Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

त्याप्रमाणेंच, समाजाच्या आद्यन्तांची माहिती सांगून व्यक्तमध्य प्रपंचाची संगती लावून दिल्याचा भास उत्पन्न करणारें तत्त्वज्ञान केवळ एक प्रचंड Psychologicalfiction आहे; त्याला व्यावहारिक सत्यत्व नाहीं. शास्त्राचा, तर मुख्य बाणा व्यावहारिक सत्यत्वावर आहे. तत्त्वज्ञानाच्या राज्यांतील एक एक वस्तु शास्त्र दिवसेंदिवस हस्तगत करीत व त्याला व्यावहारिक सत्यत्चाचें रूप आणीत चाललें आहे आणि असा एक समय हजारों वर्षांनी येईल कीं, जेव्हां तत्त्वज्ञानाचा सर्व प्रांत शास्र आक्रमून टाकील, तोंपर्यंत शास्त्र व तत्वज्ञान ह्यांचे प्रांत नीट आखून भिन्न केले पाहिजेत हें उघड आहे ! नाहीं तर पारमार्थिक व काल्पनिक विधानांना व्यावहारिक सत्यत्व दिलें जाईल आणि व्यवहारांत पदोपदी पराभव होत जाईल. उदाहरणार्थ, ख्रिस्ती तत्त्वज्ञान घ्या. ख्रिस्ती तत्त्वज्ञानाचें व पुराण इतिहासाचें मुख्य पुस्तक जें बायबल त्यांत, (१) मनुष्यसमाज ईश्वरानें आठ हजार वर्षांपूर्वीआदम नांवाचा मनुष्य उत्पन्न करून चालू केला, (२) एन्जल नांवाचे देवदूत मनुष्याचें रक्षण करीत असतात, (३) सैतान नांवाचा एन्जल मनुष्याला भ्रष्ट करतो, (४) ख्रिस्तानें सर्व भूत,भविष्य व वर्तमान ख्रिस्ती मानवप्राण्यांचें पाप स्वत: प्रक्षाळून टाकलें आहे, (१) ईश्वर स्वर्गात रहातो, (६) मृत मनुष्यें पुढें एकदां एकदम सदेह पुनरुज्जीवित होणार आहेत व त्यावेळीं पापपुण्यांचा झाडा होणार आहे, वगैरे शेकडों कल्पित, खुळीं व रानटी विधानें केलेलीं आहेत. तीं जर यूरोपीयन ख्रिस्तीसमाज खरी धरून चालेल, तर ज्याला सध्यां इतिहास, मानवशास्त्र, तर्कशास्त्र, भूस्तरशास्त्र वगैरे म्हणतात त्यांचे प्रणयन अशक्य होईल. वस्तुस्थिति अशी आहे कीं बायबलांतील हीं निराधार व काल्पनिक विधानें तिरस्कारानें एकीकडे ठेवून, यूरोपांत इतिहास व शास्त्र यांची निर्मिती चालली आहे. वर्तमान यूरोपांतील सर्व व्यवहार बायबलांतील काल्पनिक व निराधार विधानांच्या विरुद्ध चालला आहे. अनेक भ्रामक विधानांचे भांडारगृह जें बायबल तें समुद्रांतील दीपगृहाप्रमाणें धर्मपुस्तक करून, त्याच्या आसपास बिलकुल विश्वास ठेवावयाचा नाहीं, व अन्वयव्यतिरेकादि तर्कपद्धतीच्या जोरावर जें खरें असेल तें शास्त्र व तेवढें प्रमाण मानावयाचें, असा प्रकार यूरोपांत प्रस्तुतकालीं चालला आहे. आणि तो सर्वथा स्तुत्य व उपयोंगी आहे. बायबलांतील तत्त्वज्ञानानें मानवसमाजाच्या आद्यन्तांचा छडा लागल्याची समजूत वाटेल त्यानें खुशाल करून घ्यावी, परंतु व्यवहारांत त्याची मातबरी व सत्यता काडीमात्र नाहीं हें उघड आहे. हीच विचारसरणी इस्लामी, बौद्ध व मूर्तिपूजक वगैरे सर्व तत्त्वज्ञानांना लाविली पाहिजे. तात्पर्य, Philosophy व Science ह्यांचे प्रांत भिन्न आहेत, हें पक्कें ध्यानांत ठेऊन चाललें पाहिजे. मग, तें तत्त्वज्ञान धार्मिक ग्रंथांतून प्रतिपादिलेलें असो किंवा दर्शनांच्या रूपाने आविर्भूत होवो. कोणत्याहि रूपानें तें जन्मास येवो, त्याला शास्त्राप्रमाणें व्यावहारिक सत्यत्व नाहीं.