्रसंगसमूहावर व प्रत्येक प्रसंगावर कसा झाला आहे तें निर्णयपद्धतीनें करून दाखविण्याची ईर्षा बाळगते. मानवसमाजाचा आद्यन्त तर्कदृष्ट्या व तत्त्वदृष्ट्या आपल्याला माहीत आहे व अखिल मानवसमाजाच्याच नव्हे तर अखिल सृष्टीच्या आदिकारणांशी आपला परिचय आहे, असा अभिमान ह्या शाखेला आहे. ह्या शाखेला A priori व deductive ही संज्ञा मतैक्यानें लाविली जाते. स्पेन्सर, हक्स्ले, कोंटे वगैरे भौतिकशास्त्रज्ञ अनुनयपध्दतीचे कैवारी आहेत; आणि प्लेटो, क्यांट, हेगेल, वगैरे बडीं बडीं धेंडें निर्णयनपद्धतीचे वाली आहेत. ह्या निर्णायक तत्त्वज्ञांच्या विचारांचाच पगडा समाजाच्या चरित्रावर फार झालेला आहे. भौतिकशास्रांची जी अनुनयनपद्धती--जिची उत्पति व वृद्धि अलीकडील तीनशें वर्षांतली आहे--तिच्याविरुद्ध यद्यपि ही तात्विक व निर्णायकपद्धति आहे, तत्रापि प्रपंचाचा सामग्रयानें अर्थ कळण्याचा मार्ग ह्या पद्धतीनें सुकर होऊन, मनाला शांति व समाधान प्राप्त होतें. हेंच या पद्धतीच्या साम्राज्याचें बीज आहे प्रपंचाच्या दाहानें संतप्त व उद्विग्न व्यक्तींच्या समाजाला शांत व समाधायक आश्रय मिळवून देण्याचें आश्वासन निर्णायक तत्त्वज्ञांनीं घेतल्यामुळें त्यांचें वजन मानवसमाजावर पडावें, हें रास्तच आहे. परंतु, विवेचक व अनुनायक दृष्टीनें पाहिलें तर, निश्चयानें अमुक गोष्ट साधार व अमुक निराधार आहे, ही फोड अनुनायक शास्त्रज्ञांच्या द्वारांच होण्यासारखी आहे. निर्णायकपद्धती समाजाच्या स्थैर्याला पोषक आहे व अनुनायकपद्धती समाजाच्या गतीला अनुमोदक आहे, कोणत्याहि जीवंत समाजांत ह्या दोन्ही पद्धतींचा कमीजास्त मानानें अंश सांपडतो. सारांश, जोंपर्यंत अज्ञेय सृष्टि अस्तित्वांत आहे व तिला ज्ञेय रूप देण्याचा प्रयत्न चालू राहील, तोंपर्यंत ह्या दोन्ही पद्धतींचा अवलंब समाजांत जारीनें चालू राहील. इतकें मात्र ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, अनुनायक पद्धतीचा अवलंब करणारें समाजशास्त्रज्ञ होत व निर्णायक पद्धतीचा अवलंब करणारे केवळ काल्पनिक तत्त्वज्ञ होत. पहिले पायाकडून अज्ञेय शिखराकडे जात आहेत व दुसरे काल्पनिक शिखराकडून पायाकडे येत आहेत. व्यावहारिक सत्य पहिल्यांच्या बाजूला आहे व तात्विक सत्य दुस-यांच्या पक्षाला आहे. दोघांचाहि हेतु सत्याचा पाठलाग करण्याचा आहे. बहुश: सत्याची पारध या अधऊर्ध्व गतींतील भेटींत संपण्याचा संभव आहे.